"तो आणि मी याच्यात फरक नाही" ही अद्वैतबुध्दी विकसित होण्याआधी "तो" कुणीतरी आहे ही निष्ठा दृढ हवी. मग हळूहळू स्वतःच्या आणि त्याच्या नात्याचा शोध सुरू होतो. साधक निष्ठावान असेल आणि ही चिंतन साधना भरपूर झाली की मग कळतं की "तो आणि मी वेगळा नाहीच. मीच तो, तोच मी."
हा अद्वैतानुभव येण्यासाठी पहिले द्वैतावर दृढ बुध्दि असावी लागते, त्यादृष्टीने मार्गक्रमण करावे लागते.
काहीकाही जीवांना त्यांच्या त्यांच्या पूर्वप्रारब्धानुसार ही अद्वैतबुध्दी लवकर प्राप्त होते. आमच्यासारखे काही त्या अद्वैतप्राप्तीच्या शोधात किती जन्म भटकतील ते सांगता येत नाही.
माझ्या स्वानुभवातून मला पटले, जाणवले ते हे सच्चे विवेचन केलेय. प्रत्येक साधकाने आपापल्या जाणीवेनुसार या पथावर मार्गक्रमण करावे. नागपूरवरून अमरावतीला जाण्यासाठी आपण निघतो तेव्हा आपल्याला थेट अमरावती शहर जरी दिसले नाही तरी यापूर्वी तिथे जाऊन आलेल्या, अनुभवी अधिकार्यांनी "अमरावतीकडे" अशा दिशादर्शनाच्या पाट्या लावून ठेवलेल्या असतात. त्यावर आपण विश्वास ठेऊन मार्गक्रमण केले की अमरावती येणारच. गाडीच्या गतीनुसार वेगवेगळा कालावधी लागणार हे जरी नक्की असलं तरी अंतिमतः गंतव्य गाठले जाणार हे ही तितकेच खरे असते.
शासनाच्या अधिकार्यांवर आपण जेवढा विश्वास ठेवतो, त्याच्या १% विश्वास जरी आपण अध्यात्माचे अधिकारी असलेल्या संतवचनांवर ठेवला तर आपण सगळेच आपापल्या जीवनाच्या मुक्कामाला पोहोचू.
आपण करतो काय ते नागपूरवरून फारफारतर गोंडखैरी, कोंढाळी, कारंजा गाठतो आणि "अमरावती दिसत नाही" असा त्रागा करून वाट चालणे थांबवतो. अशाने कधी पोहोचणार आपण आपल्या मुक्कामाला ?
- रोकडा आत्मानुभव घेणारा सर्वसामान्य साधक, मानवदेहधारी राम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment