Saturday, July 9, 2022

चातुर्मास संकल्प : न क्रोधो न च मात्सर्यम.

 श्रीसूक्त असो किंवा श्रीविष्णुसहस्रनाम, त्याच्या फ़लश्रुतीत 


" न क्रोधो न च मात्सर्यम, न लोभो न अशुभा मती:" 

असेच आहे. श्रीसूक्त किंवा श्रीविष्णुसहस्रनाम पठण करणा-या भक्तांना क्रोध येणार नाही, त्यांच्या मनात मत्सर उत्पन्न होणार नाही, त्यांच्या मनात लोभही येणार नाही आणि त्यांची मती कधीही अशुभ गोष्टींकडे वळणार नाही असा त्याचा साधा सोपा अर्थ.


संस्कृत भाषा ही समाधी भाषा आहे. श्रीमदभागवताचा दशम स्कंध हा श्रीव्यासांनी समाधीभाषेत लिहील्याचे जाणकार आणि भक्तांचे मत आहे. एकाच श्लोकाचे अनंत अर्थ लागू शकतात. तो श्लोक लिहीताना त्या काळात त्या लेखनकर्त्याच्या मनाची काय अवस्था होती हे आज पाच हजार वर्षांनंतर आपल्याला जाणून घेणे अशक्य आहे. त्यात श्रीसूक्त म्हणजे प्रत्यक्ष ऋग्वेदातले सूक्त. अपौरूषेय असा ऋग्वेद. हजारो वर्षांच्या मौखिक परंपरेने पिढ्यानुपिढ्या आपल्यापर्यंत आलेला. त्यात या श्लोकाच्या रचयित्याच्या मनाची अवस्था हा श्लोक रचताना नक्की काय होती ? याचा धांडोळा कसा लागावा ?


पण आपल्या अनुभवाला एक गोष्ट आलेली असेल. एखाद्या गोष्टीच्या Converse ची. उदाहरणार्थ : एखादी व्यक्ती एक संपूर्ण तप (१२ वर्षे) सगळ्या परिस्थितींमध्ये फ़क्त खरेच बोलली, १२ वर्षांच्या काळात त्या व्यक्तीच्या मुखातून कुठल्याही परिस्थितीत, कधीही खोटी गोष्ट निघालीच नाही तर १२ वर्षांनंतर त्या घटनेचा Converse खरा व्हायला सुरूवात होते. १२ वर्षांनंतर त्या व्यक्तीच्या मुखातून निघालेली प्रत्येक गोष्ट खरीच होत जाते. आपण सर्वसामान्य त्या घटनेला "एखाद्याला / एखादीला "वाचासिद्धी प्राप्त झाली" म्हणतो ते हेच. पण या सिद्धीसाठी एक तप किती खडतर आयुष्य त्या व्यक्तीने जगलेय हे आपल्या लक्षातच येत नाही.


तसेच या घटनेचे आहे. श्रीसूक्त आणि श्रीविष्णुसहस्रनामस्त्रोत्राची फ़लश्रुती म्हणून " न क्रोधो न च मात्सर्यम, न लोभो न अशुभा मती:" लाभण्यापेक्षा आपण जर क्रोध, मत्सर, लोभ आणि अशुभ मतीपासून स्वतःहून जाणीवपूर्वक दूर राहिलो तर आपल्याला श्रीसूक्त आणि श्रीविष्णुसहस्रनाम खरोखर लाभेल हा Converse खरा होईल असे मानून का चालू नये ? त्याप्रमाणे का वागू नये ?



मित्रमैत्रिणींनो, आप्तांनो, सुहृदांनो उद्यापासून चातुर्मास सुरू होतोय. परम पूजनीय ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर आपल्या उपदेशात म्हणतात त्याप्रमाणे अशा शुभ दिवशी आपण एखादा संकल्प केला तर तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत आपल्या सहाय्यास तत्पर असतो. मग करायचा या चातुर्मासात हा संकल्प ? " न क्रोधो न च मात्सर्यम, न लोभो न अशुभा मती:" 


कुणी सांगाव ? चातुर्मास संकल्प आपल्या अंगवळणी पडला आणि तशी फ़ळे आपल्याला मिळू लागली की आपण हा संकल्प आपल्या आयुष्य़भरही चालवू. ज्ञानोबामाऊलींच्या स्वप्नातली "ईश्वरनिष्ठांची मांदियाळी" साकार करायला हातभार लावणारे आपणही एक असूत.

करायचा न मग असा संकल्प ?

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर.
(आषाढ शुद्ध दशमी, शके १९४४, दिनांक ०९/०७/२०२२)

No comments:

Post a Comment