Sunday, July 10, 2022

परवडणारी आणि कार्यक्षम वाहतूक : काळाची गरज.

परवा सहज इथे उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मधल्या जनसामान्यांच्या लोकप्रिय वाहनाविषयी पोस्ट टाकली . ती सगळी प्रकाशचित्रे इंदूर उज्जैन देवास भागात मी २०१० मध्ये गेलेलो असताना काढलेली होती. परम पूजनीय नाना महाराज तराणेकरांकडे, आमच्या गुरूगृही, इंदूरला आमचे पहिल्यांदा २००५ मध्ये जाणे झाले त्यानंतर वर्षातून एक दोन वाऱ्या होतच असतात. मधल्या काळात कोरोनामुळे त्या वाऱ्या हुकल्यात तेव्हढ्याच. 

इंदूर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळून बघितली, अनुभवली. सर्वासामान्यांना परवडणारी अशी ही वाहतूक व्यवस्था होती आणि अजूनही आहे. २००५ मध्ये शहरातली बरीच लांबलांबची अंतरे या "डुक्कर" मधून फक्त २ रुपयात पार करता येत होती. २०१० मध्ये "अटल इंदूर बससेवे"च्या शहर बस थांब्यांवर जीपीएस प्रणालीने पुढली बस कुठली, किती वेळात येणार ? इत्यादी माहिती सहज मिळू शकता होती आणि बऱ्याच लांब अंतरासाठी तिकीटदर केवळ ५ रुपये ते १० रुपये इतका माफक होता. बरे केवळ बसेसच नाहीत तर छोट्याछोट्या मारुती व्हॅन्स टॅक्सी मधून शेअर प्रवास करणेही बसच्या भाड्याइतकेच होते आणि म्हणूनच सर्वसामान्यांना परवडण्याजोगे होते. 





रोजच्या वाहतुकीचे विविध पर्याय माफक दरात आणि खात्रीशीर पद्धतीने उपलब्द्ध असलेत की त्या शहराची औद्योगिक वाढ आणि भरभराट होत जाते. मुंबई शहर हे त्याचे जिवंत उदाहरण. कामगार वर्गाला त्यांच्या रोजच्या जीवनातला संघर्ष थोडातरी कमी करणारा, असा खात्रीशीर, सोयीचा आणि माफक दरातला वाहतूक पर्याय  कायमच आवडतो. त्यामुळेच इंदूर शहराच्या आसपास अनेक औद्योगिक आस्थापने स्थिरावलीत आणि भरभराटीला आलीत. औद्योगिक आस्थापने भरभराटीला आलीत तारा ते शहरही प्रगतीपथावर असते, शहरातही इत्तर अनेक दुय्यम, तिय्यम दर्जाच्या उद्योगधंद्यांना चालना आणि बळकटी मिळते. १९८५ ते १९९५ पर्यंत औरंगाबाद शहराची अवस्था अशीच प्रगतीपथावर असणाऱ्या शहरासारखी होती. उद्योगधंद्यांबाबतची औरंगाबादची आजची दुरावस्था हा एका वेगळ्याच  लेखाचा विषय आहे. 

मला माझ्या नागपूरची सार्वजनिक वाहतूक डोळ्यांसमोर आली. शहर बस सेवा जेव्हा एस टी कडे होती तेव्हा बरी होती असे म्हणण्याची वेळ महापालिकेने ही बससेवा ताब्यात घेतल्यानंतर (आणि खाजगी ऑपरेटर्स नेमून त्यांना चालवायला दिल्यानंतर) नागरिकांवर आलेली आहे. रिक्षा टॅक्सी ही कधीमधी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच परवडण्याजोगी नाही तर रोज प्रवास करणाऱ्या कष्टकरी वर्गाला रोज कशी परवडेल ? मेट्रो आल्यानंतर काही फरक पडेल असे वाटले होते पण मेट्रो स्टेशन्सपर्यंत जाण्यायेण्यासाठी अजूनही स्वतःचे वाहन वापरणेच सोयीस्कर ठरते आहे. "फीडर सेवे"ला अजूनही विचार आणि बळकटी मिळालेली नाही. नागपूरच्या आसपास न झालेल्या, रखडलेल्या औद्योगिक विकासासाठी नागपूरची अत्यंत अकार्यक्षम आणि महाग अशी सार्वजनिक वाहतूक सेवा कारणीभूत आहे यावर सर्व नागपूरकरांचे एकमत होईल. अशावेळी नाईलाजाने सगळ्या नागरिकांना स्वतःचे वाहन (दुचाकी किंवा चारचाकी) असणे गरजेचे न वाटले तरच नवल. पर्यायाने शहरात प्रचंड वाहनसंख्या, प्रदूषण, खोळंबा, व्यापारी भागामध्ये पार्किंगची अत्यंत गहन  समस्या इत्यादींना आपण तोंड देतोय.




सर्वदूर पोहोचणारी, परवडण्याजोगी, आणि अत्यन्त कार्यक्षम अशी वाहतूक व्यवस्था ज्या शहरात असेल तीच शहरे विकासपथावर अग्रेसर असतील. इतर शहरांची औरंगाबाद प्रमाणे हळूहळू भकास अवस्था होत जाईल हे तत्व राज्यकर्त्यांनी, नगरपित्यांनी आणि नगर नियोजनकर्त्यांनी जितक्या लवकर लक्षात घेतली तितके बरे होईल. 

- गेल्या २५ वर्षांपासून वाहतूक अभियांत्रिकी हा विषय शिकवणारा एक शिक्षक, बसगाड्या आणि रेल्वेवर बालपणापासून अत्यंत प्रेम असलेला एक निःसीम प्रेमी आणि  या क्षेत्रात सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी भरीव कार्य  करू इच्छिणारा वाहतूक अभियांत्रिकी तज्ञ प्रा. राम प्रकाश किन्हीकर. 

No comments:

Post a Comment