आमच्या बालपणी जेव्हा जेव्हा आम्ही एस. टी. चा प्रवास करायचोत तेव्हा तेव्हा आम्हाला बसमधले आरक्षण करावे लागत असे. मग तो प्रवास नागपूर ते चंद्रपूर किंवा नागपूर ते यवतमाळ असा तीन तासांचाच का असेना. खाजगी बसेसचा उदय होण्यापूर्वीचा तो काळ. त्यामुळे प्रवासासाठी या मार्गांवर दर अर्ध्या तासाला बस असली तरी प्रवाशांची गर्दी कायमच असायची. त्यामुळे आगाऊ आरक्षण करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्या आरक्षित तिकीटांच्या मागील बाजूला आरक्षित तिकीटांसंबंधी विविध नियम छापलेले असत. त्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) आराम गाड्यांचा आणि वातानुकुलित गाड्यांचा उल्लेख होता. आरक्षण रद्द करण्याविषयीच्या नियमांमध्ये हा उल्लेख येई.
आम्ही वैदर्भिय मुलांनी साधी, जलद, अति जलद आणि १९८२ नंतरच्या काळात निम आराम एव्हढ्याच प्रकारच्या गाड्या बघितलेल्या होत्या. त्यामुळे या आराम, वातानुकुलित, शयनयान वगैरे गाड्यांविषयी, त्यांच्या आसनव्यवस्थेविषयी, त्यांच्या एकंदर दिसण्याविषयी आमच्या मनात अपार कुतुहल असे. आमची मावशी कोकणात राहून आल्याने अशा प्रकारच्या गाड्या तिने बघितलेल्या होत्या. त्याकाळच्या सावंतवाडी - मुंबई या शयनयान गाडीचे किंवा कोकणमार्गे जाणा-या मुंबई - महाबळेश्वर वातानुकुलित बसगाडीचे वर्णन आम्ही तिच्याकडूनच ऐकले होते. मग या प्रकारच्या गाड्यांविषयीचे आमचे कुतुहल आम्ही तिला अनेक प्रश्न विचारून शमवून घेत असू. पण शेवटी शब्दांनी केलेले वर्णन ते शब्दांनी केलेले वर्णनच. त्याला दृकश्राव्यतेची जोड थोडीच येणार ? या प्रकारच्या गाड्यांच्या दर्शनाची आमची भूक अपुरीच राहिली.
१९९५ मध्ये मुंबईला प्राध्यापकी करायला गेलो आणि मग आपल्या एस. टी. च्या डिलक्स, वातानुकुलित वगैरे दर्जाच्या बसगाड्यांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ लागले. आमच्यातला बसफ़ॅनची उत्सुकता शमल्यामुळे तो सुखावला. अर्थात तोवर एस. टी. ने आपल्या शयनयान दर्जाच्या गाड्या बंद केलेल्या होत्या.
ही आपल्या एस. टी. च्या सेवेतली डिलक्स बस आहे. या बसेसनी दादर - पुणे किंवा परळ – पुणे मार्गावर दीर्घकाळ वर्चस्व गाजविले होते..
१९८२ च्या नवी दिल्ली एशियाडसाठी तयार केलेल्या निम आराम (एशियाड) बसेसनी जवळजवळ ९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी सेमी लक्झरी (म्हणजेच आशियाड / आताचे ब्रॅंडनेम "हिरकणी") सेवा यशस्वीपणे दिल्याल्यानंतर, आपल्या एस. टी. ने २ x २ आसनरचनेच्या अशा डिलक्स लक्झरी बसेस सुरू केल्या. या बसेस यांच्या पूर्वसुरीसारख्या (एशियाड बसेससारख्याच) दादर -पुणे / परळ – पुणे मार्गावर दर १५ मिनिटांच्या अंतराने धावू लागल्या.
या बसेस आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी आणि मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) येथील कार्यशाळांमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे एकही बस तयार करण्यात आलेली नव्हती आणि विदर्भ विभागात या प्रकारच्या बसेसची एकही फेरी (शेड्युल) नियोजित करण्यात आलेली नव्हती.
पुणे स्टेशन – दादर
MH 20 / D 3375
अशोक लेलँड चित्ता मॉडेल
मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) येथे बांधलेली.
२ x २ आसन व्यवस्था असलेली लक्झरी बस. उंच पाठ असलेली आसने, कापडी (फॅब्रिक) अपहोल्स्ट्री आणि प्रत्येक खिडकीजवळ बसवलेले पंखे अशी सुविधा या बसमध्ये होती.
एकूण आसनसंख्या ४३ (४२ प्रवासी + १ कंडक्टरसाठी केबिनमध्ये आसन).
मुं. परळ डेपो (मुंबई विभाग परळ आगार)
सर्व टाटा डिलक्स बसेस पुणे विभागातील स्वारगेट किंवा शिवाजीनगर आगारांना ठेवण्यात आल्या होत्या, तर सर्व अशोक लेलँड डिलक्स बसेस मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला नेहरू नगर आगारांना देण्यात आल्या होत्या.
हा फोटो फेब्रुवारी १९९९ मध्ये राजमाची पॉइंट येथील ब्रेक टेस्टिंग स्टॉपवर काढलेला आहे. या राजमाची पॉईंटनंतर पुण्याहून मुंबईकडे येणा-या रस्त्यावर खंडाळा घाटातला सगळ्यात तीव्र उतार आणि अत्यंत तीव्र वळणांचा रस्ता होता. त्यामुळे या ठिकाणी पुणे ते मुंबई जाणा-या सर्व बसेसना थांबवून बसेसची आणि चालकाच्या अवस्थेची चाचणी होत असे. तिथे जवळच एस. टी. चे एक छोटेखानी शेडवजा ऑफ़िस होते. तिथे एस. टी. ची अधिकारी मंडळी, गरज भासली तर बदली चालक आणि बसेसची तंत्रज्ञ मंडळी बसलेली असत. घाट सुरू होण्यापूर्वी घाटातून उतरणा-या प्रत्येक बसची संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच बस पुढे रवाना व्हायची.
येथे स्पष्ट करावेसे वाटते की हा फोटो डिजिटल कॅमे-याने नव्हे, तर कोडक K-10 या नॉन-डिजिटल कॅमेऱ्याने टिपलेला आहे. तो आधी छापण्यात आला आणि नंतर २००६ मध्ये स्कॅन करून फ्लिकरवर पोस्ट करण्यात आला.
मी, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ऐरोली, नवी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना, दरवर्षी खंडाळा येथे आयोजित होणाऱ्या सिव्हील इंजीनीअरींग सर्व्हे कॅम्पचा भाग असायचो. खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटजवळच असलेले सेंट झेवियर्स व्हिला हे आमचे बेस स्टेशन व निवासाची जागा असे. काम सुरू होण्यापूर्वी किंवा दिवसाचे काम संपल्यानंतर आम्हाला छायाचित्रणासाठी भरपूर संधी मिळत असत.
राजमाची पॉइंट हा रेल्वे गाड्या, बोगदे, द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ यांच्या दृश्यांच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. माझ्यासारख्या बस आणि रेल्वेप्रेमी व्यक्तीसाठी या सर्व्हे कॅम्पमधला माझा सहभाग हा एक आठवड्याचा खरा आनंदोत्सवच असे.
आता आजच्या युगात नवनव्या प्रकारच्या आराम, वातानुकुलित, शयनयान गाड्या आल्यात ख-या. पण या डिलक्स बसेसची बांधणी आणि एकूणच रस्त्यावर धावत असताना त्यांचा एकंदर रूबाब हा अतुलनीय होता हे मात्र प्रत्येक बसफ़ॅन मान्य करेल.
- बसेस आणि रेल्वेंवर जीव ओवाळून टाकणारा, अशा सुंदरींच्या एका दर्शनासाठी तासन तास वाट बघत उभा असलेला एक बस आणि रेल्वे आशिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
१ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६

