पु.लं. नी लिहीलय की, " "नव्हत" जर शुद्ध, तर "व्हत" अशुद्ध कसे ?"
तसाच अनुभव आज मला आला. मी संगणकावर मराठी वापरताना "बरहा" वापरून टाईप करतो. यात "देईल" टाईप करताना जर दे आणि ईल या दोन शब्दांमध्ये स्पेस बार न दाबता सलग टाईप केले तर "दील" असच टाईप होत. तशीच बाब येईल ची. त्याचे "यील" असे टाईप होते. उच्चाराप्रमाणे (फ़ोनेटीक पद्धतीप्रमाणे) "दील", "यील" हेच शब्द शुद्ध ठरलेत की नाही मग. तसेच "होऊ"हा शब्द सलग टाईप करताना "हू"असेच टाईप होते. मग "हुशील" हेच शुद्ध झाले की नाही ? "होशील" हे शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध असेलही पण मौखिक ज्ञानग्रहणची आपली प्राचीन परंपरा खरी मानली तर "हुशील" हे सुद्धा अशुद्ध नाही हे आपल्या लक्षात येईल.
मग तसा निष्कर्ष काढला तर आपल्या ग्रामीण भागात राहणारे आपले बांधवच खरी भाषा बोलताहेत की. आपण ग्रामीण भागातल्या कुणी असे बोलले तर ते अशुद्ध म्हणून धरतो. पण कदाचित पारंपारिकतेने चालत आलेल्या मौखिक ज्ञानग्रहण परंपरेत त्यांच्या कानांवर पडणा-या भाषेचे ग्रहण त्यांनी अशाच प्रकारे केले असेल आणि भाषा ते अशीच शिकली असतील तर ती अशुध्द आहे हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला ?
मला तरी वाटते की आपण उगाचच शुध्दलेखनाने कृत्रिम रिफाईंड केलेली भाषा वापरतोय. खरी शुध्द भाषा हीच मंडळी वापरताहेत. त्यांची हेटाळणी उपयोगाची नाही. "दील, यील " सारख्या अनेक शब्दांचे एक प्रकारचे कृत्रिम रूपांतरण "देईल, येईल" असे नंतरच्या काळात मराठीत झाले असण्याची शक्यता आहे.
सांगोला येथील आमच्या मुक्कामी अशीच गोड भाषा कानांवर पडायची. मला आठवते कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना माझे काही सोलापूर जिल्ह्यातले मित्र अशी हेल काढून भाषा बोलायचेत. "ए..... किन्हीक....र. ये की लेका. ये ना बे कडू." तेव्हा तरूण वयात त्यांचा तो हेल आणि ती लकब मला थोडी अपमानास्पद वाटायची. आपण कुठलीही एखादी नवीन गोष्ट त्यांच्या ग्रूपमध्ये मांडायला सुरूवात केली की त्यांची पहिली प्रतिक्रिया असायची. "खरं...?" ह्याचा पण मला तेव्हा फ़ार राग यायचा. "अरे, खरं नाही तर खोटं सांगतोय का मी ?" अशी स्वाभाविक प्रतिक्रिया मनात उमटायची. जशी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातल्या एका प्रहसनात अरूण कदमांनी "अच्च लिहीलय ?" असे विचारल्याबरोबर पृथ्वीक प्रताप भडकतात तसे मला माझ्या त्या मित्रांवर भडकावेसेही वाटायचे. अर्थात सार्वजनिक जीवनात, उपक्रमात आपण काम करीत असताना आपल्या भावभावना थोड्या नियंत्रणात ठेवाव्या लागतात. माणसे जोडायची असली तर ब-याचदा आपल्या मनाला, मतांना मुरड घालावी लागते हे तत्व मला माहिती होते म्हणून ही मनातली नाराजी मी चेहे-यावर किंवा वर्तनात दिसू देत नसे पण माझ्या मित्रांचा तो हेल खटकायचा हे नक्की.
पण सोलापूर जिल्ह्यात नोकरीला गेलो. तोपर्यंत फ़ार जास्त काळ इतर जगाचा भलाबुरा अनुभव येऊन गेलेला होता त्यामुळे यावेळी त्या हेलामागची, त्या लकबीमागची त्या भागातल्या भाषेची आत्मीयता कळली आणि तो हेल चक्क आवडायला लागला. मनातल्या मनात मी महाविद्यालयात शिकत असताना ज्या ज्या मित्रांचा मला त्या भाषेबद्दल राग आला होता त्या सर्वांची मी मनातल्या मनात माफ़ीही मागून घेतली. यावेळी मुलीच्या मैत्रिणींकडून आणखी एक हेल कळला. ती तिच्या छोट्या मैत्रिणींना काही काही शहरी गोष्टी सांगायला जायची. तोपर्यंत शहरी जीवनाशी फ़ारसा संबंध नसलेल्या आणि सोलापूर म्हणजेच एक मोठ्ठे शहर असे जग बघितलेल्या तिच्या छोट्या मैत्रिणी तिच्या वर्णनाची थोडी अविश्वासात्मक संभावना "हुई, हुई, असं कुटं असतय व्हई ?" अशी करायच्यात. सुरूवातीला माझ्या लेकीला त्या तिच्या मैत्रिणी काय बोलतायत हे कळतच नसे. मग मी तिला त्या बोलीभाषेतल्या खाचाखोचा समजावून सांगायला लागलो आणि तिला त्यांच्यातला तिच्या कथनावरचा अविश्वास कळल्यानंतर, मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात या बोलीभाषेविषयी जो गैरसमज करून घेतला होता तो तिचा होऊ नये म्हणून तिचे समुपदेशन करायला लागलो.
मला वाटते आज मराठी भाषा टिकून आहे ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात बोलल्या जाणा-या असंख्य बोलीभाषांमुळे. शहरी भागात आपण मराठीवर इंग्रजीचे आणि हिंदीचे इतके अतिक्रमण करून घेतले आहे की आपली मराठी शुद्ध आणि प्रमाणभाषा आहे हे आपण म्हणूच शकत नाही. याचे अत्यंत चपलख उदाहरण म्हणजे आपण जेव्हा गॅसचा नंबर लावतो तेव्हा आपल्या गॅसचा नंबर लागलाय हे सांगताना ती फ़ोनवरची बाई / मुलगी आपल्या गॅसचा नंबर जो सांगते त्याला मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेत बसवता येत नाही. "सहा - टू - एक - पाच - फ़ोर - शून्य" असे दरवेळी ऐकायला मिळते. गेली ५ - ६ वर्षे हा प्रकार सुरू असूनही त्याबद्दल अजूनपर्यंत राज ठाकरेंकडे कुणी तक्रार कशी केली नाही याचेच मला आश्चर्य वाटते.
असो. तर आपण महाराष्ट्रात फ़िरत असताना तिथल्या तिथल्या बोलीभाषा समजून घेऊयात, त्यांच्यातला गोडवा आस्वादूयात आणि आपली मराठी अनेक शतके टिकवल्याबद्दल त्या सर्व बांधवांचे मनापासून आभार मानूयात. दुस्वास, दुराभिमान वगैरे गोष्टी जरा दूरच ठेवूयात. काय म्हणताय मग ?
- गडचिरोली पासून थेट कसालपर्यंत आणि अक्कलकुव्यापासून थेट मांजरसुंब्यापर्यंत सगळा महाराष्ट्र डोळसपणे फ़िरलेला आणि तिथल्या तिथल्या बोलीभाषा ऐकून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणारा, त्या भाषांवर प्रेम करणारा आपला एक छोटा भाषाशास्त्रज्ञ रामशास्त्री.
२१ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६


















.jpg)





