Wednesday, August 10, 2022

भारतीय शयनयान बसेसबद्दल

१९९० च्या दशकात महाराष्ट्रात खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचा सुळसुळाट सुरू झाला आणि त्यानंतर साधारण दशकभराने ट्रॅव्हल्स कंपन्यांना १० - १० , १५ - १५ तास प्रवास करणा-या प्रवाशांसाठी शयनयान बसेस आणण्याचे सुचले. त्यापूर्वी नागपूर ते पुणे  किंवा नागपूर ते कोल्हापूर (तळटीप १) हे १७ तास (तळटीप २) , २३ तासांचे प्रवास आसनांवर बसूनच होत होते. कितीही आरामदायक आसने असलीत तरी झोपेसाठी जे शरीराचे एकंदर पोश्चर लागते ते त्यातून मिळत नव्हतेच. मधल्या काळात साध्या आसनांऐवजी पायालाही आधार देणारे आणि सीटसचे रिक्लाइन जास्त होणारे सेमी - स्लीपर कोचेस सुद्धा काही ट्रॅव्हल्स वाल्यांनी आणलेले होते पण स्लीपर तो स्लीपर. सेमी स्लीपरला त्याची सर थोडीच येणार ?

२००० च्या आसपास स्लीपर बसेस दिसू लागल्यात. पहिल्या पहिल्यांदा या बसेस २ बाय २ अशा शयन व्यवस्थेच्या होत्या. एका बे मध्ये खाली ४ शायिका (बर्थस) (उजवीकडे दोन आणि डावीकडे दोन) तर वर ४ शायिका (बर्थस) (तसेच उजवीकडे दोन आणि डावीकडे दोन) असे ८ बर्थस असायचेत. एकूण ५ बे मध्ये ४० प्रवाशांची दाटी असे. त्या बसेसमध्ये प्रवाशांना ये जा करण्यासाठीची मार्गिका अरूंद असे. शायिकांवर झोपलेल्या आणि ये जा करणा-या प्रवाशांनाही प्रवाशांना गैरसोय होत असे. शिवाय प्रत्येकच शायिका ही दोन व्यक्तींची असल्याने एकट्यादुकट्या प्रवास करणा-या व्यक्तीसाठी तितकीशी सोयीची नव्हती. शिवाय प्रत्येक शायिका अरूंद असल्याने आजकालच्या वाढलेल्या सुखवस्तू घरातील ब-याच आकारमानांना त्यावर नीट झोपताही येत नसे. 

मग साधारण २००८ -०९ च्या सुमासास सध्याचा २ बाय १ शायिकांचा पॅटर्न आला आणि लोकप्रिय झाला. पण त्या ही काळात कोल्हापूरचे घाडगे पाटील यांची मोहन ट्रॅव्हल्स, हैद्राबादची केसीनेनी ट्रॅव्हल्स आणि खुद्द आंध्र प्रद्रेश मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूल शयनयान बस यांनी १ बाय १ शायिकांचा पॅटर्न राबविला होता. आणि तो लोकप्रियही होता. त्यातही केसीनेनी आणि आंध्र प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची शयन व्यवस्था थोडी वेगळी होती. त्यांच्या शायिका प्रवासाच्या दिशेच्या perpendicular होत्या तर घाडगे पाटील यांच्या स्नूझर बसच्या शायिका महाराष्ट्रातल्या इतर गाड्यांप्रमाणे प्रवासाच्या दिशेला parallel होत्या.

 Kesineni Bus cross section. 4 berths - 6 bay Berths perpendicular to travel direction.



Kesineni's Travels berths. Perpendicular to travel direction. Perpendicular to windows.



Other travels seating plan. Berths parallel to travel direction.




Other Travels berths. Parallel to travel direction. Parallel to windows.

मला कायम आश्चर्य वाटत आलेले आहे की यावर अधिक संशोधन का झाले नाही ? प्रवास केलेल्या प्रवाशांच्या मुलाखती घेऊन, डिझाईन क्ष्रेत्रातल्या दिग्गजांचा सल्ला घेऊन, ergonomy चा विचार करून यावर अधिक संशोधन होऊन त्यानुसार बसगाड्या बांधणा-या कंपन्यांना आणि प्रवाशांनाही हे संशोधन उपलब्ध व्हायला हवे होते. सध्याच्या प्रवासाच्या दिशेच्या parallel शायिकांच्या रचनेत, बसने वेग घेताना किंवा ब्रेक दाबल्यानंतर आपले संपूर्ण शरीर वर खाली होते असा माझ्यासकट सगळ्यांचाच अनुभव आहे आणि प्रवासाच्या दिशेच्या perpendicular शायिका रचनेत बस वेग घेताना किंवा ब्रेक दाबल्यानंतर शरीराची कड उजवी डावी कडे होत असावी. (मी कधी या प्रकारच्या शयनयान बसेसमधून अजूनतरी प्रवास केलेला नाही. केसीनेनीच्या बसने नागपूर ते हैद्राबाद हा प्रवास करण्याचे आम्ही योजिले होते पण तोवर ती बससेवाच त्या कंपनीने बंद केली.) या दोघांमध्ये मानव शरीरासाठी, सुखद झोपेसाठी नक्की काय चांगले ? यावरही वैद्यकीय संशोधन व्हायला हवे.

 

तळटीप १ : नागपूर ते कोल्हापूर जाणा-या सगळ्या गाड्या आज वर्धा - यवतमाळ - नांदेड - लातूर - सोलापूर -सांगली मार्गे ९३० किमी अंतर पार करून जात असल्यात तरी १९९० च्या दशकात नागपूरच्या रॉयल - राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सने या मार्गावर नागपूर - अमरावती - अकोला - चिखली - जालना - औरंगाबाद - पुणे - सातारा - कराड - कोल्हापूर अशी जाणारी आणि एकूण ९९० किमी धावणारी साधी आसनी लक्झरी बस आणलेली होती. त्या काळी नांदेड ते लातूर हा रस्ता अतिशय खराब असण्याची शक्यता आहे आणि या मार्गावर पुरेसे प्रवासी मिळण्याचीही शक्यता पुणे मार्गापेक्षा कमी होती. नागपूर ते कोल्हापूर थेट प्रवासी नसतील तरीही नागपूर - ते पुणे, अमरावती ते पुणे, अकोला ते पुणे असे प्रवासी भरपूर होते आणि पुने ते कोल्हापूर या मार्गावर प्रवाशांचा कधीच तुटवडा पडत नाही हे व्यावसायिक गणित लक्षात घेऊन ही गाडी पुणे मार्गे धाडत असण्याची शक्यता आहे.

 

तळटीप २ : त्याकाळी प्रवासाचा वेळ साधारण असा होता.

 

अ) नागपूर ते अकोला - २५० किमी - ५ तास ते ५ तास ३० मिनीटे. (प्रसन्न ट्रॅव्हल्सची विदर्भ क्वीन नावाची बस हा प्रवास विनाथांबा ४ तास ३० मिनीटात करीत असे. प्रसन्न ट्रॅव्हल्स आणि नागपूर - पुणे प्रवासाचा सांगोपांग इतिहास हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. आता इथे विस्तार नको.)

 

आ) अकोला ते औरंगाबाद - २५० किमी - ६ तास ते ६ तास ३० मिनीटे (मध्ये चिखलीचा जेवणाचा आणि ड्रायव्हर बदलीचा थांबा धरून)

 

इ) औरंगाबाद ते पुणे - २४० किमी - ४ तास ३० मिनीटे ते ५ तास (पुण्यात बस किती वाजता पोहोचतेय यावर हा वेळ कमी जास्त व्हायचा. सकाळी ७ च्या आसपास पोहोचत असेल तर वेळ कमी पण सकाळी ९ नंतर हा वेळ पुण्यातल्या वाहतुकीमुळे जास्त लागायचा.)

 

तर नागपूर ते पुणे प्रवासाला सर्वसाधारण १६ तास ३० मिनीटे ते १७ तास वेळ लागायचा. तर पुणे ते कोल्हापूर प्रवासासाठी ४ तास ३० मिनीटे ते ५ तास लागायचेत.

 

- सर्व खाजगी आणि सरकारी गाड्यांमधून प्रवासाचा दांडगा अनुभव असलेला प्रवासी पक्षी राम प्रकाश किन्हीकर.

 

 

1 comment:

  1. Back in the seventies a bus company was operating buses from Nagpur to Jabalpur! Every night more than 10 buses left for Jabalpur!
    Please do not talk of the MSRTC: totally hopeless!

    ReplyDelete