Thursday, August 11, 2022

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ - काही आठवणी

 १९८९ ते १९९३ पर्यंत कराडला शिकत असताना पुण्याला जाण्याचा बराच योग यायचा. कधी आमच्या अभ्यासाचे I.S. codes आणायला, कधी पाटबंधारे विभागाशी निगडीत एखादा प्रकल्प हातात घेतला असेल तर त्याविषयीचा डेटा, ड्राॅइंग्ज आणायला, कधी COEP तल्या मित्रांना, कराडमधून COEP त बदलून गेलेल्या आमच्या लाडक्या प्राध्यापक मंडळींना भेटायला तर कधी उगाचच.


दरवेळी कराडवरून सकाळी ७ च्या आसपास निघून दुपारी ११ ला पुणे गाठणे, दिवसभर कामे उरकून संध्याकाळी मित्रमंडळींसोबत भटकंती, रात्री त्यांच्याच रूम्सवर विश्राम. (पेठांमधल्या टिपीकल पुणेरी घरमालकांपासून चोरून आम्हाला रात्रभर आसरा देताना त्या बिचार्‍यांचे "बनवाबनवी" तला अशोक सराफ व्हायचेत.)


दुसर्‍या दिवशी मात्र पहाटे पहाटे उठून आम्हाला लवकरात लवकर कराड गाठायचे असे. त्यासाठी आमची पहिली पसंती कर्नाटक राज्याच्या बसेसना असे. कारण महाराष्ट्र एस टी च्या बसेसना ६५ किमी प्रतितासाचे स्पीडलाॅक असे. त्यामुळे पुणे ते कराड प्रवासासाठी महाराष्ट्राच्या गाड्या तब्बल ४ तास घ्यायच्यात. सकाळी ५.३० ची पुणे स्टेशन - राजापूर ही राजापूर डेपोची  आपली लेलँड बस कराडला पोहोचेपोहोचेपर्यंत तब्बल ९.४५ व्हायचेत. त्यामानाने ५.३० ला स्वारगेटवरून निघणारी कर्नाटक राज्याची पुणे - हुबळी ही साधी बस कराडला ८.३० ला पोहोचवायची. एव्हढेच काय ? सकाळी ६.०० वाजता स्वारगेटवरून निघणारी कर्नाटकची पुणे - सौंदत्ती ही बसही आपल्या राजापूर बसला ओव्हरटेक करून सकाळी ९.०० ला कराडला "टच" असायची.





त्याकाळचा, एकाच रस्त्यावरून दुमार्गी वाहतूक असलेला, खंबाटकी घाट चढताना आपल्या बसेसची कसोटी लागायची. त्यामानाने कर्नाटक राज्य परिवहनच्या स्पीडलाॅक नसलेल्या टाटा "झुईझप" निघायच्यात. कधीकधी भीती वाटेल इतका अफाट वेग या गाड्यांना असायचा.


पण पुण्यावरून कोल्हापूरला जाण्यासाठी मात्र जाणकार प्रवाशांची आपल्याच बसेसना जास्त पसंती असायची या एकमेव कारण म्हणजे तुफान वेगात कर्नाटककडे जाणार्‍या (आणि कर्नाटक मधून पुणे - मुंबईकडे येणार्‍याही) बसेस कराडनंतर नेर्ले या गावी, अगदी NH 4 वर असलेल्या, एका ढाब्यावर मात्र तबीयतीने थांबायच्यात. चहा - नाश्ता (कराडच्या दक्षिणेला "नाश्त्या"ला "नाष्टा" म्हणायचं, बर का) किंवा जेवणासाठी फुर्सतीत थांबायच्यात. कोल्हापूरला जाणार्‍या प्रवाशांसाठी आपल्या मुक्कामाच्या फक्त ५० किमी आधी हा खोळंबा अगदीच नकोसा असायचा. म्हणून त्यांची पसंती आपल्या महाराष्ट्राच्या बसेसना असायची.


रात्री कराड / कोल्हापूर / सांगलीवरून निघून मुंबईला जाणार्‍या महाराष्ट्र एस टी च्या बसेस मात्र जेवणासाठी सातारा एस टी कॅण्टीनला थांबायच्यात. त्याकाळी सातार्‍याचे एस टी कॅण्टीन चांगल्या जेवणासाठी प्रसिध्द होते.  मिरज - नाशिक, सोनसळ - मुंबई परळ, कराड केंद्रबिंदू सेवा मुंबई, कोल्हापूर - सटाणा या गाड्या सातारा स्थानकात आल्यात की प्लॅटफाॅर्मवर न लावता प्लॅटफाॅर्मसमोरच्या मोकळ्या जागेत लागायच्यात. पूर्ण प्रवासी खाली उतरलेत की कंडक्टर दादा बस लाॅक करायचेत. अशा बसमध्ये सातार्‍यावरून पुणे, मुंबई, नाशिक साठी कुणी प्रवासी बसू लागला तर कंडक्टर दादा त्याला इथल्या मोठ्या थांब्याची कल्पना द्यायचेत आणि "अहो मागनं सांगली - पुणे" येतेय ती हिच्या आधी निघेल बरं का." म्हणत योग्य मार्गदर्शन करायचेत.


सातारवरून तुडुंब पोट भरलेले प्रवासी बस सातारा स्थानकावरून निघाली की मेढा फाटा येईपर्यंत अगदी पार झोपेच्या राज्यात रममाण होत असत. अशावेळी एस. टी. तर्फे ड्रायव्हर व कंडक्टर (सातारवरून चढलेल्या प्रवाशांची तिकीटे फाडत - हिशेब मांडत) आणि प्रवाशांतर्फे माझ्यासारखा एखादाच बसफॅन जागा असे.


मध्यरात्री केव्हातरी कात्रजचा (जुना) घाट उतरता उतरता पुण्यातला झगमगाट सगळ्यांच्या झोपमोडीला कारणीभूत होत असे. पुण्याचा प्रवास संपत असे.


आज एका कर्नाटक बसफॅन ग्रुपवर हा कर्नाटक राज्य परिवहनच्या टाटा बसचा हा फोटो दिसला आणि मन ३३ वर्षे मागे गेले.


आता कर्नाटक राज्य परिवहनचेही ईशान्य कर्नाटक, वायव्य कर्नाटक, बंगळूर शहर सेवा असे उपविभाग पडलेले आहेत. मूळ कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ आहेच. बसेसचे प्रकार वाढलेत, रंग बदललेत पण अजूनही पहाटे पहाटे स्वारगेटवरून निघून आमच्या काॅलेजच्या वेळेत कराडला पोहोचवणारी बस म्हणजे ही लाल पिवळी परीच डोळ्यासमोर येते.


- आपला विठ्ठलूच "कानडाऊ, कर्नाटकू" असल्याने कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाबाबत प्रेम बाळगणारा महाराष्ट्र एस टी फॅन, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment