सरता संचिताचे शेष I नाही क्षणाचा अवकाश I
भरता न भरता निमिष्य I जाणे लागे II
होता मृत्यूची आटाटी I कोणी न घालू सकती पाठी
I
सर्वत्रांस कुटाकुटी I मागे पुढे होतसे II
मृत्यू न म्हणे हा भूपती I मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती
I
मृत्यू न म्हणे हा करामती I कैवाड जाणे II
मृत्यू न म्हणे कार्यकारण I मृत्यू न म्हणे वर्णावर्ण
I
मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण I कर्मनिष्ठ II
एखाद्या जीवाचे या भूतलावरचे कार्य संपले की एक क्षणार्धही वेळ न लावता मृत्यू त्या जीवाला उचलून नेतो. अशावेळी कुणीही त्या जीवाला पाठीशी घालू शकत नाही. मृत्यूजवळ राजा, सम्राट सगळे सगळे अगदी समान असतात. तो त्या जीवाला नेताना वर्णाप्रमाणे, कर्माप्रमाणे भेदभाव करीत नाही, एखाद्याचे कुठले कार्य या पृथ्वीतलावर अपूर्ण राहिले हे जाणून त्या जीवाला जास्तीचा वेळ देत नाही.
ग्रंथराज श्रीमद दासबोधाच्या तिस-या दशकाच्या मृत्यूनिरूपण
नावाच्या नवव्या समासात श्रीसमर्थ सर्वशक्तीमान मृत्यूचे सामर्थ्य आणि इहलौकिकाची देहापर्यंतच
असलेली सीमा वर्णन करून सांगताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(भाद्रपद शुद्ध प्रतिपदा, शके १९४४
, दिनांक २८/०८/२०२२)
No comments:
Post a Comment