१९७७ सालाचा ऑगस्ट महिना असावा. शाळेचा आत्यंतिक कंटाळा असणारा एक मुलगा पहिल्या वर्गातून त्याच्या वर्गशिक्षिका बाईंची नजर चुकवून मध्येच पळाला आणि शाळेबाहेर थांबून घरी जाण्यासाठी रिक्षा शोधू लागला. शाळेतून अशाप्रकारे पळण्याचा हा त्याचा काही पहिला अनुभव नव्हता. त्यापूर्वीही घराजवळच्या बालकमंदिरात त्याला घालण्याचे दोन तीन प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. बालकमंदिरात त्याला सोडून त्याची आई परत फिरली की तो बालकमंदिरातल्या बाईंच्या आणि घरी परतणाऱ्या आईच्याही नकळत घरापर्यंत परतत असे. फक्त त्यांच्या तत्कालीन वाड्यासमोर एक सांडपाण्याची नाली होती ती ओलांडणे त्याला शक्य होत नसे. तिथे पोहोचून तो आईला आवाज देत असे. असे प्रकार दोनतीन वेळा झाले त्यामुळे त्याला बालकमंदिरात पाठविण्याचा नाद त्याच्या पालकांनी सोडून दिला.
तसा तो मुलगा बालपणापासूनच चंट , चुणचुणीत, चुरूचुरू बोलणारा. फक्त शाळेचा त्याला भयंकर कंटाळा. त्यामध्ये अभ्यासाच्या कंटाळ्यापेक्षाही शाळेच्या वेळात आपल्या अत्यंत लाडक्या आईचा होणारा विरह हेच मुख्य कारण असावे कारण नंतर समज आल्यानंतर त्याने शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नव्हता. त्याच्या चुणचुणीतपणावर विश्वास ठेवूनच त्याच्या आईवडिलांनी वयाच्या सहाव्या वर्षी नागपूर ते चंद्रपूर हा आजोळचा प्रवास संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत एस टी बसमध्ये अगदी एकट्याने करण्याइतपत त्याच्यावर विश्वास टाकला होता.
पण आता मात्र तो शाळेतून पळाला होता आणि त्याने घरी येण्यासाठी एक सायकल रिक्षाही ठरवली. रिक्षात बसून मोठ्या ऐटीत घरी जात असताना रिक्षावाल्याने त्याला विचारले असावे, " बाबू, कामून पळत गा ? अन कोठीसा जाच हाय तुले ? " त्यान पत्ता वगैरे व्यवस्थित सांगितला आणि म्हणाला , "काका, मला शाळा आवडत नाही. मी पायीपायी सुद्धा घरी जाऊ शकतो पण मध्ये तो सेंट्रल एव्हेन्यू रस्ता आहे ना तिथे खूप ट्रक बस वगैरे वेगाने येत जात असतात. मला तिथे काही अपघात झाला आणि समजा मी मेलो तर माझी आई माझ्यासाठी घरी अन्नपाणी घेणार नाही आणि ती पण आपला प्राण देईल. म्हणून तुमच्या रिक्षात मी येतोय.
इसवी सन १९८९. ऑगस्ट. हाच मुलगा १२ वीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ११०० किमी दूर असलेल्या गावी निघाला होता. त्यावेळी त्याच्या जाण्याच्या दोन दिवसांपासून त्याच्या आईच्या डोळ्यातले पाणी खळता खळत नव्हते. त्यानेही "आपण आता मोठे झालोत. छे ,आता असे रडणे आपल्याला शोभणार नाही" म्हणून सावरलेला बांध शेवटी त्याच्या प्रवासाच्या दिवशी फुटला होता. प्रवासाला निघण्यापूर्वी मायलेक एकमेकांच्या गळ्यात पडून रडले होते. तिला मुलगी नव्हती त्यामुळे मुलीच्या लग्नानंतर तिच्या पाठवणीचा समारंभ तिने असा जगून घेतला असावा.
तिच्या विरहाची कल्पनाही सहन न होणारा आणि स्वतःच्या जाण्यानंतर ती पण प्राण त्यागेल तर कसे होईल ? म्हणत कासावीस होणारा मुलगा मोठा झाला. आज ती जाऊन ४ महिने झालेत तरी तो मात्र अजूनही जिवंतच आहे. त्याचे स्मशानवैराग्य महिना, सव्वा महिना टिकले पण आता त्याच्यासकट सगळ्यांची जगरहाटी पूर्वीसारखीच सुरू झाली. "कुणाचेच आईवडील आयुष्याला पुरत नाहीत." "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि" हे सगळं माहिती असलेला, क्वचित आपल्या प्रवचनांमधून तसा उपदेश करणारा तो मुलगा मात्र आजही आपली १९७७ मधली निरागसता, प्रेम शोधतो आहे आणि "आपण मोठे होऊन नेमके काय कमावले ? आणि काय गमावले ? याचा हिशेब मांडतो आहे.
- प्रेमाच्या बाबतीत कायम बेहिशेबी पण कृतज्ञ असलेला, भावनाप्रधान हृदयाचा आणि कायम बालक राहण्याची आकांक्षा बाळगणारा गृहस्थ, राम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment