दरवर्षी पोळा, तान्हा पोळा आला की बाहेर पाऊस असो किंवा नसो, मनात आठवणींचा पाऊस बरसू लागतो.
पोळ्याच्या दुसर्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा असतो. बालगोपाल आपापले लाकडी बैल घेऊन त्यात खूप उत्साहाने सामील होत असतात. दरवर्षी या एकाच दिवशी हे लाकडी बैल माळ्यावरून अडगळीतून निघत असल्याने दरवर्षी त्यांची रंगरंगोटी अपरिहार्य असते. पोळ्याच्या एकदोन दिवस आधीपासून हे रंगरंगोटीचे काम सुरू होते. नागपुरातल्या महाल भागात या हंगामी व्यवसायासाठी खूप तात्पुरती दुकाने लागत असतात.
खाली मोठे पोते अंथरलेले. त्यावर रंगविण्यासाठी आलेले लाकडी बैल. छोटा भाऊ त्यांना सबंध पांढर्या रंगात रंगवणार. ते वाळल्यावर त्यांना मी झूल, वेसण, शिंगे रंगवणार आणि ते वाळल्यानंतर मग आमचे दादा त्याच्यावर झुलीवरचे बारीक डिझाईन, त्यावरची सोनेरी वेलबुट्टी, बैलांचे बेगड, बैलांचे डोळे वगैरे बारीक रंगकाम त्यांच्या विलक्षण कौशल्याने करणार. त्यांची हस्तकला, रंगसंगतीची कलादृष्टी इतकी विलक्षण होती की काही तासांमध्येच त्यांची ख्याती पूर्ण बाजारात पसरत असे आणि आमच्या दुकानाभोवती खूप गर्दी होत असे. कधीकधी गर्दी इतकी वाढत असे की त्यातले काही बैल रंगकामासाठी आम्हाला आमच्या घरी घेऊन जाऊन रात्री रंगवावे लागत.
दोनतीन दिवस सकाळी ८.०० ते रात्री ८.०० असे अविरत काम केल्यानंतर आम्ही तान्ह्या पोळ्याच्या दुपारी ४ वाजता दुकान आटोपते घेऊन आमच्या घरच्या तान्ह्या पोळ्याच्या तयारीला लागत असू. त्याकाळचे २००, २५० रूपये नफा सहज होई. एवढा नफा पुढे येणार्या गणपती - महालक्ष्म्यांच्या खर्चाला पुरवठ्याला येई. घरच्या आर्थिक ओढाताणीला आपण काहीतरी उपयोगी पडू शकतो ही जाणीव आमच्या इवल्याइवल्या छात्या उगाचच रूंद करून जाई.
काल सहज महालात गेलो तेव्हा हे असे नंदीबैल विकणारा विक्रेता दिसला. मन ४० - ४२ वर्षे भूतकाळात गेले.
फोटो काढताना फोटो धूसर आलाय असे वाटले. फोन जुना झालाय, कॅमेरा क्वालिटी घसरलीय असे वाटून गेले पण घरी येऊन पुन्हा मोबाईल गॅलरीत फोटो पाहिल्यानंतर कळले की कॅमेरा धूसर नव्हता तर आपल्या वडीलांच्या आईच्या, आपल्यासाठी काढलेल्या, कष्टांच्या आठवणींनी डोळेच पाणावले होते आणि भूतकाळात गेलेले मन धूसर झाले होते.
- स्पष्ट आठवणींचा आणि जाणिवेचा, धूसर राम.
No comments:
Post a Comment