एखाद्या तालुक्याच्या ठिकाणाहून तालुक्यातल्याच एखाद्या छोट्या गावाला जाऊन रात्री तिथेच मुक्काम करणारी बस म्हणजे "हॉल्टिंग बस" आपल्या महाराष्ट्र एस टी ने ब-याच वर्षांपासून ही संकल्पना अंमलात आणलेली आहे. दिवसभर शहरात विविध कामांसाठी भटकून संध्याकाळी उशीरा शहरातली ती कामे आटोपून गावाकडे परत फ़िरणारे गावकरी या बसचे प्रवासी असत. मधल्या ब-याच गावांवरून जाणारा मार्ग घेत घेत ही बस रात्रीपर्यंत तालुक्यात एका टोकाला असलेल्या आपल्या गंतव्य स्थळी जात असे. बसच्या चालक आणि वाहकांच्या मुक्कामाची सोय एक तर ग्रामपंचायतीत होत असे. तिथे त्यांनी सोबत आणलेल्या शिदो-यांसोबत गावातल्या एखाद्या सज्जन सदगृहस्थाकडला एखादा विशेष पदार्थ काही सणा समारंभानिमित्त त्यांच्या ताटात सन्मानाने विराजमान असे. अशा गावातल्या यात्रा, जत्रेनिमित्त असलेल्या भंडा-यातही बसच्या चालक वाहकांचा सक्रिय सहभाग असे. त्यांच्या कर्तव्याचा गावात मान असे.
सकाळी सकाळी गावातल्या तालुक्याच्या गावात, शहरात सकाळची शाळा असणा-या विद्यार्थ्यांसाठी, रोजंदारीची कामे, बिगारी कामे करणे आणि इतरही कामांसाठी शहरात लवकर जाऊ इच्छिणा-या कामगारवर्गासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त असे.
काळ बदलला. गावाकडली माणसे गावाकडला मोकळेपणा सोडून शहरातल्या बकालपणात रहायला गेली. गावाकडून शहरात जाण्यायेण्याची रोजची धडपड आणि गरज संपली. एस टी तले चालक वाहक आपल्यासारखेच मानव आहेत. त्यांचे घरदार सोडून ते बिचारे जनतेच्या सेवेसाठी अशा मुक्कामाच्या बसमध्ये येऊन अडनिड्या गावात राहताहेत ही जाणीव संपली. "त्यात काय झालं ? त्यांचे कर्तव्यच आहे ते. त्यांना पगार मिळतोय त्या कामाचा." अशी थोडी कृतघ्न व्यवहारी जाणीव बहुतांशी गावक-यांच्या मनात डोकावू लागली. एस टी च्या चालक वाहकांना त्यांच्या घरून भर दुपारी करून दिलेला डबा रात्रीपर्यंत पापडासारख्या झालेल्या पोळ्या, थंड पडलेल्या कालवणासोबत कुस्करून रात्री बेरात्री त्या दोघांमध्येच खावा लागू लागला. गाडीतलाच बाकडा उचलून त्याचा बर्थ करून डासांच्या त्रासामध्ये अपुरी झोप घ्यावी लागू लागली. आपुलकी, दुस-याच्या दुःखाची, त्रासांची जाणीव फ़क्त शहरातच आटली असे नाही, गावाकडेही तेच चित्र दिसू लागले. अन्न विक्रय सुरू झाला. भगवंतांनी सांगितलेले कलियुगाचे एकेक लक्षण 5000 वर्षांनंतर प्रत्यक्षात दिसू लागले.
26 नोव्हेंबर, 2010 चा हा फ़ोटो.
स्थळ : कारंजा (घाडगे) {तत्कालीन राष्ट्रीय महामार्ग 6 वरचे}
वेळ : सकाळी 6 वाजून 53 मिनीटे
कारंजा तालुक्यातल्या कुठल्यातरी खेड्यातून कारंज्याला येत असलेली ही हॉल्टिंग बस. गच्च भरलेली ही बस पाहून मन पुन्हा 70 आणि 80 च्या दशकात गेले. गाडीत बसलेल्या गावक-यांची उत्सुकता वाचून मनाला खरोखर आनंद झाला.
MH - 31 / W 9863
व. वर्धा डेपो
वर्धा विभागातल्या डेपोंची टिपीकल काळ्या ग्रिलभोवतीची पिवळी बॉर्डर. (भंडारा विभागतल्या बसेसना याच काळात हीच बॉर्डर पांढ-या रंगाची असे. दूरून बघून बस ओळखू येई.)
3 बाय 2 आसन व्यवस्था
एकूण 54 आसने
ड्रायव्हर केबिनमागे उलट असलेला लांब बाकडा असणारी ही शेवटची सिरीज. यानंतर MH - 31 / AP या सिरीजमध्ये 400 बसेसनंतर साधारण MH - 31 / AP 94XX सिरीजमध्ये सगळी आसने एकाच दिशेची असणारी प्रोटोटाईप बस आली आणि हा लांब बाकडा नामशेष झाला.
TATA 1512
एखादा फ़ोटो म्हणजे नुसता फ़ोटोच नसतो. त्यामागे आठवणींचा किती कल्लोळ असतो हे ज्याचे त्यालाच ठाऊक असते.
- एस. टी वर मनापासून प्रेम करणारा आणि तिच्या कर्मचा-यांबद्दल कायम कृतज्ञ असलेला भावनाकल्लोळी माणूस, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.