Friday, June 13, 2025

पेन्स, परिक्षा आणि कमी झालेला चोखंदळपणा

 "अरे ! उद्याच्या पेपर्ससाठी पेन्स वगैरे नीट बघितलेत का ?"


"परिक्षेसाठी नवीन पेन्स आणायचेत का रे ? तसे बाबांना सांग."


"कंपासपेटी नीट भरलीय का ? दोन पेन्स आहेत की नाही ? त्यातल्या एकाने दगा दिला तर ? तिसरा एखादा पेन तरी घेऊन जा."


"सगळ्या पेन्सची नीब, जीभ बघितलीय का ? शाईची बॉटल आणायचीय का नवीन ? गळतोय का रे एखादा पेन ? नीट बघ बाबा. नाहीतर पेपरवर गळून घोटाळा व्हायचा."


हे सगळे संवाद आता सांप्रतकाली आठवण्याचे कारण म्हणजे आमचा पेशा. गेल्या ३० वर्षांपासून मी या शिक्षकी पेशात आहे आणि या पेशात अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे मुलांच्या परिक्षांदरम्यान करण्यात येणारे पर्यवेक्षण उपाख्य इनव्हिजेलेशन. मागील लेखात लिहील्याप्रमाणे या तीन तासात भरपूर स्वचिंतन होत असते. परिक्षांमध्ये पेपर्स लिहीण्यासाठी विद्यार्थी वापरत असलेले पेन्स यात गेल्या वर्षात किती बदल झालाय हे पाहून मन थक्क होते. हा बदल आजकालच्या विद्यार्थ्यांची, क्वचित त्यांच्या पालकांचीही परिक्षेबाबत असलेली एकूणच मनोवृत्ती आणि बदलत चाललेल्या काळाचे संदर्भ याचे द्योतक आहे असे मला वाटते.


आम्ही परिक्षा देत असताना वरील सगळे संवाद घरी व्हायचेत. शाई पेनांचा जमाना होता. चांगल्या हस्ताक्षरांना शिक्षक आणि पालकांच्या लेखी किंमत होती. त्यामुळे प्राथमिक शाळेत पहिली दोन वर्षे फ़क्त पाटी आणि चुनखडीसारख्या भुकटीची वळलेली लेखण एव्हढेच लिखाण साहित्य असायचे. पाट्यांमंध्ये दगडी पाटी आणि पत्र्याची पाटी असे प्रकार होते. दगडी पाटी जड असे. दप्तरात भरल्यावर ते पण न्यायला आणायला जड व्हायचे. पण दगडी पाटीवर अक्षरे छान यायची. ती लवकर भुरकट व्हायची नाही. पत्र्याची पाटी हलकी असली तरी ती थोडी जुनी झाली की भुरकट व्हायची. नवी पाटी घेऊन मागावी लागे. दगडी पाटीचा तोटा एव्हढाच होता की वर्गात मधल्या सुटीत मस्ती करताना जर धावपळीत दगडी पाटी ठेवलेल्या दप्तरावर पाय पडला तर ती लगेच तुटायची. मधून दोन तुकडेच व्हायचेत. त्याभोवती असलेल्या लाकडी फ़्रेममुळे ती एकदम विलग झाली नाही तरी नवी पाटी मिळेपर्यंत, मधली तुटलेली भेग वागवत त्यावर लिखाण करावे लागत असे.


लेखणींमध्ये "बोदी लेखण" विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असायची. लेखणीच्या मोठ्या डब्यात एखादी तरी थोडी जाडी लेखण निघायचीच. तिला "बोदी लेखण" हे नामाभिधान प्राप्त होते. अक्षरे सुवाच्च व्हावीत म्हणून अक्षरे गिरविण्याच्या विशेष पाट्या यायच्यात. त्यावर गिरवावे लागे. अक्षरांना वळण लागे.


तिस-या वर्गात मग पेन्सचा आणि पेन्सिलींचा आमच्या शैक्षणिक आयुष्यात शिरकाव झाला. पेन्स म्हणजेच फ़ाऊन्टन पेन्सच. त्याकाळी कॅमलीन च्या फ़ाऊन्टन पेन्सची चलती होती. हीरो कंपनीचे चायनामेड फ़ाऊन्टन पेन्स १९९० च्या दशकात आले. आम्ही द्वितीय वर्ष अभियांत्रिकीत शिकत होतो. तेव्हा ३० रूपयांचा असलेला हीरो चा पेन घेताना आमच्या महिन्याच्या बजेटला "pains" झाल्या होत्या, नाही असे नाही. आमचे पालक घरून दरमहा ४५० - ५०० रूपये पाठवीत असत. त्यात मेस, रोजचा चहा, गावात भटकंती आणि शैक्षणिक साहित्य खरेदी भागवावी लागे. तेव्हा हा ३० रूपयांचा असलेला पेन भारी वाटला होता पण आज ३५ वर्षांनंतरही हा पेन संग्रही असलेला आणि अजूनही उत्त्तम सेवा देत असलेला पाहून पैसे पुरेपूर वसूल झाल्याची एकच भावना होते. माझे सगळे सबमिशन्स आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी नंतरच्या सगळ्या परिक्षांच्या उत्त्तरपत्रिका मी त्या एकाच पेनाने लिहीलेल्या आहेत. इतक्या उत्त्तम प्रतीचा तो पेन आहे. आम्हाला बॉलपेन वापरायला आमच्या वडिलांची बंदी होती. त्यांचे स्वतःचे अक्षर अगदी मोत्यासारखे होते. सुंदर अक्षर ही आम्हा सगळ्या किन्हीकर कुटुंबाला मिळालेली देणगीच आहे. माझे वडील आणि तीन चुलत काका यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. 


त्यानंतर काही काळाने जेल पेन्स आलेत. मग अगदी तो फ़ाऊन्टन पेन वगैरे न वापरताही सुंदर हस्ताक्षर येऊ शकते याची खात्री पटली. जेल पेन्स वापरायला आणि मेन्टेन करायला सुद्धा फ़ाऊन्टन पेन्स पेक्षा सोपे होते. मग ॲड जेल, पायलट हाय टेक्नोपॉईंट यांचा वापर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला. पूर्वीही अनेक विद्यार्थी परिक्षेत बॉलपेन वापरीत असत पण अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते.


आज मात्र लिखाण या क्षेत्राकडे सगळ्याच विद्यार्थ्यांचे अत्यंत दुर्लक्ष झालेले आहे. मी पर्यवेक्षण करीत असताना बघतो की शेकडा ९५ % विद्यार्थी बाजारात मिळणा-या अत्यंत स्वस्त अशा २ किंवा ३ रूपयांत मिळणा-या कामचलाऊ पेन्स वापरून सगळे पेपर्स लिहीताना दिसतात. आपले लिखाणकाम परिक्षकांना प्रभावित करणारे, आवडणारे असले पाहिजे असा अजिबात अट्टाहास त्यात नसतो. लिखाण कळले पाहिजे यापेक्षा ते लिखाण कळू नये आणि परिक्षकांनी ॲव्हरेज मार्किंग केले पाहिजे याकडेच बहुतांशी विद्यार्थ्यांचा कल असतो. आपल्या लिखाणातले महत्वाचे मुद्दे अधोरेखित वगैरे करून ते विशेषतेने परिक्षकांच्या नजरेला आणून देणे वगैरे प्रकार आता जवळपास नाहीतच. अभियांत्रिकीचे विद्यार्थी असूनही आपण काढलेल्या विविध आकृत्या प्रमाणबद्ध असाव्यात याकडे लक्ष नाही.


मध्ये अशाच एका परिक्षेत पर्यवेक्षण करीत असताना दोन विद्यार्थिनींच्या एकमेकींमधल्या कुजबुजीचा आवाज आला. पर्यवेक्षक म्हणून मी चौकशी करायला गेलो तेव्हा त्यातल्या एकीच्या पेनामधील शाई संपली आणि तिच्याकडे दुसरा पेन नसल्याने तिने शेजारणीला मागितल्याचे निष्पन्न झाले. शेजारच्या विद्यार्थिनीने स्वतःजवळचा बॉलपेन देऊ केला तो पहिलीने नाकारला. मी कारण विचारता तिने बाणेदारपणे उत्त्तर दिले की सर मी बॉलपेन कधीही वापरत नाही. फ़क्त फ़ाऊन्टन पेन किंवा जेल पेन्सच वापरते. मी तिचा लिहीलेला पेपर बघितला. खरोखर त्यांच्या पिढीला न शोभणा-या सुंदर, नीट नेटक्या हस्ताक्षरात आणि सुबक आकृत्या बनवित तिने तोपर्यंतचा पेपर लिहीलेला होता. मला ते पाहून इतका आनंद झाला की काय सांगू ! मी माझ्या खिशातले निळ्या आणि काळ्या रंगातले दोन्हीही पायलट हाय टेक्नोपॉईंट पेन्स तिला लिहायला दिले. तोपर्यंत माझे त्यादिवशीचे परिक्षेसंबंधीचे लिखाणकाम झालेले होते. परिक्षा संपल्यानंतर ती विद्यार्थिनी माझे पेन्स परत करायला आलेली असताना मी तिचे विशेष कौतुकही केले.


आजकाल सर्वत्रच संगणकीकरण झालेले असल्याने एकूण हस्ताक्षरांचेच महत्व फ़ार कमी झालेले आहे. मग चांगल्या हस्तांक्षरांवर मेहेनत घेण्याचा, चांगल्या प्रतीचे पेन्स वापरण्याकडचा विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असला तर ते नैसर्गिकच म्हणावे लागेल. चांगल्या हस्ताक्षरांची उपयुक्तता कमी झालेली असली तरी बदलत्या युगात चांगले अक्षर असणे हे अजून मागासलेपणाचे, कालबाह्यतेचे लक्षण नाही याचा आनंद वाटतो. आणि मध्येच कधीतरी, कुणीतरी "सर, तुमचे हस्ताक्षर, तुमची सही एकदम मस्त आहे बरं." अशी दाद देतं. आणि आपल्याला लाभलेला हा वारसा आपण जपून काही चूक केलेली नाही ही भावना मनाला आनंदी करते हे खरे.


- चांगले पेन्स वापरणारा, संग्रही असणारा आणि चांगल्या हस्ताक्षरांचा धनी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शुक्रवार, १३ जून २०२५


शेगाव


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


2 comments:

  1. सुंदर हस्ताक्षर हे कौतुकाचे आहे पण एक्स्ट्रा पेन न ठेवणे हे अतिशय बेजबाबदार आहे. तुमच्या कडून योग्य मदत मिळाली नसती तर ही विद्यार्थिनी मोती द्याणा सारख्या हस्ताक्षरात अर्धवट पेपर सोडवून पास झाली असती का?

    ReplyDelete
    Replies
    1. Very true. But that may be one odd case for her.

      Delete