Monday, June 16, 2025

अभियांत्रिकी शिक्षण: ओळखा काळाची पावले

आज महाराष्ट्रात अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट चा निकाल लागला. आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची धावपळ सुरू होईल. त्यानिमित्त्ताने माझे अनुभवाचे हे काही बोल.


एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल की आजही अभियांत्रिकी शिक्षण हेच सगळ्या तरूणांना आपापल्या करियरमध्ये प्रस्थापित होण्यासाठी आणि लवकर स्थिरावण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग आहे. म्हणूनच देशभरात हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून लाखो विद्यार्थी दरवर्षी अभियंते होतात आणि त्यांचे करियर सुरू करतात. मुळात अभियंता ही एक वृत्त्ती आहे. आपले रोजचे जीवन अधिक सुकर, सुलभ करणारी गोष्ट म्हणजे अभियांत्रिकी. अभियंता वृत्ती कुठल्याही समस्येचे उत्त्तर शोधते. नुसती समस्या मांडत बसत नाही. आणि आपण आपल्या आसपास किंवा क्वचित आपल्या घरीही अशा व्यक्ती कायम बघत असतो की त्या कुठल्याही समस्यांना योग्य दिशेने विचार करून आपल्या बुद्धीमत्त्तेने सोडवितात. अशा व्यक्तीने अभियांत्रिकीचे लौकिक शिक्षण घेतले असो वा नसो, ती व्यक्ती अभियंताच असते. नुसत्या समस्या मांडून आणि कधीकधी समस्या तयार करून त्यावर पुढच्याला अडचणीत आणणारी व्यक्ती, तिच्याजवळ अभियांत्रिकीची पदवी असली तरी अभियंता नसते हे पुरते लक्षात असू द्यावे.


गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरातच काही हजार अभियांत्रिकी महाविद्यालये निघालेली आहेत. आणि संख्या वाढली की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व्ह चे नियम सगळीच कडे लागू होतात तसे ते इथेही लागू झालेले आहेत. अशा महाविद्यालयांमध्ये चांगले, बरे, वाईट असे प्रकार आहेतच. सगळ्याच भावी अभियंत्यांची धाव त्यातल्या त्यात चांगल्या महाविद्यालयांकडे असते म्हणून असे चांगले महाविद्यालय निवडीसाठी गेल्या ३० वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असलेल्या एका प्राध्यापकाचे हे अनुभवाचे बोल.


अ) आज सी. ई. टी. चा निकाल तर लागला, आता महाराष्ट्र शासनातर्फ़े अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रसिद्ध होणा-या सर्व सूचनांवर लक्ष ठेवा आणि त्या सूचनांचे दिलेल्या तारखांच्या आत पालन करा. या दरम्यान आपले लॉगिन आय. डी. आणि पासवर्ड्स आपल्या पालकांव्यतिरिक्त कुणाला म्हणजे अगदी कुणालाही शेअर करू नका. 


आ) अभियांत्रिकी शिक्षण घेऊन लगेच नोकरी शोधणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण फ़ार असते. नोकरीसाठी हमखास आणि खात्रीचा उपाय म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण अशी सगळ्या समाजाची धारणा आहे म्हणूनच अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा फ़ार कल आहे. ज्या कुठल्या महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तिथला प्लेसमेंट रेकॉर्ड बघून घ्या, त्याबद्दल थोडी माहिती आपल्या ओळखीच्यांकडून, जाणत्यांकडून घ्या. कारण बरीचशी "टॉम डिक आणि हॅरी" टाईपची अभियांत्रिकी महाविद्यालये हा खोटा रेकॉर्ड दाखवण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. 


इ) प्लेसमेंट रेकॉर्ड बघताना त्या महाविद्यालयाल्या विद्यार्थ्यांनी गेल्या ३ - ४ वर्षांमध्ये जास्तीत जास्त किती पगार मिळवला ? याकडे लक्ष देण्यापेक्षा तिथल्या विद्यार्थ्यांचा सरासरी पगार किती होता ? हे बघा. ५० आणि ६० लाखांची पॅकेजेस पगारात मिळवणारे एखाद दुसरेच विद्यार्थी असतात. त्यामुळे त्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना गेल्या ३ - ४ वर्षांमध्ये सरासरी पगार किती मिळालाय ? हे आवर्जून बघा.


ई) आपण जितकी फ़ी भरतोय त्या प्रमाणात त्या महाविद्यालयातल्या शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत की नाहीत ते आवर्जून बघा आणि भरतोय त्या फ़ी च्या प्रमाणात त्या महाविद्यालयांमधून मिळणा-या नोक-यांची पॅकेजेस आहेत की नाहीत ? ते सुद्धा बघा. वर्षाला ३ लाख रूपये फ़ी भरून (म्हणजे चार वर्षांमध्ये जवळपास १२ - १३ लाख रूपये गुंतवून जर आपणाला चार वर्षांनंतर  ४, ४.५ लाख रूपये वार्षिक पगाराची नोकरी मिळत असेल तर "ROI (रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट)" किती ? याचाही हिशेब पालकांनी करून बघायलाच पाहिजे.)


उ) त्या महाविद्यालयाचे रेप्युटेशन बघताना ते खूप विद्यार्थी मैत्रत्वाचे आणि सगळ्यांनाच पास करणारे महाविद्यालय आहे का ? हे बघा. सगळ्यांनाच पास करणा-या आणि महाविद्यालयातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना १० च्या स्केलवर ९ व अधिक पॉइंटर मार्क्स देणा-या अशा महाविद्यालयाची (कु)ख्याती सगळ्या इंजिनीअरींग इंडस्ट्री आणि चांगल्या उच्च शिक्षणासाठी ख्यात असलेल्या सगळ्या भारतीय आणि परदेशी विद्यापीठांमध्ये पसरत असते. त्यामुळे अशा महाविद्यालयांमधून ज्ञान न मिळवता फ़क्त मार्क्स मिळवून आपणच आपले आयुष्य कठीण करून घेत असतो. चांगल्या नोक-यांच्या आणि चांगल्या ठिकाणी असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी आपणच नाकारत असतो. म्हणून जिथे खरोखर ज्ञानदानाचे आणि कडक परिक्षांचे वातावरण आहे त्या महाविद्यालयात स्वतःला अभियंता म्हणून घडविणे हे जास्त महत्वाचे. जीवनात वावरताना परिक्षांमधल्या मार्कांपेक्षा आपल्याला मिळालेले ज्ञान हे जास्त महत्वाचे असते.


ऊ) एखाद्या ब्रॅंचच्या मागे लागताना त्या ब्रॅंचला पुढल्या ४ वर्षांमध्ये किती भवितव्य आहे ? याचा विचार नक्की करावा. उगाच सगळी मंडळी अमुक एक ब्रॅंच घेताहेत म्हणून आपणही त्या रॅट रेस मध्ये सामील होणे शहाणपणा नाही. आता आय. टी. क्षेत्राचेच उदाहरण घ्या. इसवीसन २००० च्या आसपास अमेरिकेत "वाय टू के" नामक एक बागुलबुवा आला आणि तोपर्यंत संपूर्ण कॉम्प्युटरायझेशन झालेले सगळे अमेरिकन्स घाबरलेत. आपल्या भारतीय अभियंत्यांना चांगले दिवस आलेत. जो तो अभियंता एखादा छोटासा कोर्स करून अमेरिकेत नोकरीसाठी जायला लागला. सगळ्यांचे "अमेरिकन ड्रीम" साकार झाले. भारतीय अभियंत्यांना सुबत्त्ता प्राप्त झाली, नशीबे पालटली. छानच गोष्ट झाली.


मग मागणी तसा पुरवठा या न्यायाने भारतातल्या अनेक महाविद्यालयांनी आपल्या कॉम्प्युटर्स आणि आय. टी. ब्रॅंचच्या सीटस वाढवल्यात. परदेशातल्या आणि भारतातल्या इन्फ़ोसिस, टी. सी. एस. सारख्या अनेक कंपन्या दरवर्षी हजारो अभियंत्यांची भरती करू लागल्यात. कॉम्प्युटर्स आणि आय. टी. ब्रॅंच मध्ये प्रवेश घेतला म्हणजे १०० टक्के नोकरी मिळणार ही समजूत दृढ होऊ लागली आणि त्यात तथ्यही होते. नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या त्या कंपन्या परदेशी ऑनसाईट प्रोजेक्टससाठी पाठवू लागल्यात. सगळा आनंदी कारभार चालू होता.


पण मागणी तसा पुरवठा हे बाजारपेठेचे तत्व इथेही लागू झाले. मला आठवतय २००६ मध्ये आय. टी. कंपन्या सर्वसामान्य पॅकेज म्हणून ३ ते ३.५ लाखांचे वार्षिक पॅकेज द्यायच्यात. तेव्हा २.५ लाख वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागत असे. म्हणजे विद्यार्थी नोकरीला लागल्या लागल्या तो टॅक्सपेअर म्हणून गणला जायचा. विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही अभिमानाचीच बाब होती.


आज १८ - १९ वर्षांनंतर याच आय. टी. कंपन्यांचे सरासरी पॅकेज आहे वर्षाला ४ ते ४.५ लाख रूपये. २००६ च्या हिशेबाने आज वार्षिक पॅकेज हवे होते १२ ते १३ लाख रूपये. पण आज ते नाही. त्यातही लॉकडाऊन नंतर कुठलेही काम, कुठलाही प्रोजेक्ट हा इंटरनेट सुविधा असलेल्या कुठूनही (अगदी एखाद्या खेड्यातूनही) पूर्ण करता येऊ शकते हे सगळ्या जगाच्याच लक्षात आले आहे आणि ऑनसाईट प्रोजेक्टसाठी अमेरिकावारी, युरोपवारी घडविण्याचे प्रमाण अगदी १ टक्क्यावर आलेले आहे. पूर्वी १०० अभियंते परदेशी जायचेत आता त्यातला एखादाच आणि तो सुद्धा तिथेच जाऊन करण्यासारखे अगदी अत्यावश्यक काम असल्यावरच जातो. त्यामुळे आय. टी. कंपन्यांचे आणि त्या क्षेत्राचेच जुने ग्लॅमर राहिले नाही हे आपण सगळ्यांनीच डोळसपणे स्वीकारायला हवे. मग अमुक एकाच ब्रॅंचच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे ?


यापेक्षा चांगल्या (वर उल्लेख केलेले गुण असणा-या) महाविद्यालयात कुठल्याही शाखेत प्रवेश घेऊन तिथे आपले करियर घडविण्याला महत्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही लक्ष द्यायला हवे. उगाच एखाद्या "टॉम डिक आणि हॅरी" टाईपच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर्समध्ये नुसती पदवी मिळविण्यापेक्षा चांगल्या दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात जर आय. टी. / कॉम्प्युटर्स शिवाय दुस-या शाखेत प्रवेश मिळत असेल तर तो घेण्यात आणि त्याच शाखेत आपले उत्त्तम करियर घडविण्यात शहाणपण आहे. त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा महत्वाचा, ब्रॅंच दुय्यम ही खूणगाठ मनात पक्की बांधायलाच हवी.


हा लेख आजच लिहीण्यामागचा आणि विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे असे प्रबोधन करण्यामागचा हेतू इथे विशद करतो आणि थांबतो. गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी घरी पिझ्झा डिलीव्हरी करायला एक तरूण मुलगा आला होता. मी पिझ्झा घ्यायला गेल्यावर त्याने मला ओळखले. तो नागपुरातल्या अशाच एका "टॉम डिक आणि हॅरी" टाईपच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. कॉम्प्युटर इंजीनिअरींगचा. आमच्या महाविद्यालयात होणा-या प्लेसमेंट ड्राइव्हज मध्ये ट्रेनिंग ऑफ़िसर म्हणून मी नेहमी हजर असतो.  अशाच एका पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये (पूल कॅम्पस = ज्या प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये तुमच्या स्वतःच्या महाविद्यालयातली आणि इतर अनेक आसपासच्या महाविद्यालयातली विद्यार्थी मंडळी भाग घेत असतात.) त्याने मला बघितले असणार. अर्थात मी त्याला ओळखत असण्याची शक्यताच नव्हती. त्याची अशी अवस्था पाहून मला एक शिक्षक म्हणून वाईट वाटले. कुठलेही काम कमी दर्जाचे नसले तरी डिलीव्हरी बॉय  होण्यासाठी त्याने कॉम्प्युटर इंजीनिअरींगचे शिक्षण घेतले नव्हते ना. त्यातून त्याची घरची पार्श्वभूमी गरीबीची, कमी शिक्षणाची. आई वडील पूर्व विदर्भातल्या एका गावात शेतमजुरी करत होते. त्यांच्या कमी शिक्षणाचा, अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसण्याचा गैरफ़ायदा त्या "टॉम डिक आणि हॅरी" टाईपच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रवेशाच्या वेळी घेतला होता हे उघड होते. पोटाला चिमटा काढून मोल मजूरी करीत त्याच्या आईवडीलांनी या एकुलत्या एक मुलाला शिकवताना कसली कसली स्वप्ने बघितली असतील ? आणि आज त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालेला त्यांना माहितीही नसेल, आजही ते बिचारे आपल्या मुलाला चांगली नोकरी आहे, आज ना उद्या आपले दिवस पालटतील या आशेने मोल मजूरी करीत दिवस ढकलत असतील या विचाराने मलाच भडभडून आले, त्या मुलाच्या ऐवजी माझ्याच डोळ्यात पाणी आले. त्याचा बायो डेटा मी मागवून घेतला आणि त्याच्यासाठी माझ्या दोन तीन मित्रांकडे शब्द टाकला.


तेव्हाच मी पेटलो आणि सगळ्या पालकांसाठी आणि अभियंता होण्याची स्वप्ने पाहणा-या तरूण मुलांसाठी हा लेख योग्य त्या वेळी लिहीण्याचे पक्के केले. आजचीच ती योग्य वेळ. 


सांगोपांग आणि सारासार विचार करून प्रवेशाचे ठरवा, कुठल्याही झुंडीमागे अविचाराने जाऊ नका हेच माझे सर्वांना आज या निमित्त्ताने कळकळीचे आवाहन.



- "बुडती हे जन न देखवे डोळा" या श्रीतुकोबांच्या उक्तीचे पालन करणारा, तुकोबांसारखाच "सत्य असत्याशी, मन केले ग्वाही, मानियेले नाही, बहुमता" या विचारसरणीचा जगदगुरू संत श्रीतुकाराम महाराज भक्त प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


सोमवार, १६ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


2 comments:

  1. शिक्षण शाखेची निवड करताना काय गोष्टींचा विचार करावा हे विवेचन छान आहे.
    समाजात विविध व्यवसायांची गरज असते. अशा वेळी पालक आणि पाल्य याना चाकोरी बाहेर पडायला कसे समजवता येईल?
    तुमच्या मनात यावर काही विचार आहेत का? लेखातील तरुणाला दुसरे अॅाप्टश्न्स माहीत असते तर कदाचित त्याला मदत झाली असती.
    ३० दिवसात ३० फार मस्त चालले आहे. ३६५ करायचे अव्हान ठेवाल का?🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Yes Sir. 365 days 365 is a bit difficult looking at the routine and other difficulties. But thank you for your encouragement. I will definitely try.

      Delete