काल आमच्या एका गटचर्चेत प्रत्येकाने काही काही सदस्यांनी त्यांच्या त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा सांगितल्यात आणि मी सुद्धा विचारात पडलो की माझ्या लेखनप्रेरणा नक्की काय ?
एक चांगला गायक व्हायला एक चांगला श्रोता होणे अतिशय आवश्यक आहे असे म्हणतात तसेच एक चांगला लेखक होण्यासाठी आधी ती व्यक्ती एक चांगला वाचक असणे तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते. मला आठवतंय माझ्या बालवयातच माझे खूप दांडगे वाचन झालेले होते. अक्षरओळख झाल्यानंतर अगदी चवथ्या वर्गापर्यंतच मी समग्र पु ल देशपांडे , व पु काळे, ग दि माडगूळकर , व्यंकटेश माडगूळकर, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे वाचून काढलेले होते. आमचे दादा शाळेत लिपिक होते आणि शाळेच्या वाचनालयात तिथले ग्रंथपाल आमच्या दादांचे सहकारी आणि मित्र असल्याने वाचनालयात आम्हाला मुक्त प्रवेश होता. त्यामुळे आमच्या सेमिस्टर्स संपण्याच्या अखेरच्या दिवशी (सुट्या लागण्याच्या आदल्या दिवशी) आम्ही शेवटल्या पेपरला जाताना एक भली मोठी पिशवी सोबत घेऊन जात असू आणि पेपर संपला रे संपला की दादांना सांगून वाचनालयात घुसत असू.
अर्थात आमच्या ग्रंथपाल काकांना आमची ही पुस्तके अशी खाण्याची सवय माहिती असल्याने ते आम्हाला अडथळा करीत नसत. आम्हीही अगदी १०० च्या आसपास पुस्तके त्या मोठ्याला पिशव्यांमध्ये भरायचोत आणि अर्धी पुस्तके आम्ही तर अर्धी आमचे दादा त्यांचे ऑफिस सुटल्यावर अशा पद्धतीने घरी घेऊन जात असू.
मग काय ! सुटयांमध्ये या सगळ्या पुस्तकांचा फडशा पाडणे हे एकाच काम उरत असे. बालवयात असे भरपूर वाचनसंस्कार झालेत खरे पण आपण या लेखकांच्यासारखे लेखक व्हावे ही महत्वाकांक्षा मात्र मनात कधीच आली नाही.
अभियांत्रिकी शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात कराडला आणि त्यानंतर नोकरीनिमित्त मुंबईत जवळपास सव्वा तप राहणे झाले. सर्वांमध्ये मिळून जाण्याचा आणि मनमोकळा स्वभाव असल्याने तिथल्या तिथल्या जनजीवनात गुरफटून गेलोत, तिथल्या संस्कृतींशी समरस झालोत. विविधरंगी जीवन अनुभव घेता आलेत. प्रवास घडला, एक निराळे व्यक्तिमत्व घडले.
मग या सगळ्या अनुभवांचे मित्र सुहृदांमध्ये कथन सुरू झाले. मुळात जन्मच नकलाकार घराण्यात झालेला त्यामुळे परफॉर्मिंग आर्टस ची आवड आणि सवय बालपणापासूनच होती. त्या सर्वांना हे कथन आवडले आणि मग त्यातून हे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून लेखन सुरू झाले.
त्यातच साधारण २००७ - २००८ च्या सुमाराला Orkut आले. त्या माध्यमाला सरावलो आणि तिथे विचार मांडणे सुरू झाले. त्यापूर्वीही दै. तरूण भारतातून लिखाण होत होते पण इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमे ही नाटकांसारखी असतात, लगेच समोरून दाद मिळते तर छापील माध्यमे ही सिनेमांसारखी असतात, प्रत्यक्ष दाद अनुभवायला मिळत नाही हे सुध्दा लक्षात आले.
Orkut नंतर फेसबुक आले. स्वतःच्या अभिव्यक्तित जास्त लवचिकता मिळायला लागली. त्याच दरम्यान मला ब्लॉग या माध्यमाचा शोध लागला. ब्लॉगवर हळूहळू का होईना व्यक्त व्हायला सुरूवात केली. सुरूवातीच्या चार पाच वर्षात ब्लॉगला आलेला प्रतिसाद अगदी कमी होता. निरुत्साही. ब्लॉग लिहीणे सुरू ठेवावे की नको ? या विचाराप्रत येणारा. पण नंतर फ़ेसबुकवरून, व्हॉटसॲप वरून आपल्या ब्लॉगपोस्टस साठी वाचकवर्ग मिळू शकतो हे जाणवले. ब्लॉगच्या लिंक्स या माध्यमांवर द्यायला सुरूवात केली आणि ब्लॉग्जच्या संख्येत आणि वाचकसंख्येतही भरीव वाढ झाली. अधिकस्य अधिकम फ़लम या न्यायाने वाचकांचा उत्साह नवनवे ब्लॉगपोस्ट लिहायला उद्युक्त करीत होता तर सातत्याने लिहील्याने वाढता वाचकवर्ग लाभत होता.
त्यातही आपण लिखाण केल्यानंतर वाचकांना ते आपलाच अनुभव असल्याचे जाणवते आणि ते लिखाण त्यांना त्यांच्या जवळचे वाटते. त्यामुळे फ़ार जास्त अलंकारिक भाषेत, खूप संशोधन करून, एखाद्या विषयाची खूप मांडणी करून एखादे लिखाण मी केलेय असे झाले नाही. मनाला भावले ते सगळे "पिंडी ते ब्रह्मांडी" या न्यायाने लिहीले. त्यात कुठेही अभिनिवेश नव्हता, पेशाने शिक्षक असूनही "आपण या सर्व अज्ञ जनांना शिकवतोय" अशी भूमिका नव्हती. सरळ, स्वच्छ आणि मनमोकळे लेखन. माझ्या स्वभावासारखेच. मला आलेले अनुभव, मला दिसलेले जग, मला जाणवलेली माणसे असे साधे सरळ लिखाणाचे विषय असायचेत आणि वाचकांनाही अशाच प्रकारचे लेखन आवडते हे माझ्या लक्षात आले आणि मी लिहीत गेलो.
"मी लेखन का करतो ?" या प्रश्नाच्या उत्त्तरांमध्ये "मला स्वतःला अभिव्यक्त व्हायला आवडतं म्हणून", "लोकांच्या मनातले विचार ,इच्छा मी माझ्या अनुभवांद्वारे व्यक्त करतो आणि मला समानशील असलेले अनेक वाचक मित्र मिळतात म्हणून" या दोन उत्त्तरांचा क्रम पहिल्या दोन उत्त्तरांत येईल.
मायबाप वाचकांनी लिखाण वाचले आणि तसा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यानंतरही असाच प्रतिसाद मला लाभो अशी नम्र प्रार्थना.
- जूनच्या ३० दिवसात वेगवेगळ्या विषयांवर ३० लेख लिहीणारा दृढनिश्चयी लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
सोमवार, ३० जून २०२५
नागपूर
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment