बरोबर वर्षभरापूर्वी याच दिवशी संध्याकाळी २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षाची सांगता झाली होती. सगळ्या लेखी परिक्षा, तोंडी परिक्षा संपल्या होत्या. विद्यार्थ्यांना आणि आम्हा शिक्षकांना उन्हाळी सुट्या मिळाल्या होत्या आणि आमच्या सदैव व्यग्र, व्यस्त मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती मिळालेली होती.
गेल्या दोन वर्षांपासून लेक आग्रह करत होती., "बाबा 'पंचायत' बघ 'पंचायत' बघ म्हणून" दरवेळी काही ना काही कामे असतात. निवांतपणा असा मिळतच नाही. यावेळी मात्र ती खनपटीलाच बसली होतीआणि तिचे मन राखायचे म्हणून मी सुध्दा सुट्यांच्या पहिल्या तीन दिवसात "पंचायत" या वेब सिरीजचे तीनही सीझन्स बघून काढलेत.
तसा मी ओटीटी प्लॅटफ़ॉर्मसचा फार मोठा चाहता नाही. सगळ्या ओटीटी प्लॅटफ़ॉर्मसच्याच म्हणण्यानुसार या सगळ्या प्लॅटफ़ॉर्मसची स्पर्धा एकमेकांशी नसून माणसांच्या झोपेशी आहे. आणि परमेश्वर कृपेने आजवर तरी रात्री वरणभात - ताकभात खाऊन संपला की धुतलले हात वाळेपर्यंत आम्ही निद्रादेवीच्या राज्यात शिरलेलो असतो. अगदी घनघोर निसूर. लोकांना जागे ठेऊन, डोळे तारवटून ओटीटी वरच्या वेबसीरीज पहायला लावणार्या प्लॅटफ़ॉर्मसशी आमचे जमावे कसे ?
पण "पंचायत" खूप आवडली होती. तीनही सीझन्स खूप पटले, भावले होते.
यावर्षी उन्हाळी सुट्या संपता संपता पंचायत चा ४ था सीझन आला. दोन दिवसातच आम्ही बघून काढला. हा भागही खूप आवडला.
या भागात पंचायतच्या राजकारणाच्या चित्रिकरणावर जास्त भर दिला गेलाय. आणि कुठेही अनैसर्गिक, नुसती Hero Worship न दाखवता गावातले राजकारण आणि त्याचा खराखुरा परिपाक दाखवलेला आहे. पंचायतमधल्या सत्ताधार्यांवर काही काही कानपिचक्या सुध्दा दिलेल्या आहेत. पुढच्या भागाची चुटपुट लावून एखाद्या ओटीटी सिरीजचा भाग संपवणे ही प्रत्येक सिरीजची व्यावसायिक गरज असते तसा शेवट इथेही केलेला आहे. शेवटावर काही काॅमेंट करून मी ही सिरीज बघणार्या भावी दर्शकांचा रसभंग करू इच्छित नाही. पण एव्हढेच सांगतो की पुढल्या भागात लेखक आणि दिग्दर्शकाकडून या भागासारख्याच खूप बॅलन्स्ड आणि प्रगल्भ कथेची आणि दिग्दर्शनाची अपेक्षा असेल. कुठेही आक्रस्ताळे किंवा अवास्तव न होता पंचायतीच्या पातळीवर भारतीय लोकशाहीचे खरे दर्शन यापुढल्या भागात दर्शकांना घडविण्याचे शिवधनुष्य लेखक, दिग्दर्शकाला पेलावे लागेल. यात त्यांची खरी कसोटी लागेल.
यात विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की जरी हे चारही सीझन्स साधारण तीन वर्षांच्या कालखंडात चित्रित झाले असतील तरी यात काम करणार्या सगळ्याच पात्रांचे बेअरींग तसूभरही हललेले नाही. जणू काय हे चारही भाग एकसाथच सलग चित्रित केले गेल्यासारखा या सर्व प्रमुख पात्रांचा अभिनय आहे. त्यात प्रधानमॅडम असोत, प्रधानजी असोत, उपप्रधानजी असोत, सचिवजी असोत, बनराकस असो किंवा रिंकी असो.
विशेष म्हणजे या अडीच तीन वर्षात सगळ्यांच्या प्रकृतीत, शरीरयष्टीतही जाणवावा असा फरक पडलेला नाही. ही एक गोष्ट जरी आपण निसर्गाची देणगी म्हणून सोडून दिली तरी चित्रिकरणादरम्यान पडलेल्या लांब गॅपनंतरही अभिनयातले एकसंध बेअरींग कायम ठेवणे हे खरोखर कौतुकास्पद आहे.
१९७० - ८० च्या दशकातल्या सिनेमांमध्ये इंटरव्हलपूर्वीच्या सिनेमातले बेअरिंग इंटरव्हलनंतरच्या भागात कायम ठेवणे त्या काळातल्या "महानायक" वगैरे समजले जाणार्या सुपरस्टार्सना कधी जमले नव्हते त्यामानाने हे खरोखर स्पृहणीय आहे.
एक मात्र नक्की. पंचायत सीझन ५ आला तर तो आवर्जून बघणार्या पहिल्या काही मंडळींमध्ये माझा समावेश नक्की असेल.
- उत्कृष्ट कलाकृतींचा, चित्रपट, नाट्य, साहित्य, संगीत, ललित कलांचा मनापासूनचा आस्वादक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
शुक्रवार, २७ जून २०२५
नागपूर
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment