Sunday, June 29, 2025

लहानपण दे गा देवा...

आता आपण मोठे झाल्यावर श्रीतुकोबांचा "लहानपण दे गा देवा" हा अभंग आपल्याला आठवतो आणि लहान होऊन जगावेसे वाटते पण आपल्यापैकी किती जणांना आपल्या लहानपणी "आपल्या लहान असण्याचा" अभिमान वाटला होता, फ़ायदा जाणवला होता ? प्रामाणिकपणे सांगा. मला खात्री आहे की प्रत्येकाच्या लहानपणी प्रत्येक व्यक्तीला "मी कधी एकदा मोठा होतोय" असे झाले असते.


आमच्या बालपणापासून आमचे एकच स्वप्न होते. अशा खेळण्यातल्या कार्स चालवायच्यात. नुसत्या चालवायच्याच नाही तर आपल्या इवल्या इवल्या पायांनी जोर लावत लावत नागपूर ते चंद्रपूर असा आजोळचा प्रवास करायचा. चंद्रपूरच्या प्रवासाचे वेड तेव्हापासून. अर्थात तेव्हाच्या मध्यमवर्गीय घरांमध्ये अशी महागडी खेळणी घेऊन देण्याचे लाड मात्र कधीच झाले नाहीत. आम्ही तिघे भाऊ होतो हे एक कारण होते. अर्थात मी एकुलता एक असतो तरी असे लाड घरी झालेच नसते हे आमच्या काही एकुलत्या एक असलेल्या मित्रमंडळींच्या घरी असलेल्या वातावरणावरून आम्ही हा धडा घेऊ शकतो.






तेव्हा वाटायचे, केव्हा एकदा मोठे होतोय ? केव्हा एकदा मोठी कार घेतोय ? आणि केव्हा एकदा ती कार चालवत चंद्रपूरला, आजोळी जातोय ? अर्थात हे स्वप्न पूर्ण व्हायला ३५ वर्षे मेहनत करावी लागली. पण खरोखरीची नवी कार घेतल्यावर मात्र खरोखर पहिला बाहेरगावचा प्रवास हा चंद्रपूरचाच केला.


आमच्या बालपणी आजच्याइतके सामाजिक म्हणा, वैश्विक म्हणा एक्सपोजर आम्हाला नव्हते. आमचे विश्व आमचे आईवडील, शाळा, मित्र मैत्रिणी एव्हढ्यापुरतेच मर्यादित होते. अर्थात वडिलांनी वाचनाची आवड लावल्याने अगदी लहान वयापासून खूप मराठी साहित्य वाचले. त्या साहित्यातून बाह्य विश्वाशी आम्ही जोडले गेलेलो होतो. त्यामुळे आमच्या संकल्पना, आमच्या इच्छा आकांक्षा, आमचे हट्ट मर्यादितच असायचे. एका गावावरून दुस-या गावाला जाताना पारले ग्लुकोज बिस्कीटांचा एक अख्खा पुडा आपण एकट्याने संपविणे ही आमच्या चैनीची व्याख्या असायची. दरवेळी आई वडील आणि भावंडांसोबतच्या प्रवासात मध्ये एखाद्या थांब्यावर पारले बिस्कीटांचा पुडा आमचे दादा खरेदी करून आणत असत पण त्यातली दोन किंवा तीन बिस्कीटे वाट्याला येत असत. त्यामुळे पहिल्या एकल प्रवासात (अर्थात नागपूर ते चंद्रपूर) मी जांब बसस्थानकावर उतरून एक अख्खा बिस्कीटचा पुडा विकत घेऊन फ़स्त केला होता. सिकंदराला जग जिंकल्याच्या आनंदाइतका आनंद मला त्यावेळी झाला असल्याचे मला चांगलेच स्मरते.


आमच्या बालपणी आम्हाला "कधी एकदा कॉलेजात जाऊन शिकतोय !" असे झाले होते. आमची शाळा दररोज असायची. जावेच लागे. बहाणे वगैरे करून फ़ार तर एक दोन दिवस सुटी मिळेल, रोज रोज शाळेत जाणे, गृहपाठ करणे, मास्तरांच्या / मास्तरणींच्या छड्या खाणे, पी. टी. करणे सगळ्यांचा अगदी कंटाळा यायचा. एखादा दिवस तरी कारणाशिवाय पूर्ण ऑफ़ मिळावा असे मनापासून वाटे. पण तो मिळायचा नाही. आई दादा अगदी खनपटीला बसून शाळेत पाठवायचेच.


आमच्या मामे बहिणी, मावस बहिणी आमच्याहून सात आठ वर्षांनी मोठ्या होत्या. आम्ही शाळेत असताना त्या कॉलेजात जायच्यात. त्यांना मात्र त्यांच्या मर्जीप्रमाणे एखादे दिवशी दोनच लेक्चर्स करून परतणे, एखादे दिवशी इच्छा नसेल तर सरळ कॉलेजला दांडी मारून मित्र मैत्रिणींसोबत सिनेमाला जाणे वगैरे प्रकार करता यायचे. त्यांचे पालक त्यांना याबाबत काहीच बोलायचे नाहीत. त्यामुळे एकदा कॉलेजात गेलोत की हे सगळे न्यू नॉर्मल आहे अशी आमची भावना व्हायची आणि आपणही कॉलेजात गेल्यावर अशा मस्त सुट्या घेऊ, मनमर्जी लेक्चर्स करू अथवा बंक करू वगैरे आमच्या मनाचे बेत झालेले होते.


पण हाय रे दैवा ! आमचा प्रवेश शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला आणि अधेमधे असे लेक्चर्स बंक केले तरी विचारणारे. टोकणारे कुणीही नसले तरी एक लेक्चर बंक केल्यानंतर त्यात झालेला अभ्यास भरून काढायला नंतर खूप तास स्वतःच अभ्यास करावा लागतो हे तत्व लक्षात आले आणि आम्ही सुधारलोत. कॉलेज शिक्षणाचे डोंगर आपल्याला वाटले होते तेव्हढे गवताळ, हिरवे नाहीत याची जाणीव आम्हाला प्रगल्भ करून गेली.


तसेच बाहेर खाण्याबाबत आमच्या घरी निर्बंध होते. आमचे दादा हौशी होते. महिन्यातून दोन तीन वेळा बर्डीवर जाऊन कॅफ़े वृंदावनचा दोसा, जगत ची भेळ, आनंद भंडारचे चोमचोम वगैरे मजा आम्ही सगळे कुटुंब मिळून करायचोत. पण रस्त्याशेजारच्या ठेल्यांवर समोसे खाणे, शाळेसमोर बसलेल्या एखाद्या मावशीच्या टोपल्यातले बोरकूट, उकडलेली बोरे, चूर्ण (उच्चारी चूरण) खायला मात्र आम्हाला पूर्ण मनाई होती. त्याकाळी खूप छानशी हॉटेल्स नागपुरात नव्हती आणि आम्हाला पॉकेट मनी वगैरे प्रकार मिळत नव्हता. त्यामुळे मनात इच्छा असूनही असे रस्त्यावरचे पदार्थ आम्हाला खाता आले नाहीत.


त्या दाबलेल्या भावनांचा परिपाक म्हणून कॉलेजला गेल्यावर हॉस्टेलला राहताना "आपण रोज एक प्लेट समोसा रोज संध्याकाळी खायचा बरं का" असा आमचा निर्धार होता. त्या निर्धाराचे पालन आम्ही हॉस्टेलला असताना पहिले ८ दिवस केले सुद्धा. पण नंतर नंतर त्यातले वैय्यर्थ कळले. ॲसिडीटी वाढली, भूक मंदावली, घरचा आईच्या हातचा फ़ोडणीचे वरण भात किती स्वर्गीय चवीचा असतो याची जाणीव झाली आणि त्या खाण्याला आम्ही आसूसलो. यानंतर जेव्हा जेव्हा बाहेर खाण्याचे प्रसंग आलेत तेव्हा केवळ अपरिहार्यता म्हणून आपण बाहेर खातोय ही भावना झाली आणि लहानपणी आईच्या हातचा मऊ मऊ मेतकूट भात, दूध पोळी आठवत गेले. "लहानपण दे गा देवा" ही हाक अधिक प्रबळरित्या मागितली गेली.


अर्थात काही काही दुर्दैवी बालकांचे लहानपण खूप खडतर गेले असेल आणि त्यांना आज त्या आठवणी सुद्धा नकोशा वाटत असतील. लहानपणीच अंगावर खूप मोठी कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्याने बिचा-यांच्या लहानपणी त्यांचे लहानपणच हरवले असेल आणि कधी एकदा मोठे होतोय असे त्यांना झाले असेल. मोठे होऊन आपापल्या क्षेत्रात उत्त्तम काम करून बिचा-यांनी आपल्या बालपणीच्या नकोशा जीवनावर मात सुद्धा केली असेल. त्यांच्या साठी "लहानपण दे गा देवा" हे कदाचित नसेल पण अशा अभागी जीवांना मोठ्या वयात सुद्धा त्यांच्या बालपणीसारखे जीवन जगायला मिळावे हीच प्रार्थना आपण मनापासून परमेश्वराकडे करू शकतो.


आज जाणवतय़ की मनातले बालपण जपणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मोठे होत असतानाही आपल्या मनातले खट्याळ मूल जपणे, कधीतरी छोट्या मुलासारखे निरागस होऊन निर्लेप जगणे, कधी कधी छोट्या मुलांसारखे आपल्या आयुष्यातले काही निर्णय स्वतः न घेता आपल्या कुटुंबियांवर (बालपणी जसा आई वडिलांवर होता तसा) विश्वास टाकून त्यांना घेऊ देणे आणि स्वतः त्याची चिकित्सा न करता अगदी लहान मुलांसारखे जगणे हे जमणे त्या त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवरच अवलंबून आहे, नाही का ? "लहानपण दे गा देवा" हे देवाकडे मागितल्यानंतर त्याने ते आपल्याला आता मोठे झाल्यावर कधी कधी दिले आहे ? हे ओळखण्याची बुद्धी मोठेपणीच आपल्याला प्राप्त होत असते, नाही का ? म्हणूनच "प्रौढत्वी निजशैशव जपणे" ही कवीकल्पना न होता प्रत्यक्ष जगण्याची संकल्पना होणे हाच जीवनविकास आहे.


- स्वतः प्रौढत्वी बालपण जपणारा, जगणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


रविवार, २९/६/२०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





 

No comments:

Post a Comment