Friday, August 30, 2019

दोन भिन्न व्यक्तीमत्वे

आमच्या सौभाग्यवती आणि आम्ही. दोन भिन्न व्यक्तीमत्वे.
कधी कार्यबाहुल्यामुळे देवपूजा करायला जमली नाही तर ती जबाबदारी आमच्या अर्धांगिनी पार पाडतात. आणि मग दुसर्‍या दिवशी मी देवपूजा करीत असताना मला उपदेशामृत सुरू होत.
काय आहे ? सौभाग्यवती देवपूजा करीत असताना पाण्याचा अगदी मोजका वापर करतात. देवांची अंघोळ वगैरे ही कमी पाण्यात. तसबिरीही एकदम ड्राय वाॅशने पुसल्यासारख्या करतात.
मी मात्र "उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया" या समर्थउक्तीची आठवण करीत सगळ्या देवांना अगदी मनसोक्त शाॅवर बाथ आणि तसबिरींनाही मनसोक्त अंघोळ घालतो. तिच्या जवळपास तिप्पट पाणी मला लागत आणि पूजा स्थानाच्या आसपास पाण्याची थोडी सांडउबड ही होते.
घरातल्या टापटिपीची ती भोक्ती असल्याने तिला ही सांडउबड आवडत नाही. नंतर सगळ तिलाच आवराव लागत म्हणा त्यामुळेही असेल.
"तू पूजा करताना इतक पाणी सांडतच कस रे?" हा तिचा नेहमीचा प्रश्न.
आता काय सांगू ? अघमर्षण विधीत "जलं नाविलोक्य क्षिप्त्वा" असतच, 
सहस्त्रनामात "किंचीद्जलम क्षिप्त्वा प्रार्थयेत" असतच.
हे तिलाही माहिती नाही अस नाही.
पण लग्न मुरल्यावर भांडणही चांगली मुरायला लागतात अस म्हणतात. त्यातलच हे घटकाभराच भांडण. पूजेपासून साधारण भोजनाच्या वेळेपर्यंत. भोजनसमयी मिटणार. थोड मजेमजेच. कृतककोपाच.
मी अशावेळी श्रीमदभागवताच्या दशमस्कंधाचा आधार घेतो.
भगवान श्रीकृष्ण रूक्मीणीची थट्टा करून नंतर ती चिडल्यावर समजूत घालताना म्हणतात, "प्रिये, रूक्मीणी, या जगात खरोखर सुख कशात असेल तर पत्नीच्या केलेल्या अशा थट्टामस्करीतच आहे. बाकी जग सगळे दुःखाने भरलेले आहे."
येथे आम्हाला भगवंतानेच अशा थट्टेचे परमिट दिले आहे, काय समजलेत ? (शेवटले वाक्य सानुनासिक सुरांमध्येच वाचावे)
— आपला श्रीकृष्णभक्त खोडकर गृहस्थ रामचंद्रपंत

Thursday, August 29, 2019

खादाड प्रवासी पक्षी

मी एक प्रवासी पक्षी आहे. तो सुध्दा थोडा खादाड.
पण ज्या प्रदेशात जातोय त्या प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण खाणे आपण खाल्लेच पाहिजे असा माझा आग्रह असतो.
कितीही छान छोले भटुरे मुंबईच्या हॉटेलमध्ये आपण खाल्ल्याची शेखी मिरवली तरी पठाणकोट स्टेशनवरच्या हातगाडीवरचे गरमागरम छोले भटुरे हे सरसच ठरतात.
आणि म्हणूनच " श्रीनगरला सुद्धा आम्ही आमच्या पर्यटकांना पुरणपोळीच जेवण दिल " किंवा " कन्याकुमारीत आमचा श्रीखंड पुरीचा बेत रंगला" असल्या पर्यटन कंपन्यांशी आणि त्यांच्या प्रवाशांशी आमचे गोत्र जुळत नाही. (पु. लं. च्या च कथाकथनाचा भाग घेऊन पुढे चालतो की ही मंडळी लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड, दादर च्या पुढे मनाने जायलाच तयार नसतात.)
अरे, जर श्रीनगरला जाऊन तिथेला राजमा भात खाल्ला नाही तर डाल लेक पाहिल्याच पारण होत नाही.
आणि तामिळनाडूत खास केळीच्या पानावर वाढले जाणारे डोसा, उत्तपम, इडली खाल्ली नाही तर आपण फ़क्त कन्याकुमारी डोळ्यांनी बघितल्याच पुण्य मिळत. अंगात तो लहेजा भिनत नाही.



Wednesday, August 28, 2019

मोबाइलोपवास.


आज सकाळी जरा घाईतच काॅलेजला निघालो आणि अर्ध्या रस्त्यातच लक्षात आले की अरे मोबाइल फोन घरीच विसरलो. परत फिरणे शक्यच नव्हते. मग सुरू झाला आठ तासांचा सक्तीचा मोबाइलोपवास.
पहिले पाच मिनिटे या कल्पनेनेच थोडा धास्तावलो. मग विचार करता करता लक्षात आल की मोबाइल जवळ येण्यापूर्वीच्याही युगात आपण जगत, नोकरी करत होतोच की. हे व्यवधान आपणच आपल्यामागे लावून घेतलय आणि आता त्याच्या इतके अधीन झालोय की त्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतोय.
हळूहळू मोबाइलोपवासाचे फायदे लक्षात यायला लागले. संध्याकाळपर्यंत अगदी तणावमुक्त आनंदी जीवन जगलो.
संध्याकाळी घरी आल्यावर मात्र धाव घेत मोबाइल हस्तगत केला. हरवलेला जिगरी दोस्त नव्याने भेटल्यासारख वाटल.
गेल्या तीन चार वर्षांपासून, वर्षातून एक दिवस संपूर्ण मौनाचा प्रयोग मी करून बघितला आहे. आता ह्या मोबाइलोपवासाचा प्रयोगही अधेमधे करून बघायला हरकत नाही असे वाटून गेले.
काय म्हणताय ?

Tuesday, August 27, 2019

मी: एक मराठीप्रेमी

फावल्या वेळात "नॅशनल जिओग्राफिक" चे अभ्यासपूर्ण कार्यक्रम पहायला मला आवडतात. खाली एक खूप छोट्या अक्षरांमधली पट्टी सरकत असते. त्या पट्टीवर "हा कार्यक्रम इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे" असा मजकूर असतो. हजार वर्षांपूर्वीची आणि आज जवळपास दहा कोटी लोक बोलत असलेली माझी मराठी या ज्ञानयज्ञात का नाही ? याच अपार दुःख मला होत असत.
दरवर्षी कोट्यावधी रूपयांच्या शासकीय अनुदानाची (म्हणजे सर्वसामान्यांच्याच पैशाची) भीक मागून दीड दोन दिवस मिरवणारे हे साहित्य संमेलनवाले काय फक्त अध्यक्षीय निवडणूक आणि अध्यक्षीय भाषणांपुरतेच उरलेत का ? {बर एव्हढ्या लटपटी खटपटी, उठाठेवींनंतर ते "विद्वत्तापूर्णवगैरे (खिक..) भाषणही संध्याकाळपर्यंत अध्यक्षांसकट सगळ्यांच्या विस्मृतीत जात.}

कशाला हवाय तो तथाकथित "साहित्य संस्कृती वगैरे मंडळां"चा पांढरा हत्ती ?
मराठी भाषेतून, शाळांमधून जागतिक दर्जाचे ज्ञान मिळाले तरच पुढची पीढी मराठीकडे येईल अन्यथा पुढच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात मराठी भाषा संपण्याची लक्षणे आहेत हे लक्षात न घेता आपण शहामृगासारखी चोच खुपसून का बसलो आहोत ?
यापूर्वीच्या आणि याही शासनाच्या शैक्षणिक धोरणात (अर्थात असे काही असल्यास. तसे दृष्टीपथात आजवर आलेले दिसत नाही.) या गोष्टीचा साधा विचारही नाही. नुसते पोकळ, बेगडी प्रेम दाखवून उपयोग नाही रे, बाबांनो.

Monday, August 26, 2019

टेलीकॉलिंगवाल्याची गोची : एक खरा अनुभव

एक अगदी खरा संवाद.
(कार्यालयात कार्यालयीन चर्चेत गर्क असताना)
अचानक फोन: "सर, हम अलानेफलाने बँकसे बात कर रहे है. आपको गलानेफलाने रूपयोंका कर्जा मंजूर हो गया है."
(अशावेळी "माझा नंबर तुम्ही कसा मिळवलात ?"वगैरे प्रश्नांना कशी उत्तरे येतात याचा भरपूर मनस्तापात्मक अनुभव गाठीशी असलेला) मी स्पष्ट मराठीत सुरू करतो.
मी: कृपया मराठीत बोलाल का ?
फोन : क्यो सर?
मी :(आवाजात शक्य तेव्हढा भाबडेपणा आणत) मला हिंदी येत नाही हो.
फोन : तो सर, कौनसी भाषाए आपको आती है ?
मी : (त्या भुक्कड बँकेच्या भुक्कड काॅलसेंटरच्या कर्मचार्‍यांची भाषिक पातळी माहिती असल्याने) मला मराठी, इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या चारच भाषा येतात.
फोन तिकडूनच हताशेने कट होतो. आणि आत्तापर्यंत गांभीर्यपूर्ण वातावरणात चाललेल्या कार्यालयीन चर्चेत हास्यस्फोट होतो.

Sunday, August 25, 2019

रामराज्याची संकल्पना

"नृशंस कुणी ना,

कुणी ना नास्तिक,

अतृप्तीचा कुठे न वावर,

नगरी, घरी, अंतरी."


ही खरी रामराज्याची संकल्पना आहे.

"जो जे वांछिल, तो ते लाहो" 
इतकीच ही कल्पना सुध्दा कलियुगात भाबडी आणि अशक्य वाटेल.
पण
विचार करून पहा, या दृष्टीने समाजाची पाऊले पडत गेलीत तर किती कल्याणाचे होईल ?
आणि विचार केलात तर तो प्रत्यक्षात आणायला मार्गही सुचेल.

Saturday, August 24, 2019

अध्यात्मिक व्यक्तीच पण जरा वेगळ्या

आजकाल सार्वजनिक समारंभात ( लग्न, मुंज वगैरे ) काही काही भगिनीवर्ग एव्हढा मेकपचा थर फासतात...
... की आणखी फक्त एक पावडरचा पफ जर यांनी फिरवला...
...तर हॅलोजन दिव्यात काढलेल्या यांच्या फोटोत चेहेर्‍याऐवजी फक्त पांढरा प्रकाशच (अध्यात्मिक माणसासारखा) फाकेल की काय अशी मला दा...ट शंका येते.

Friday, August 23, 2019

प्रसंग नेहेमीचाच : ब्रम्हास्त्र नवे

प्रसंग : एका सीमांतपूजन प्रसंगी जाण्याच्या तयारीचा.
नवरोजी अगदी तय्यार होऊन सुपत्नी आणि सुकन्या तयार होण्याची वाट बघत बसलेलेत.
खूप वेळांपासून
"अग, झालय की नाही तुमच ? आवरा"
"बस. पाच मिनिटच. किती तुला घाई ?"
अशा व्हाॅलिजचा खेळ रंगतोय.
शेवटी नवर्‍याने ब्रम्हास्त्र काढले.
"आता नवरदेव, नवरी आणि वर्‍हाड्यांनाच घरी बोलावूयात. घरीच सीमंतपूजन आटोपेल."
पाच मिनीटांत आम्ही समारंभाच्या स्थळाकडे रवाना झालेलो होतो.


Thursday, August 22, 2019

प्रपंच आणि परमार्थ

जगात कधीच, कुणालाच,
हव तेव्हढ, हव ते आणि हव तेव्हा,
मिळत नाही.
म्हणूनच तृप्तीची व्यवस्था जिथे निश्चितच नाही त्या ठिकाणाला प्रपंच म्हणतात.

परमार्थातल्या प्राण्याला काही नकोच असत आणि म्हणून
तृप्तीची निश्चित व्यवस्था ज्याठिकाणी आहे त्या ठिकाणाला परमार्थ म्हणतात.
परम = शेवटचा/ची
अर्थ = प्राप्त करून घेण्याची वस्तू.
जीवनात सगळ्यात अखेरीस जर काही प्राप्त करून घ्यायचे असेल तर हा तृप्ततेचा परमार्थ.
(ऐकलेली अनंत प्रवचने, कीर्तने यांचे सार)

Wednesday, August 21, 2019

व्यवस्थितपणाचे मापदंड वगैरे वगैरे...

ज्या घरात जुन्या वर्तमानपत्राची रद्दी,
१. अगदी क्रमवार रचून ठेवलेली असते. इतकी की गेल्या रविवारची पुरवणी या रविवारी हवी असेल तर मोजून ८ व्या पेपरमध्ये ती असेलच याची खात्री असेल...
२. रद्दी पेपरची घडी सुध्दा छापखान्यातून बाहेर पडणार्‍या पेपरच्या घडीसारखी नीट ठेवल्या गेली असेल..
तर
त्या घराला व्यवस्थितपणाच "सिक्स सिग्मा" सर्टिफिकेटच मिळायला पाहिजे. हा माझा आग्रह आहे.
(काहीकाही जण पेपर एकदाच वाचला की इतका चोळामोळा करून ठेवतात की हा पेपर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या काळातला नाही, ह्यावर फक्त तारखेकडे पाहूनच विश्वास ठेवावा लागतो.)

Tuesday, August 20, 2019

चपलांच्या दुकानात

प्रसंग : सौभाग्यवतींसोबत त्यांच्या चपला घेण्यासाठी दुकानात जाण्याचा.
दुकानात एका "सुकांत चंद्रानना" ने पावणेपाच (किंवा सव्वासहाही असेल) इंचाची हिल्स घालून ट्रायलसाठी आमच्यासकट दुकानातल्या सगळ्या उपस्थितांपुढून "कॅटवाॅक" केला.


उंची वाढवण्याचा तिचा उसना हव्यास पाहून, मला एकदम जुन्या सर्कशींमधला पायाला दोन बांबू बांधून उंच होऊन फिरणारा जोकरच आठवला.
अती विचार करण वाईट रे बाबा, वाईट. कधी काय आठवेल ? याचा नेम नाही.

Monday, August 19, 2019

अवधूत म्हणजे कोण ?

"अवशिष्ट धुवून काढतो तो अवधूत."


आपण जन्मजन्मांतरीची साठवणूक करून या जन्मात येतो. आपल्याला गतजन्मीचे काहीच आठवत नाही आणि आपण मागच्या जन्मीचे सगळे धुवून काढण्याऐवजी ह्या जन्मात,आपल्या कर्माने, आपल्या विचारांनी, काही ना काही नवीन कर्मे तयार करत जातो.
पर्यायाने भोगण्यासाठी कर्मफळेही तयार होत जातात. वाईट फळे भोगावीच लागतात तशी चांगली फळेही भोगावीच लागतात. ती भोगायला जन्म घ्यावा लागतोच.
"या जन्मी जे करावे,
ते पुढल्या जन्मा उरवावे
आणि ते भोगण्यासाठी यावे
जन्मा हा सिध्दांत असे"
— श्रीगजाननविजय

प.पू. ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात की "स्टेशनावर गडबडीत गाडी पकडण्यासाठी जात असताना एखाद्या माणसाशी भांडत बसलो म्हणून गाडी सुटली काय ? किंवा एखाद्या मित्राशी ख्यालीखुशाली विचारण्यात वेळ गेल्यामुळे गाडी सुटली काय ? दोन्हींचा परिणाम एकच."
त्याप्रमाणे वाईट कर्मांच बंधन पुढल्या जन्मासाठी आहे, तसच चांगल्या कर्मांचही बंधन आहेच. अकर्म अवस्थेत मनुष्यप्राणी राहू शकत नाही म्हणजे कर्मे होत राहणार आणि आपल्या बँकेत लेजर एन्ट्रीज होत राहणारच.
म्हणून त्या अवधूताचे स्मरण करायचे आहे. तो भक्तांच्या चांगल्या कर्माचाही अवशिष्ट धूवून काढतो. जन्मजन्मांतरीचं संचित जो धूवून काढतो, भक्तांच संचित सगळं संपवून टाकतो आणि जो मोक्षाप्रत नेतो असा तो अवधूत.
त्याचे चिंतन आपण करीत रहावे म्हणून अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त.
— तराणा उत्सव मार्च २०१९ मधील चिंतन.





Sunday, August 18, 2019

अध्यात्म : देह आणि पलिकडे

आज आपल्याला जगात जी किंमत आहे ती
आपल्या सौंदर्यामुळे नाही,
आपल्या ज्ञानामुळे नाही,
आपल्या ऐश्वर्यामुळे नाही
तर
या देहात चैतन्यरूपाने वावरणारा परमेश्वर वास करीत आहे म्हणून आहे.
हे जाणणे म्हणजेच अध्यात्माची पहिली पायरी.
कारण एकदा हे चैतन्य देहातून गेल तर कितीही मोठा रूपवान असो, पंडीत, ज्ञानी असो किंवा सम्राट असो,
चैतन्यविरहीत देह हा सगळ्यांसाठीच त्याज्य असतो.

Saturday, August 17, 2019

झी गौरव पुरस्कार : वास्तव

मी घर बांधायच ठरवल.
घर पूर्ण झाल्यावर "मी गौरव सोहळा" आयोजित केला.
काॅलनीत इतरांनीही घरे बांधली होती त्यांच्या त्यांच्या कारागिरांची नावे बळेच या सोहळ्यात घुसवलीत.
सोहळ्यात "उत्कृष्ट गवंडी, उत्कृष्ट सुतार, उत्कृष्ट रंगारी" हे सगळे पुरस्कार माझ्याच कारागिरांना दिलेत.
याला एका शब्दात "झी गौरव पुरस्कार" म्हणतात हे माहिती नव्हत.

Friday, August 16, 2019

प्रवास : खरा आणि कल्पनेतला

पु ल म्हणतात, "'चॅग्रॅम' ही हाक ऐकताच चहा गरम, 'सालादू' म्हणजे मसाला दूध आणि 'ब्डी..य' म्हणजे रबडी हे ज्याला कळल त्याला रेल्वे भरपूर घडलेली असते."
तसच lentil soup म्हणजे अर्धवट फोडणी दिलेल फुळकवाणी फोडणीच वरण आणि brown rice म्हणजे आपला देवधान्याच्या तांदळाचा भात हे ज्याला कळल त्याला आंतरराष्ट्रीय विमानप्रवास भरपूर घडलेला असला पाहिजे.
— पासपोर्ट नसतानाही (कल्पनेने आणि वाचनाने) जगभ्रमण केलेला प्रवासी पक्षी.


Thursday, August 15, 2019

एक चिंतन

आपल्यापैकी अनेक जण सदगुणांचा समुच्चय करून चांगुलपणाने वागणारे असतात. पण सार्वकालिक समाजस्थितीत त्यांना नैराश्यच येताना दिसते.
आपल्या चांगुलपणाची दुसर्‍या कुणीतरी नोंद घ्यावी ही अपेक्षाच आपल्या एकंदर चांगुलपणाला कमीपणा आणणारी आणि म्हणूनच नैराश्याला कारण होते.
— स्वानुभवात्मक चिंतन.

Wednesday, August 14, 2019

स्पष्टोक्ती.

निंदकाचे घर शेजारी असावे या इच्छेपेक्षा स्तुतीपाठकांच्या वसाहती आसपास वसविण्याचे प्रयत्न होऊ लागले की र्‍हास अटळ आहे. ( व्यक्तींचा आणि संस्थांचाही)

Tuesday, August 13, 2019

एन्सायक्लोपेडीया पण रस्त्यावरचा.

पु.ल. म्हणतात " मुंबईतल्या चार पानवाल्यांच्या दुकानातली वचने उतरवून एका ज्ञानकोशाच्या जाडीचा ग्रंथ सहज लिहीता येईल."
तद्वतच मुंबई आग्रा (किंवा तत्सम कुठल्याही) महामार्गावर धावणार्‍या ट्रक्स आणि बसेसच्या मागील बोधवचनांचाही Encyclopedia होईल.


Monday, August 12, 2019

टक्कल आणि फोटोशॉपचे प्रताप

मला स्वतःला केस फार वाढवायला आवडत नाहीत. बाकी जनता जेवढे केस ठेवून सलून बाहेर पडते तेवढे केस ठेवून मी सलूनमधे शिरतो. कापले जावेत म्हणून.
जगातला कदाचित मी एकटाच असेन जो स्वतःला टक्कल पडण्याची आतूरतेने वाट बघत असेल. व. पुं. च्या मते
"१. टक्कल हे नेहमी नीटनेटक असत.
२. त्यात काही स्टाईल नसते आणि
३.टकलाचा मेंटेनन्स नसतो."
नैसर्गिक टक्कल पडेल तेव्हा पडेल पण तोवर "सेमी टक्कल" स्टाईल तरी ठेवूयात म्हणून मी कायम मिल्ट्रीकट पेक्षाही कमी कटिंग ठेवत आलोय.
पण हाय रे किस्मत ! आमचे काही काही मित्र हे माझ्या केसांवर प्रयोग करायला फार इच्छुक असतात असेच आमचे एक मित्र,  Kiran Karthik त्यांनी केलेली ही करामत.


आता एकदम "गुरू — द प्रोफेसर" किंवा "जिंदगी — द लाईफ" सारख्या नावाच्या सौदिंडीयन हिरोसारखा दिसतो की नाही ?

Sunday, August 11, 2019

चष्मा, तारूण्य, वृध्दावस्थेकडे वाटचाल etc...etc...

कुठला चष्मा आपल्याला चांगला दिसतोय


यापेक्षा
कुठल्या चष्म्यातून आपल्याला चांगले दिसतेय

हा विचार मनात आला की तारूण्याच्या गावातून पाऊल पुढे टाकत वृध्दावस्थेकडे आपण वाटचाल सुरू केलीय हे नक्की समजावे.
- "My honest experiences with spectacles and lenses" या तत्वचिंतनात्मक आगामी ग्रंथातून.
ग्रंथलेखकः नेहेमीचेच यशस्वी प्रा. रामभाऊ तत्वचिंते.

Saturday, August 10, 2019

आपला मतलबीपणा.

गेले बरेच दिवस प्रकृतीच्या कारणास्तव आम्ही उभयता नियमित सकाळ संध्याकाळ फिरायला जातोय. फिरून झाल की त्या उद्यानालगतच एक शिव मंदीर आहे. संध्याकाळची वेळ असते. "प्रदोषकाळी शिव आराधन, घडेल तो भाग्यशाली" हे माहिती असल्यामुळे रोज शिवदर्शन घडते.
बर हे जे मंदीर आहे ते आहे पांडुरंगेश्वर शिव मंदीर. शिवपिंडी मागे पांडुरंगाची आणि रूक्मिणीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. रोज शिवासमोर नतमस्तक झालो की पांडुरंग रूक्मिणीसमोरही पांडुरंगाष्टक म्हणत नतमस्तक होण्याचा आमचा परिपाठ.

मंदीरातल्या इतर बर्‍याच भाविकांचे वर्तन मला थोडे वेगळे वाटले. ते सर्व नेहमी शिवासमोर आराधन करतात पण ज्याच्या नावाने हे मंदीर आहे त्या पांडुरंगाकडे अजिबात लक्ष न देता परत फिरतात.
काल आषाढी एकादशीनिमित्त मंदीराचा वर्धापन दिन समारंभ होता. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. मंदीरातही फुलांची अत्युत्कृष्ट सजावट केलेली होती. मोगर्‍याच्या फुलांनी शिवलिंग आणि तुळशीहारांनी पांडुरंग व रूक्मिणी सुशोभित खुलून दिसत होते.
काल मात्र सगळ्या भक्त मंडळींचे वेगळेच रूप पहायला मिळाले. काल दिनमहात्म्यामुळे सगळी मंडळी पांडुरंगाच्या चरणी लीन होती. पण मध्ये असलेल्या शंकरजींकडे त्यांचे साफ दुर्लक्ष. जणू ते तिथे नव्हतेच.
माणसामाणसांमधील संबंधांमध्ये "काम खतम, आदमी खतम" हा मतलबीपणा आपण आजकाल फार अनुभवतोय पण देवालाही आपण त्यातून सोडले नाही हे पाहून मजा वाटली आणि खिन्नताही आली.


Friday, August 9, 2019

सूर मागू तुला मी कसा ? जीवना तू तसा मी असा.


आजचा जीवनानुभव काही वेगळाच होता. गेले काही महिने प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांनी सक्तीचे दिवसातून सात आठ किलोमीटर फिरायला सांगितलेले आहे. त्यामुळे आम्ही उभयता सकाळ संध्याकाळ जमेल तेवढे फिरण्याचा प्रयत्न करतो. सकाळी चार किमी आणि संध्याकाळी साधारण साडेतीन पावणेचार किमी असा नित्यक्रम आहे.
गेल्या पंधरवड्यापासून त्याची फळेही दिसायला सुरुवात झालेली आहेत. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते आहे.
आज आमची दुचाकी सर्व्हिसिंगला टाकायची होती. खूप दिवस झालेत तिचे सर्विसिंग ड्यू आहे. पण आज मुहूर्त निघाला.
बरं आमचा भरवशाचा मेकॅनिक म्हणजे मनीष नगरचा "विनोद ऑटोमोबाईल्स" त्याच्याकडे गाडी नेऊन टाकणे आणि घरी इंद्रप्रस्थ नगरला परतणे असा आजचा सकाळचा कार्यक्रम.
मग काय ? अस्मादिक निघाले. दुचाकीवर स्वार होऊन.
विनोद कडे सकाळी साडेनऊला गाडी टाकली. संध्याकाळी त्याच्याकडून परत देण्याचे आश्वासन घेतले आणि परतताना लक्षात आल की आता रिक्षा, ओला टॅक्सी करण्यापेक्षा विनोबा ट्रॅव्हल्सने (पायी पायी) जाऊयात. गेल्या महिन्याभराच्या भटकंतीची फिटनेस टेस्ट तरी होईल.
मोबाईल मध्ये map my walk या नेहेमीच्या अॅपमध्ये अंतर मोजत मोजत जाऊयात. तसेही आपल्याला सकाळी साधारणतः चार किलोमीटर फिरण्याची सवय आहेच. मग म्हटलं निघूयात. आपल घर चार, साडेचार, गेला बाजार पाच किमी पेक्षा इथून दूर नाही.
आमच्या बालपणी अगदी बाराव्या वर्गापर्यंत आम्ही खूप पायी चालायचो. नंदनवनच्या घरून पायी पायी अयाचित मंदीरचा बसस्टाॅप गाठणे. तिथून २ किंवा ३ नंबरच्या बसने लाॅ काॅलेज स्टाॅप ला उतरणे आणि तिथून पुन्हा पायी C P & Berar, रवीनगर गाठणे. हाच उलट क्रम संध्याकाळी परतताना. परतताना तर लाॅ काॅलेज स्टाॅपवरून जागा मिळत नाही म्हणून संध्याकाळी अगदी लक्ष्मीभुवनपर्यंत वाट तुडवायचो. तिथून गिरीपेठ मार्गे जाणार्‍या १ आणि ४ नंबरच्या बसेसही २ व ३ नंबरच्या बसेससह मिळायच्यात.
आज माझ्या मनातल्या डिकास्टाला (संदर्भः सिंहासन, १९७९, अरूण साधू, जब्बार पटेल) मीच विचारल, "आज जवळपास तीस वर्षांनी तुला हे जमेल अस वाटतय तुला ?"
माझ्या मनातल्या डिकास्टाने अगदी त्याच बेदरकारपणे उत्तर दिल, "अरे अगदी सहज जमेल. मजेत जाऊ, हसत, खेळत."
पण नागपूरच्या उन्हाला मी अंडरएस्टिमेट केल्याचे थोड्याच वेळात लक्षात आलं. थोडावेळ मौजेत निघालो पण पहाटे चार किलोमीटर फिरणे आणि नागपूरच्या भर उन्हात सकाळी दहा साडेदहा वाजता दोन अडीच किलोमीटर फिरणे यात काय फरक आहे ? ते फिरल्या वरच कळायला लागल. ऊन चांगलंच लागत होत. नागपुरी भाषेत "चांगलीच शेकल्या गेली". मग काय ? जयप्रकाश नगर पाशीच, पावणे तीन, तीन किलोमीटर नंतर, पाय इतके दुखायला लागले की बस रे बस. आणि कंटाळाही यायला लागला. असं वाटू लागलं की कोणीतरी ओळखीचं भेटावं आणि घरी घेऊन सोडाव.
पण कसंच काय ? अशा प्रसंगी "सारा गाव मामाचा, एकही नाही कामाचा" या म्हणीप्रमाणे एकही ओळखीचा माणूस भेटत नव्हता. रस्ताही जवळपास निर्मनुष्य होत चाललेला होता.
तसेच पाय ओढत ओढत, ओढत ओढत ५२ मिनीटांत पावणेपाच किमी कापून घरी पोहोचलो आणि सोफ्यावर कोसळत कानाला खडा लावला. यापुढे असल्या भयंकर ऊन्हात असले साहस पुन्हा करायच नाही.
एक नवीन जीवनानुभव. त्याचीही आपली वेगळीच मजा.
१९ वर्षांपूर्वीचा असाच एक कलंदर अनुभव यानिमित्ताने आठवला.


Thursday, August 8, 2019

निवडणूक : एक अभिनव कल्पना

निवडणूक आयोगाने फक्त जाहीर कराव की मतदानाचा अधिकार फक्त काही निवडक लोकांनाच मिळेल.
मग बघा,
लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मतदानकेंद्रांवर
"अरे, अस्सा कस्सा देत नाही ? घेतल्याशिवाय रहात नाही." अशा घोषणा देत पोहोचतात की नाही ?
प्रत्येक ठिकाणी किमान ९० % मतदान पक्के.
जी गोष्ट सहज मिळते त्याची किंमत नसते. अप्राप्य गोष्टींचा अट्टाहास हा मानवी स्वभाव आहे.
— रामच्या आयडियाची कल्पना.

Wednesday, August 7, 2019

पर्यवेक्षण: एक ताप

शिक्षकी पेशात परीक्षांच्यावेळी पर्यवेक्षण (शुध्द मराठीत invigilation) अपरिहार्य आहे. पण ते दोन, तीन तास प्रत्येकाला मिनी तुरूंगवासासारखेच वाटतात.

अशावेळी दहा मिनीटांसाठी सोडवायला येणार्‍याची (reliever) वाट अगदी परमेश्वराची वाट पहावी तशी पाहिल्या जाते. ती व्यक्ती दिसल्यावर अगदी "गरूडावरी बैसोनी माझा कैवारी आला." अशी या पर्यवेक्षकाची भावना होते.

बर दहा, पंधरा मिनीटांसाठी सुटल्यावर आपण पॅरोलवर सुटलेले आहोत अशी भावना होते. त्या वेळात अगदी तातडीच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करून पर्यवेक्षणाकडे परतताना पाय आपसूकच जड होतात.

मला वाटत बालपणी शाळा सुटल्याच्या घंटेचा आवाज ऐकून मुलांना जेव्हढा आनंद होत नसेल त्यापेक्षा अधिक आनंद तमाम पर्यवेक्षकांना पेपर संपल्याची घंटा ऐकून होतो.

पर्यवेक्षण मनापासून आवडणारा पर्यवेक्षक विरळाच.


आणि आमचा पंगा झाला — १


(पुढे भरपूर भाग येणार म्हणून हा भाग १)
काहीकाही माणसांची personality किती मवाळ असावी ? कितीही असू देत. आमच्याइतकी नसावी.
त्याच काय झाल ? मधे आमचे एक रियुनियन झाले. शाळेपासून बिछडलेले आम्ही सर्व जवळपास पाव शतकांनी एकमेकांना भेटलो. आनंद झाला. पण काही काही लोकांच judgement at first site इतक जबरदस्त असत की पहिल्या भेटीतच हे गिर्‍हाईक मवाळ आहे हे माझ्या एका मित्राने हेरले.
मग दररोज सकाळी व्हाॅटसअॅप वरून मला जीवनविषयक उपदेशामृत (सगळे ढापलेले forwards. उसनी विद्वत्ता.) मी पण सौजन्याने कधी हसर्‍या स्मायलीज, कधी थम्सप ची खूण असे पाठवून बोटचेपे धोरण सुरू ठेवत होतो.
मनातून त्याला विचारावेसेही वाटे "बाबा रे. माझ्या मनाची अस्थिर अवस्था वगैरे झालीय हे तुला कोणी सांगितल ? आणि तुला मदत मागितलीय कुणी ?
बर, बाकीच्या इतर मित्रांकडे आडून आडून चौकशी केली तर हे येडच्याप कौन्सिलर इतर कुणाच्याही व्हाॅटसअॅपवर तसला प्रकार करत नव्हते असे कळले. विचार केला. जाऊ देत ना. न वाचता, नुसते हसरे चिन्ह, प्रोत्साहन चिन्ह पाठवायला ना आपले हात झिजत, ना फोनची screen.
पुढेपुढे या महाशयांची हिंमत अधिकच वाढली. कधीही फोन करायचे आणि उचलल्या उचलल्या आपले जीवनाचे तत्वज्ञान माझ्या कानात ओतायला सुरूवात करायचे. "बाबा रे, जीवन म्हणजे काय हे ठाऊक आहे का तुला ?" अशी उपदेशामृताला (निरर्थक) सुरूवात व्हायची ती तब्बल अर्धा तास चालायची. मधेमधे मला "हं, हं, बरोबर" यापेक्षा अधिक अवाक्षर बोलू न देता हे महापुरूष सुरूच.
एकदा गाडी चालवताना यांचा फोन. "मी गाडी चालवतोय" हे माझे सांगणे त्याच्या कानापर्यंत गेले पण मेंदूत झिरपले नाही हे मला कळले कारण त्यानंतर मी गाडी बाजूला लावून त्याची तीच टेप अर्धा तास ऐकतोय. गंतव्य स्थळी पोचायला उशीर झाला तो वेगळाच.
मग आम्ही मवाळपणा टाकायच ठरवल. पुन्हा आठवडाभरात गाडीने बाहेरगावी जाताना या येड्याचा फोन. "ड्रायव्हिंग करतोय, गावाला जायला निघालोय" हे नेहेमीप्रमाणेच ignore झाले. मग मी फोन तसाच ग्लोव्ह बाॅक्समधे ठेवला. गाडी चालवत राहिलो. मधूनमधून मोठ्ठ्याने "हो,हो. बरोबर" वगैरे परवलीचे शब्द बोलत राहिलो. सहप्रवाशांना यामागील इतिहास माहिती असल्याने त्यांना ही करमणूक मस्त झाली.
अर्धा तास झाला. जवळपास ३० किमी गाडी चालवून आम्ही गंतव्य स्थानाजवळ येत होतो. मी अंदाजे फोन उचलला. हे महाशय तिकडून बोलतच होते.
आणि अगदी अनाहूतपणे माझ्याकडून "अरे, तू बोलतोच आहे का ?" निघून गेले.

पलीकडून भयाण शांतता. 
काही दिवसांनी मित्रमंडळींच्या गृपवर "राम एक आगाऊ, उद्दाम माणूस आहे" असे हे महाशय offline बोलत असल्याचे कळले आणि पंगा यशस्वी झाल्याच्या आनंदात मी त्या पाताळविजयम नावाच्या मद्रासी सिनेमातल्या राक्षसासारखा "हाॅ..हाॅ..हाॅ.." करून हसलो.

(पुलंनी आम्हाला बिकट प्रसंगी असच विकट हसायला शिकवलय त्याला आमचा नाविलाज आहे.)
— प्रा. राम प्रकाश किन्हीकर. पाताळविजयमचे राक्षस.


Tuesday, August 6, 2019

टक्कल

वैद्यकीय सल्ल्याने का होईना, संपूर्ण टक्कल केले खरे, पण आज त्याचा खरा फायदा कळला.

"बाबा, दोनच दिवसात तुझ्या डोक्यावर भरपूर पीक उगवलय रे" — सुकन्येनी आज संध्याकाळी मालिश करता करता दाद दिली.

"मग ? आहेच त्याच डोक सुपीक." — सुपत्नीची स्वयंपाकघरातून दाद आली.

१९ वर्षांपूर्वी आपण जोडीदाराची योग्य निवड केल्याच feeling माझ्या मनात दाटून आल.
तिलाही अगदी तसच वाटल असाव.


Monday, August 5, 2019

लोकमान्य टिळक टर्मिनस, यशवंतपूर, आनंदविहार, बांद्रा टर्मिनस वगैरे.

भारतीय रेल्वेची एकाच शहरातली निरनिराळी स्थानके भिन्न भिन्न स्वभावाची असतात. किमान मला तरी तशी भासतात. 

मुंबई शहराचच उदाहरण घ्या ना. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणा-या गाड्यांना जी प्रतिष्ठा आहे ती दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणा-या गाड्यांना नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून सुटणा-या गाड्या या खानदानी आणि गर्भश्रीमंत वाटतात. त्यांचा डौल वेगळाच तर दादर टर्मिनसवरून सुटणा-या गाड्या आपल्या मध्यमवर्गीय मनोवृत्तीच्या वाटतात. दादर टर्मिनस वरच्या इनमिन दोनच प्लॅटफ़ॉर्म्सच्या चिमुकल्या संसारात खुष राहणा-या आणि त्यातच टुकीने संसार करणा-या.

लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणा-या गाड्या मात्र ख-या कष्टकरी वाटतात. मुंबईची जनता या टर्मिनसला ’भय्या टर्मिनस" म्हणूनच ओळखते. (भोपाळच्या उत्तरेला जे काही लोक राहतात ते सगळे मुंबईकराच्या दृष्टीने "भय्या’ हे सुद्धा इथे जाताजाता नमूद केले पाहिजे.) तसही हे स्टेशन सुरू झाले तेव्हा इथून सुटणा-या जास्तीत जास्त गाड्या पाटणा, वाराणसी, मुझफ़्फ़रपूर, गोरखपूर इथे जाणा-याच होत्या. बिचा-या ज्ञानेश्वरी आणि समरसता या डिलक्स गाड्यांनाही, त्या केवळ या टर्मिनसवरून सुटतात म्हणून, हवी ती प्रतिष्ठा नाही.


म्हैसूर टर्मिनस. मी आजवर पाहिलेल्या स्टेशन्सपैकी सर्वोत्कृष्ट स्टेशन. स्वच्छ आणि नीट्नेटक.

आता तर काही गाड्या पनवेल पर्यंत आणून तिथूनच वापस सोडतात म्हणे. छे ! पनवेल टर्मिनस ही केवळ सोय. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठीचा तात्पुरता उपाय. पनवेलने स्वतःला मुंबईतले टर्मिनस म्हणवून घेणे म्हणजे एखाद्या वाशिंद, खडावली किंवा पार वांगणी च्या माणसाने स्वतःला मुंबईकर चाकरमानी म्हणवून घेण्यासारखेच. मुंबईची हद्द मुलुंडपर्यंतच. ठाणे म्हणजे मुंबई नाही आणि डोंबवलीकराला किंवा कल्याणकराला कितीही वाटल तरी, डोंबिवली आणि कल्याण म्हणजे मुंबई नाही. तसेही एखाद्या अस्सल ठाणेकर माणसाला (मुक्काम: नौपाडा, कोपरी, राममारूती रोड, गोखले रोड हं.  फ़ारतर साकेत, वृंदावन सोसायटी, आणि वसंतविहार पर्यंतच ठाणेकर ठाण्याची हद्द समजतात.  घोडबंदर, गायमुख वगैरे ठाण्याच्या वसाहती आहेत असेच खरा ठाणेकर मानतो. इंग्रजांच्या जशा जगभरच्या वसाहती होत्या तश्या.) ठाणे हे मुंबईचा भाग आहे हे पटवून घ्यायचच नसत. ठाण्याची निराळी अस्मिता आहे. ठाणे हे पुण्याइतकेच पुरातन शहर आहे याचा त्याला सार्थ अभिमान असतो.  म्हणजे मलाही आहे तसा अभिमान. नवी मुंबईतल्या १२ वर्षांच्या वास्तव्यात जेव्हढी नाळ ठाण्याशी जुळली तेव्हढी वाशी, बेलापूर आदिंशी जुळली नाही.

पश्चिम रेल्वेचेही तसेच. पश्चिम रेल्वेचेही तसेच. मुंबई सेंट्रल वरून सुटणा-या गाड्यांचा डौल, प्रतिष्ठा बांद्रा टर्मिनस वरून सुटणा-या गाड्यांना नाही. ती केवळ सोय. घरात पाहुणे जास्त झाले की काही बिनमहत्वाच्या पाहुण्यांच्या गाद्या घराच्या पडवीत, व-हांड्यात घातल्या जातात तसेच. तरीही मला ती स्वराज एक्सप्रेस बांद्र्यावरून  न सुटता, मुंबई सेंट्रल वरून सुटायला हवी अस प्रकर्षाने वाटत असत.

बंगळूरूलाही तसेच. क्रांतीवीर संगोली रायण्णा बंगळूरू सिटी जंक्शन (म्हणजे आपले जुने बंगलोर सेंट्रल स्टेशन) वरून सगळ्या छान गाड्या सुटतात असे माझे मत आहे. यशवंतपूर ही एक सोय. बाहेरगावच्या पाहुण्यांसाठीची पडवी. रात्री गाडी थोडी उशीरा पोचल्याने तिथून केम्पेगौडा बस स्थानकापर्यंत नेताना रिक्षावाल्याने केलेली दादागिरी आणि फ़सवणुकीचा प्रयत्न आज १० वर्षांनंतरही लक्षात आहे. "यशवंतपूर - राजेंद्रनगर म्हणजे बंगलोर - पाटणा गाडी" हे कळायला भारतीय रेल्वे कळावी लागते. तसेच "मंडुआडीह - तांबरम म्हणजे वाराणसी - चेन्नई" हे कळायला तुम्ही रेल्वेचे फ़ॅनच हवे. 

चेन्नईच मात्र तस नाही हं. चेन्नई सेंट्रल हे संपूर्ण भारतभर जाणा-या गाड्यांसाठीच अत्यंत महत्वाच स्थानक असलं तरी चेन्नई एग्मोर ही प्रत्येक तामिळ माणसाची अस्मिता आहे. ब्रॉडगेज येण्यापूर्वी हे स्टेशन मीटर गेज संस्थानाची राजधानी होते. तामिळनाडूच्या अंतर्गत भागात जाणा-या जवळपास सर्वच गाड्या इथूनच जातात. त्यामुळे चेन्नईकरासाठी चेन्नई सेंट्रल हे राजधानी असेल तर चेन्नई एग्मोर हे सांस्कृतिक राजधानी आहे. त्याला थोड जास्तच भावनिक महत्व त्यांच्या दृष्टीने आहे. 

(लेख नावासकट शेअर करायला अनुमती आहे. तरीही काहीच दिवसात हा लेख माझ्या नावाशिवाय ब-याच व्हॉटसऍप गृप्समध्ये फ़िरताना पाहण्याचे प्राक्तन नशीबी आहे यावर माझा विश्वास आहे. )


चेन्नई सेंट्रलची गॉथिक शैलीतली देखणी इमारत.



चेन्नई एग्मोर. वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूना. चेन्नईकरांच्या मर्मबंधातली ठेव.

नवी दिल्लीचही तसेच. नवी दिल्ली टर्मिनस तसे उदार अंतःकरणाने खूप गाड्यांना सामावून घेत असले तरी त्याच्याही बिचा-याच्या मर्यादा आहेत. म्हणून मग हजरत निझामुद्दीन ही सोय आली. आनंदविहार टर्मिनसला दिल्लीचे "भय्या टर्मिनस" म्हणायला हरकत नाही. आणि दिल्ली सराई रोहिल्ला काय विचारता ? रोहिल्ल्यांसारखेच क्रूर असे हे टर्मिनस असेल असे वाटते पण बिचारे अगदीच एव्हढेसे आहे. तरी इथून निघणा-या गाड्या " क्यो, म्हारो ठाठ नई दिल्ली से कोई कम है के ?" अशी जाट बोली बोलतच बाहेर पडत असतील अस मला उगाच आपल वाटत असत.


छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर. शांत, निवांत.

कलकत्त्याच थोड चेन्नईसारख आहे. तसेही विचारांच्या कट्टरतेबाबत आणि उखडेलपणाबाबत वंगबंधूंची तुलना तामिळ बंधूंसोबतच होऊ शकेल. कलकत्त्यात पश्चिम आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी हावडा टर्मिनस आहे तसेच उत्तरेकडे आणि पूर्वेकडील आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालॅंडकडे जाण्यासाठी सियालदा टर्मिनस आहे. हावडा हे कलकत्तेकरांच आवडत टर्मिनस असेलही पण सियालदा हे त्यांची "मर्मबंधातली ठेव" आहे. आजकाल ते आपल संतरागाछी वगैरे पिल्लू टर्मिनस निघालय. पण शेवटी त्याची किंमत आनंदविहार टर्मिनस इतकीच.

आपल्या आयुष्यांनीही थोड रेल्वेच अनुकरण याबाबतीत केल तर ? आपली आपली टर्मिनस स्टेशन्स ठरलेली आहेत रे बाबांनो. थोड आपल्या आयुष्याचा अंतर्मुख होऊन विचार करा मग तुमच तुम्हालाच कळेल की आपल नेमक टर्मिनस कुठल आहे. सगळ्याच गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला नाही पोहोचू शकत. पण मार्गात व्यवस्थित आणि सुखरूप प्रवास करणे तर आपल्याच हातात आहे न ? शिवाय छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोचणारा माणूसच मुंबई गाठू शकतो आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचा माणूस कुठल्यातरी भलत्याच शहरात पोचतो असे थोडेच आहे ? उलट पूर्व उपनगरांमध्ये किंवा सांताक्रूझ, विलेपार्ले इत्यादी पश्चिम उपनगरांमध्ये पोचण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसपेक्षा लोकमान्य टिळक टर्मिनस जास्त उपयुक्त ठरेल 

तात्पर्य काय ? टर्मिनस ची सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा कुठलीही असो, माझ्या जीवनाच्या प्रवासात, मला स्वतःला प्रवासाला उपयुक्त ठिकाणी मी सुखरूप पोचण्याचा थोडा स्वार्थी विचार जास्त महत्वाचा नाही का ?

-  प्रा. राम प्रकाश किन्हीकर, नागपंचमी, ०५/०८/२०१९


भारताचे सगळ्यात दक्षिण टोकाचे टर्मिनस, कन्याकुमारी. गावाबरोबरच या स्टेशनचीही शांतता मनाला भुरळ पाडून जाते.


भारताचे सगळ्यात दक्षिण टोकाचे टर्मिनस, कन्याकुमारी. गावाबरोबरच या स्टेशनचीही शांतता मनाला भुरळ पाडून जाते.

वाहनविचार

शहरातून रस्त्याने जाताना कुठल्या कार ने किती वेगात जाव ? याचे आपल्या मनात काही आडाखे असतात.

मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जग्वार, या गाड्यांनी हत्तीच्या ऐटीत, डौलदार चालीने चालावे. एंजिनाची ताकद कितीही असली तरी शहरातून चालताना आसपासच्या गाड्यांना, पादचार्‍यांना मान वेळावून पहाण्याइतपत आणि हेवा करण्याइतपत वेळ मिळावा इतक्या आणि इतक्याच वेगाने जावे.

आज एक मर्सिडीजवाला उगाचच "आगभुकाई" करत प्रतापनगर चौकातून पसार झाला. हत्ती पळताना किती कुरूप दिसेल तशी ती कार दिसत होती.

वाटून गेल की अरे हा प्रांत तर इआन आणि नॅनो चा. आमच लहानस एंजिन तुम्हाला वाटत त्यापेक्षा जास्त पाॅवरफुल आहे हे जगासमोर त्यांना सिध्द करायचच असत. कायम वेगात पळवतात.

तमाम वाॅक्सवॅगन (का फाॅक्सवॅगन) वाले "खरतर जर्मन टेक्नाॅलाॅजीची मर्सिडीजच घेणार होतो. पण नाईलाजाने (मर्कच वेटिंग फार होत हो. शिवाय आमच्या हिला हवा तो रंगही मिळेना. वगैरे वगैरे कारणे सांगत) वाॅक्सवॅगन घ्यावी लागली" या आविर्भावात जरा जोशातच हाणत असतात. प्रत्येक १०० मीटरमागे आपला एवंगुणविशिष्ट हाॅर्न वाजवलाच पाहिजे असा नियम असल्यागत हाॅर्न वाजवत असतात.

बाकी आपले टाटा, मारूती, ह्युंदै वाले मध्यमवर्ग. भीडस्त आणि सामान्य. सगळ्याच बाबतीत Normal Distribution Curve च्या 1 sigma मध्ये येणारे.

—आपला वाहनविचारज्ञ (कशी वाटतेय माझी मलाच नवीन पदवी ?) रामभाऊ.

Sunday, August 4, 2019

नात्यांमधली महत्वाची thoery

नातेसंबंधांत कटुता आली तर दोन्ही पक्षांनी एकेक पाऊल मागे घ्यायचे ठरवले तर दोघेही दोनदोन पावले प्रगती करतील.
पण
दोघांमधल्या एकानेच एक पाऊल मागे घेतले तर दोघांमधले अंतर चार पावलांनी वाढते.
— 
("The mathematics involved in relationship" ह्या theory पुस्तकाचे आणि प्रॅक्टीकल जर्नलचे सिध्दहस्त लेखक
नेहमी एकेक पाऊले मागे जात पोळल्या गेलेले अनुभवी) 
-- प्रा. रामभाऊ नातेवाले.

Saturday, August 3, 2019

महाराष्ट्र: भाषाभेद

दोनदोन क्रियापदं वापरली (करून राह्यलो, जाऊन राह्यलो वगैरे) की बुलढाण्याच्या पूर्वेला व भंडार्‍याच्या पश्चिमेला,
"नाष्टा" शब्द कानी पडला की पेठ नाक्याच्या दक्षिणेला
आणि
इंग्रजी क्रियापदाच्या शेवटी "ड" पूर्ण उच्चारला (उदाः confused = कन्फ्यूजड, walked = वाॅकड, सगळे "ड" पूर्ण हं, हलन्त नाही) की शंभर टक्के सोलापूर जिल्हा.

एव्हढा महाराष्ट्राचा भूगोल आमचा पक्का आहे.

— कुठल्याही चॅनेलवरच्या चर्चेत सहभागी माणसांची भाषा नुस्ती ऐकून त्याचा जिल्हा सांगणारे बहुबोलीकोविद कुडमुडे प्राध्यापक रामभाऊ

Friday, August 2, 2019

३० वर्षांपूर्वीच्या माझ्या आठवणींच्या कवडश्यातून

साधारणतः १९८९ नंतर बरेच वर्षे मी नियमीत रोजनिशी लेखन केले. आज त्या आठवणींच्या कवडशात डोकावायला खूप मजा येते. त्याकाळचे नातेसंबंध, तत्कालीन खर्च, समाजजीवन आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे तत्कालीन बसगाड्या आणि रेल्वेगाड्या.
चंद्रपूर डेपोकडे MCA series च्या म.का.औरंगाबादने बांधलेल्या TATA एशियाड बसेस होत्या. मला वाटत 7602 पण चंद्रपूरकडेच होती.



नागपूर — अहेरी मार्गावर बहुतांशी गाड्या म.का. दापोडीनेच बांधलेल्या असायच्या.
म. का. औरंगाबादने बांधलेल्या MCA series च्या साध्या TATA buses पण वणी आणि विदर्भात सर्वत्र होत्या. त्यातला खूपशा बसेस नंतर पुढून दार करून नागपूर शबवा मध्ये सामील होत्या.




औरंगाबाद कार्यशाळेने TATA बसेस बांधणे हे खूप जुने आहे तर.
सध्या तिरूअनंतपुरम — बिलासपूर / इंदौर / गोरखपूर जाणारी गाडी त्याकाळी कोचीन टर्मिनस (CHT) वरून सुटायची. कोचीन ते तिरूअनंतपुरम हा मार्ग मीटर गेज होता की काय ? आता कोचीन टर्मिनस बंद करून गाड्या एर्नाकुलम जंक्शनपर्यंतच आहेत. आता दुपारी १६.४० च्या आसपास नागपूरवरून उत्तरेकडे / पूर्वेकडे जाणार्‍या या गाड्या त्याकाळी अगदी सकाळी जात असाव्यात असे वाटते. चंद्रपूरला पहाटे ३.३० म्हणजे नागपूर सकाळी ६.३० हे नक्की.




Thursday, August 1, 2019

Goodwill theory

Goodwill is a strange crop. If you sow it with an intention of reaping goodwill later, it may not yield anything.
If you forcibly try to gain something out of it, you may earn bad will.
But if it is sown without any intentions and expectations, after some time, you will find it has yielded enormous goodwill.
- Learnt from a school called "Life"