Sunday, July 31, 2022

देवाचिये द्वारी - २२

 


नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ I

लक्षुमी वल्लभ तयांजवळी II


नारायण हरी नारायण हरी I

भक्ति मुक्ति चारी घरी त्याच्या II


हरीविणे जन्म तो नर्कचि पै जाणा I

यमाचा पाहुणा प्राणी होय II


ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड I

गगनाहूनि वाड नाम आहे. II


नामस्मरण हा नित्यनेम करणारे साधक दुर्लभ आहेत. आणि असा नेम  करणाऱ्या साधकांसाठी प्रत्यक्ष लक्ष्मी आणि लक्ष्मीपती जवळ उभे राहून त्यांचे सकल मनोरथ पूर्ण करतात असे आश्वासन आपल्याला देऊन आपण सगळ्या साधकांना नामस्मरणाकडे वळण्याचे आवाहन माऊली आपल्याला करताहेत.  


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध तृतीया, शके १९४४, दिनांक ३१/०७/२०२२)


Saturday, July 30, 2022

देवाचिये द्वारी - २१

 


काळवेळ नाम उच्चारिता नाही I

दोन्ही पक्ष पाही उद्धरती II


रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण I

जडजीवा तारण हरि एक II


हरिनाम सार जिव्हा या नामाची I

उपमा त्या देवाची कोण वानी II


ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ I

पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. II


हरिपाठाच्या चिंतन, मनन आणि नुसत्या पठणानेही केवळ स्वतःचाच उद्धार साधतो असे नव्हे तर आपल्या पूर्वजांचाही वैकुंठमार्ग आपण सोपा करीत असतो अशी ही हरिपाठाची फ़लश्रुती माऊली आपल्याला सांगून साध्या सोप्या नामस्मरणाकडे आपल्याला वळवताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध द्वितीया, शके १९४४, दिनांक ३०/०७/२०२२)


Friday, July 29, 2022

देवाचिये द्वारी - २०

 


नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी I

पापे अनंत कोटी गेली त्यांची II


अनंत जन्माचे तप एक नाम I

सर्व मार्ग सुगम हरिपाठी II


योग यागक्रिया धर्माधर्म माया I

गेले ते विलया हरिपाठी II


ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म I

हरीविण नेम नाही दुजा. II


"अनंत जन्माचे तप एक नाम , सर्व मार्ग सुगम हरिपाठी " इतर अनेक उपायांपेक्षा नामस्मरणासारख्या सोपे सुलभ साधनाचे महत्व माऊली या अभंगातून पुन्हा पटवून सांगत आहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४४ , दिनांक २९/०७/२०२२)


Thursday, July 28, 2022

द्वैत अद्वैताच्या डोहामध्ये सापडली ही नाव...

 "तो आणि मी याच्यात फरक नाही" ही अद्वैतबुध्दी विकसित होण्याआधी "तो" कुणीतरी आहे ही निष्ठा दृढ हवी. मग हळूहळू स्वतःच्या आणि त्याच्या नात्याचा शोध सुरू होतो. साधक निष्ठावान असेल आणि ही चिंतन साधना भरपूर झाली की मग कळतं की "तो आणि मी वेगळा नाहीच. मीच तो, तोच मी."

हा अद्वैतानुभव येण्यासाठी पहिले द्वैतावर दृढ बुध्दि असावी लागते, त्यादृष्टीने मार्गक्रमण करावे लागते.
काहीकाही जीवांना त्यांच्या त्यांच्या पूर्वप्रारब्धानुसार ही अद्वैतबुध्दी लवकर प्राप्त होते. आमच्यासारखे काही त्या अद्वैतप्राप्तीच्या शोधात किती जन्म भटकतील ते सांगता येत नाही.
माझ्या स्वानुभवातून मला पटले, जाणवले ते हे सच्चे विवेचन केलेय. प्रत्येक साधकाने आपापल्या जाणीवेनुसार या पथावर मार्गक्रमण करावे. नागपूरवरून अमरावतीला जाण्यासाठी आपण निघतो तेव्हा आपल्याला थेट अमरावती शहर जरी दिसले नाही तरी यापूर्वी तिथे जाऊन आलेल्या, अनुभवी अधिकार्यांनी "अमरावतीकडे" अशा दिशादर्शनाच्या पाट्या लावून ठेवलेल्या असतात. त्यावर आपण विश्वास ठेऊन मार्गक्रमण केले की अमरावती येणारच. गाडीच्या गतीनुसार वेगवेगळा कालावधी लागणार हे जरी नक्की असलं तरी अंतिमतः गंतव्य गाठले जाणार हे ही तितकेच खरे असते.
शासनाच्या अधिकार्यांवर आपण जेवढा विश्वास ठेवतो, त्याच्या १% विश्वास जरी आपण अध्यात्माचे अधिकारी असलेल्या संतवचनांवर ठेवला तर आपण सगळेच आपापल्या जीवनाच्या मुक्कामाला पोहोचू.
आपण करतो काय ते नागपूरवरून फारफारतर गोंडखैरी, कोंढाळी, कारंजा गाठतो आणि "अमरावती दिसत नाही" असा त्रागा करून वाट चालणे थांबवतो. अशाने कधी पोहोचणार आपण आपल्या मुक्कामाला ?
- रोकडा आत्मानुभव घेणारा सर्वसामान्य साधक, मानवदेहधारी राम प्रकाश किन्हीकर.

देवाचिये द्वारी - १९

 


वेदशास्त्रपुराण श्रुतींचे वचन I

एक नारायण सार जप II


जप तप कर्म हरिवीण धर्म I

वाऊगाची श्रम व्यर्थ जाय II


हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले I

भ्रमर गुंतले सुमनकळिके II


ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र I

यमे काळगोत्र वर्जियेले. II


"जप तप कर्म हरिवीण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय" अध्यात्मात सगळी साधने केलीत आणि जे साध्य त्या हरीलाच विसरलोत तर ते सगळे व्यर्थ असे माऊलींचे प्रतिपादन. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ अमावास्या, दीप अमावास्या, जिवती अमावास्या, शके १९४४ , दिनांक २८/०७/२०२२)


Wednesday, July 27, 2022

देवाचिये द्वारी - १८


हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन I

हरीविण सौजन्य नेणे काही II


या नरा लाधले वैकुंठ जोडले I

सकळ घडले तीर्थाटण II


मनोमार्गे गेला तो तेथे मुकला I

हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य II


ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी I

रामकृष्णी आवडी सर्वकाळी. II


अत्यंत अस्थिर अशा मानवी मनाचे ज्याने ऐकले, जो मनाच्या मागे गेला त्याची फ़रफ़ट अटळ आहे. जो हरिपाठातल्या शाश्वत अशा परमेश्वर स्वरूपाला (आणि पर्यायाने स्वस्वरूपाला) जाणता झाला तो स्थिर होईल आणि त्याचेच आयुष्य़ धन्य होईल याचे प्रतिपादन करणारा हा अभंग. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण चतुर्दशी, शके १९४४ , दिनांक २७/०७/२०२२)


Tuesday, July 26, 2022

देवाचिये द्वारी - १७

 


हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय I

पवित्रची होय देह त्याचा II


तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप I

चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे II


मातृपितृभ्राता सगोत्र अपार I

चतुर्भूज नर होऊनी ठेले II


ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले I

निवृत्तीने माझ्या हाती दिले. II


अशा या साध्या सोप्या हरिपाठाला, त्यात प्रतिपादन केलेल्या (सर्व जीवांमध्ये भेद नाही एव्हढेच काय तर मनुष्य आणि परमेश्वराच्या विभूतीतही भेद नाही हे सांगणाऱ्या) अद्वैत सिद्धांताला जो जीव जाणतो त्यात आणि परमेश्वरात भेद उरत नाही असे प्रतिपादन करणारा हा अभंग.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II




- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण त्रयोदशी, शके १९४४ , दिनांक २६/०७/२०२२)


Monday, July 25, 2022

देवाचिये द्वारी - १६

 


हरीनाम जपे तो नर दुर्लभ I

वाचेसी सुलभ राम कृष्ण II

 

राम कृष्ण नामी उन्मनी साधली I

तयासी लाधली सकळ सिद्धी II

 

सिद्धी धर्म सकळ हरिपाठी आले I

प्रपंची निवाले साधुसंगे II

 

ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा I

तेणे दशदिशा आत्माराम. II

 

 

अध्यात्माच्या अनंत साधनांमध्ये अत्यंत सोपे असे नामस्मरण ज्या साधकाला साधले त्याला सकळ सिद्धी सहज साधता येतात असे नामस्मरणाचे महत्व पटवून सांगणारा माऊलींचा हा अभंग.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण व्दादशी, शके १९४४ , दिनांक २५/०७/२०२२)


Sunday, July 24, 2022

देवाचिये द्वारी - १५


 

एक नाम हरी द्वैतनाम दूरी I

अद्वैतकुसरी विरळा जाणे II

 

समबुद्धी घेता समान श्रीहरी I

शमदमांवेरी हरी झाला II

 

सर्वांघटी राम देहादेही एक I

सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी II

 

ज्ञानदेवा चित्ती परिपाठ नेमा I

मागिलीया जन्मा मुक्त झालो. II

 

"सर्वांघटी राम देहादेही एक" सर्व प्राण्यांमध्ये एकच परमात्मतत्व भरलेले आहे या अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करणारा हा अभंग. नेमाने हा परिपाठ करणा-या भक्ताची गतजन्मातल्या क्रियमाणांमधून मुक्तता करण्याची ग्वाहीच माऊली आपल्याला देत आहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण एकादशी , शके १९४४ , दिनांक २४/०७/२०२२)

Saturday, July 23, 2022

देवाचिये व्दारी - १४

 


नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी I

कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी II

 

रामकृष्ण वाचा अनंत राशी तप I

पापाचे कळप पळती पुढे II

 

हरिहरि हरि मंत्र हा शिवाचा I

म्हणती जे वाचा तया मोक्ष II

 

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम I

पाविजे उत्तम निजस्थान II

 

 

"नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी " असा हा हरिपाठ ज्याच्या नित्य वाचनात आहे त्याला कलीची आणि काळाची बाधा होणार नाही हे माऊलींचे हरिपाठाविषयीचे आपण सर्वांना दिलेले आश्वासन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण दशमी, शके १९४४ , दिनांक २३/०७/२०२२)

Friday, July 22, 2022

देवाचिये व्दारी - १३

 


समाधी हरीची समसुखेवीण I

न साधेल जाण व्दैतबुद्धी II

 

बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे I

एका केशिराजे सकळ सिद्धि II

 

ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी I

जव त्या परमानंदी मन नाही II

 

ज्ञानदेव रम्य रमले समाधान I

हरिचे चिंतन सर्वकाळ II

 

जोपर्यंत अव्दैताच्या परमानंदात मन बुडून जात नाही तोपर्यंत "ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी " हे सगळे उपाय मनुष्याच्या मागे नसत्या उपाधी बनून राहतील हा निखळ स्वच्छ अध्यात्माचा माऊलींचा उपदेश.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण नवमी शके १९४४ , दिनांक २२/०७/२०२२)

Thursday, July 21, 2022

देवाचिये व्दारी - १२

 


तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी I

वायाचि उपाधि करिसी जना II

 

भावबळे आकळे येरवी नाकळे I

करतळी आवळे तैसा हरी II

 

परिचयाचा रवा घेता भूमीवरी I

यत्न परोपरी साधन तैसे II

 

ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण I

दिधले संपूर्ण माझे हाती II

 

 

"भावबळे आकळे येरवी नाकळे " यात परमेश्वराच्या ख-या स्वरूपाला जाणण्यासाठी केवळ भक्ताच्या मनातला खरा भावच उपयुक्त ठरेल असे माऊलींनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण अष्टमी, शके १९४४ , दिनांक २१/०७/२०२२)

Wednesday, July 20, 2022

देवाचिये व्दारी - ११

 


हरि उच्चारणी अनंत पापराशी I

जातील लयासी क्षणमात्रे II

 

तृण अग्निमेळे समरस झाले I

तैसे नामे केले जपता हरि II

 

हरि उच्चारण मंत्र हा अगाध I

पळे भूतबाधा भेणे तेथे II

 

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ I

न करवे अर्थ उपनिषदां II

 

 

नामस्मरणाचे महत्व अधिक अधोरेखित करणारा हा अभंग. गवताला ज्याप्रमाणे अग्नि लागला की गवत जसे पूर्ण जळून जाते तशी भक्तांची अनेक प्रकारची पापे केवळ नामस्मरणाच्या सहवासात आल्यानेच नष्ट होतील हे माऊलींचे प्रतिपादन.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण सप्तमी, शके १९४४ , दिनांक २०/०७/२०२२)

Tuesday, July 19, 2022

देवाचिये व्दारी - १०

 


त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी I

चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ II

 

नामासी विन्मुख तो नर पापिया I

हरीवीण धावया न पावे कोणी II

 

पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक I

नामे तिन्ही लोक उद्धरती II

 

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे I

परंपरा त्यांचे कुळ शुद्ध II

 

 अनेक तीर्थांचे भ्रमण केले पण जर नामात लक्ष नसेल तर ते सगळे व्यर्थ असे माऊली सुचवताहेत. एका नामावाचून कोणीही आपल्याला तारणार नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण षष्ठी, शके १९४४ , दिनांक १९/०७/२०२२)

Monday, July 18, 2022

देवाचिये व्दारी - ९

 


विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान I

रामकृष्णी मन नाही ज्याचे II

 

उपजोनि करंटा नेणे अव्दैतवाटा I

रामकृष्णी पैठा कैसेनि होय II

 

व्दैताची झाडणी गुरूवीण ज्ञान I

त्या कैचे कीर्तन घडेल नामी II

 

ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान I

नामपाठ मौन प्रपंचाचे II

 

या अभंगातही अव्दैत सिद्धांताचेच प्रतिपादन माऊलींनी केलेले आहे. जपजाप्य करताना, नाम घेतानाही त्या आराध्य दैवताचे ध्यान आपल्या मनात नसेल तर तो जपजाप्य व्यर्थ होईल असे माऊली सुचवताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण पंचमी, शके १९४४ , दिनांक १८/०७/२०२२)

Sunday, July 17, 2022

देवाचिये व्दारी - ८

 


संतांचे संगती मनोमार्गगती I

आकळावा श्रीपती येणे पंथे II

 

रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा I

आत्मा जो शिवाचा राम जप II

 

एकतत्व नाम साधती साधन I

व्दैताचे बंधन न बाधिजे II

 

नामामृत गोडी वैष्णवा लागली I

योगियां साधली जीवनकळा II

 

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला I

उद्धवा लाधला कृष्ण दाता II

 

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ I

सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे II

 

 

मनुष्याला संतांचा संग लाभला आणि त्याचे नामावर प्रेम जडले की त्याला व्दैतबुद्धीचे बंधन न बाधता तो परमेश्वरासोबतच्या अव्दैत रूपात आपले जीवन धन्य करून घेतो. फ़क्त कृष्ण सखा उद्धव आणि श्रेष्ठ भागवत प्रल्हाद यांच्यासारखी त्याची दुर्लभ अशा नामस्मरणावर अतूट निष्ठा पाहिजे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण चतुर्थी, शके १९४४ , दिनांक १७/०७/२०२२)

Saturday, July 16, 2022

देवाचिये व्दारी - ७

 


पर्वताप्रमाणे पातक करणे I

वज्रलेप होणे अभक्तांसी II

 

नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त I

हरीसी न भजत दैवहृत II

 

अनंत वाचाळ बरळती बरळ I

त्या कैसेनि गोपाळ पावे हरि II

 

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान I

सर्वाघटी पूर्ण एक नांदे II

 

 

अखंड विविध प्रकारची बडबड करणा-या मनुष्याला तो गोपाळ पावत नाही. ज्या मनुष्याचे दैव हरण झाले आहे त्या मनुष्याला हरीच्या भक्तीची वासना होत नाही आणि हरीची भक्ती ज्याला नाही त्या अभक्ताला विविध पातके सतत बाधत असतात. या अभंगात पुन्हा एकदा भक्त आणि परमेश्वराच्या अव्दैत रूपाचे प्रतिपादन केलेले आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण तृतीया, शके १९४४ , दिनांक १६/०७/२०२२)

Friday, July 15, 2022

देवाचिये व्दारी - ६

 


साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला I

ठायीच मुराला अनुभवे II

 

कापुराची वाती उजळली ज्योती I

ठायीच समाप्ती झाली जैसी II

 

मोक्षरेखे आला भाग्ये विनटला I

साधूंचा अंकिला हरिभक्त II

 

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी I

हरी दिसे जनी आत्मतत्वी II

 

 

एकदा एखाद्या सज्जन सत्पुरूषाच्या संगतीत एखादा मनुष्य आला की कापूर उजळल्यानंतर त्याचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही तसा तो मनुष्य त्या साधूच्या व्यक्तीत्वात मुरून जातो. संत, सज्जन संगतीचे महत्व अधोरेखित करणारा हा अभंग.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण व्दितीया, शके १९४४ , दिनांक १५/०७/२०२२)

Thursday, July 14, 2022

देवाचिये व्दारी - ५

 


योगयागविधी येणे नोहे सिद्धी I

वायाची उपाधि दंभ धर्म II


भावेवीण देव न कळे नि:संदेह I

गुरूवीण अनुभव कैसा कळे II


तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त I

गुजेवीण हित कोण सांगे II


ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात I

साधूंचे संगती तरणोपाय II

 

 

योग याग इत्यादी अनेक कठीण उपायांपेक्षा भावपूर्ण भजनाने परमेश्वर सहज प्रसन्न होतो आणि कठीण तपाचरणाचे फ़ळ मानवाला सहज प्राप्त होते याचे सहज साधे प्रतिपादन.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण प्रतिपदा, शके १९४४ , दिनांक १४/०७/२०२२)