Showing posts with label देवाचिये व्दारी. Show all posts
Showing posts with label देवाचिये व्दारी. Show all posts

Monday, July 25, 2022

देवाचिये द्वारी - १६

 


हरीनाम जपे तो नर दुर्लभ I

वाचेसी सुलभ राम कृष्ण II

 

राम कृष्ण नामी उन्मनी साधली I

तयासी लाधली सकळ सिद्धी II

 

सिद्धी धर्म सकळ हरिपाठी आले I

प्रपंची निवाले साधुसंगे II

 

ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा I

तेणे दशदिशा आत्माराम. II

 

 

अध्यात्माच्या अनंत साधनांमध्ये अत्यंत सोपे असे नामस्मरण ज्या साधकाला साधले त्याला सकळ सिद्धी सहज साधता येतात असे नामस्मरणाचे महत्व पटवून सांगणारा माऊलींचा हा अभंग.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण व्दादशी, शके १९४४ , दिनांक २५/०७/२०२२)


Saturday, July 23, 2022

देवाचिये व्दारी - १४

 


नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी I

कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी II

 

रामकृष्ण वाचा अनंत राशी तप I

पापाचे कळप पळती पुढे II

 

हरिहरि हरि मंत्र हा शिवाचा I

म्हणती जे वाचा तया मोक्ष II

 

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम I

पाविजे उत्तम निजस्थान II

 

 

"नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी " असा हा हरिपाठ ज्याच्या नित्य वाचनात आहे त्याला कलीची आणि काळाची बाधा होणार नाही हे माऊलींचे हरिपाठाविषयीचे आपण सर्वांना दिलेले आश्वासन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण दशमी, शके १९४४ , दिनांक २३/०७/२०२२)

Friday, July 22, 2022

देवाचिये व्दारी - १३

 


समाधी हरीची समसुखेवीण I

न साधेल जाण व्दैतबुद्धी II

 

बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे I

एका केशिराजे सकळ सिद्धि II

 

ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी I

जव त्या परमानंदी मन नाही II

 

ज्ञानदेव रम्य रमले समाधान I

हरिचे चिंतन सर्वकाळ II

 

जोपर्यंत अव्दैताच्या परमानंदात मन बुडून जात नाही तोपर्यंत "ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी " हे सगळे उपाय मनुष्याच्या मागे नसत्या उपाधी बनून राहतील हा निखळ स्वच्छ अध्यात्माचा माऊलींचा उपदेश.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण नवमी शके १९४४ , दिनांक २२/०७/२०२२)

Thursday, July 21, 2022

देवाचिये व्दारी - १२

 


तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी I

वायाचि उपाधि करिसी जना II

 

भावबळे आकळे येरवी नाकळे I

करतळी आवळे तैसा हरी II

 

परिचयाचा रवा घेता भूमीवरी I

यत्न परोपरी साधन तैसे II

 

ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण I

दिधले संपूर्ण माझे हाती II

 

 

"भावबळे आकळे येरवी नाकळे " यात परमेश्वराच्या ख-या स्वरूपाला जाणण्यासाठी केवळ भक्ताच्या मनातला खरा भावच उपयुक्त ठरेल असे माऊलींनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण अष्टमी, शके १९४४ , दिनांक २१/०७/२०२२)

Tuesday, July 19, 2022

देवाचिये व्दारी - १०

 


त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी I

चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ II

 

नामासी विन्मुख तो नर पापिया I

हरीवीण धावया न पावे कोणी II

 

पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक I

नामे तिन्ही लोक उद्धरती II

 

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे I

परंपरा त्यांचे कुळ शुद्ध II

 

 अनेक तीर्थांचे भ्रमण केले पण जर नामात लक्ष नसेल तर ते सगळे व्यर्थ असे माऊली सुचवताहेत. एका नामावाचून कोणीही आपल्याला तारणार नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण षष्ठी, शके १९४४ , दिनांक १९/०७/२०२२)

Sunday, July 17, 2022

देवाचिये व्दारी - ८

 


संतांचे संगती मनोमार्गगती I

आकळावा श्रीपती येणे पंथे II

 

रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा I

आत्मा जो शिवाचा राम जप II

 

एकतत्व नाम साधती साधन I

व्दैताचे बंधन न बाधिजे II

 

नामामृत गोडी वैष्णवा लागली I

योगियां साधली जीवनकळा II

 

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला I

उद्धवा लाधला कृष्ण दाता II

 

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ I

सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे II

 

 

मनुष्याला संतांचा संग लाभला आणि त्याचे नामावर प्रेम जडले की त्याला व्दैतबुद्धीचे बंधन न बाधता तो परमेश्वरासोबतच्या अव्दैत रूपात आपले जीवन धन्य करून घेतो. फ़क्त कृष्ण सखा उद्धव आणि श्रेष्ठ भागवत प्रल्हाद यांच्यासारखी त्याची दुर्लभ अशा नामस्मरणावर अतूट निष्ठा पाहिजे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण चतुर्थी, शके १९४४ , दिनांक १७/०७/२०२२)

Saturday, July 16, 2022

देवाचिये व्दारी - ७

 


पर्वताप्रमाणे पातक करणे I

वज्रलेप होणे अभक्तांसी II

 

नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त I

हरीसी न भजत दैवहृत II

 

अनंत वाचाळ बरळती बरळ I

त्या कैसेनि गोपाळ पावे हरि II

 

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान I

सर्वाघटी पूर्ण एक नांदे II

 

 

अखंड विविध प्रकारची बडबड करणा-या मनुष्याला तो गोपाळ पावत नाही. ज्या मनुष्याचे दैव हरण झाले आहे त्या मनुष्याला हरीच्या भक्तीची वासना होत नाही आणि हरीची भक्ती ज्याला नाही त्या अभक्ताला विविध पातके सतत बाधत असतात. या अभंगात पुन्हा एकदा भक्त आणि परमेश्वराच्या अव्दैत रूपाचे प्रतिपादन केलेले आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण तृतीया, शके १९४४ , दिनांक १६/०७/२०२२)

Friday, July 15, 2022

देवाचिये व्दारी - ६

 


साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला I

ठायीच मुराला अनुभवे II

 

कापुराची वाती उजळली ज्योती I

ठायीच समाप्ती झाली जैसी II

 

मोक्षरेखे आला भाग्ये विनटला I

साधूंचा अंकिला हरिभक्त II

 

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी I

हरी दिसे जनी आत्मतत्वी II

 

 

एकदा एखाद्या सज्जन सत्पुरूषाच्या संगतीत एखादा मनुष्य आला की कापूर उजळल्यानंतर त्याचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही तसा तो मनुष्य त्या साधूच्या व्यक्तीत्वात मुरून जातो. संत, सज्जन संगतीचे महत्व अधोरेखित करणारा हा अभंग.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण व्दितीया, शके १९४४ , दिनांक १५/०७/२०२२)

Thursday, July 14, 2022

देवाचिये व्दारी - ५

 


योगयागविधी येणे नोहे सिद्धी I

वायाची उपाधि दंभ धर्म II


भावेवीण देव न कळे नि:संदेह I

गुरूवीण अनुभव कैसा कळे II


तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त I

गुजेवीण हित कोण सांगे II


ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात I

साधूंचे संगती तरणोपाय II

 

 

योग याग इत्यादी अनेक कठीण उपायांपेक्षा भावपूर्ण भजनाने परमेश्वर सहज प्रसन्न होतो आणि कठीण तपाचरणाचे फ़ळ मानवाला सहज प्राप्त होते याचे सहज साधे प्रतिपादन.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण प्रतिपदा, शके १९४४ , दिनांक १४/०७/२०२२)

Wednesday, July 13, 2022

देवाचिये व्दारी - ४

 

भावेवीण भक्ती भक्तीवीण मुक्ती I

बळेवीण शक्ती बोलू नये II


कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित I

उगा राहे निवांत शिणसी वाया II


सायासे करिसी प्रपंच दिननिशी I

हरिसी न भजसी कोण्या गुणे II


ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे I

तुटले धरणे प्रपंचाचे II

 

 

प्रपंच करण्यासाठी आपण दिवसरात्र भरपूर प्रयत्न करीत असतो. तितकेच लक्ष आपण त्या परमात्म्याकडे लावले आणि त्याला भावपूर्ण पद्धतीने आळविले तर आपला प्रपंचही सुखाचाच होईल.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

  II जयजय रघुवीर समर्थ II

 

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढी पौर्णिमा, व्यासपौर्णिमा, गुरूपौर्णिमा, शके १९४४ , दिनांक १३/०७/२०२२)

Tuesday, July 12, 2022

देवाचिये व्दारी - ३

 


त्रिगुण असार निर्गुण हे सार I

सारासार विचार हरिपाठ II


सगुण निर्गुण गुणांचे अगुण I

हरीविणे मन व्यर्थ जाय II


अव्यक्त निराकार नाही ज्या आकार I

जेथूनि चराचर त्यासी भजे II


ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी I

अनंत जन्मांती पुण्य होय II

"अव्यक्त निराकार नाही ज्या आकार" या ओळींमध्ये त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या निर्गुण निराकार रूपाचे प्रतिपादन केलेले आपल्याला आढळते. या आधीच्या अभंगात आपण परमेश्वराच्या रूपाचे अव्दैत प्रतिपादन केलेले पाहिले या अभंगात निर्गुण रूपाचे गायन माऊलींनी केलेले आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

   II जयजय रघुवीर समर्थ II

 

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढी शुद्ध त्रयोदशी / चतुर्दशी, शके १९४४ , दिनांक १२/०७/२०२२)

Monday, July 11, 2022

देवाचिये व्दारी - २

 


चहु वेद जाण षटशास्त्री कारण I

अठराही पुराणे हरिसी गाती II


मंथुनी नवनीता तैसे घे अनंता I

वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग II


एक हरी आत्मा जीवशिव समा I

वाया तू दुर्गमा न घाली मन II


ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ I

भरला घनदाट हरी दिसे. II

 

 

"एक हरी आत्मा जीवशिव समा" यात प्रत्येक जीवात आणि त्या परमतत्वात काहीच फ़रक नाही याचे प्रतिपादन केलेले आहे. हा दृढ सिद्धांत एकदा मनात ठसला की अध्यात्माच्या अनेक दुर्गम बाबींमध्ये मन घालण्याची त्या व्यक्तीला गरज भासत नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ शुद्ध व्दादशी, शके १९४४ , दिनांक ११/०७/२०२२)

Sunday, July 10, 2022

देवाचिये व्दारी - १

 


देवाचिये व्दारी उभा क्षण भरी I

तेणे मुक्ती चारी साधियेल्या II


हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा I

पुण्याची गणना कोण करी II


असोनि संसारी जिव्हे वेगु करी I

वेदशास्त्र उभारी बाह्या सदा II


ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे I

व्दारिकेचे राणे पांडवाघरी. II


"देवाचिये व्दारी उभा क्षण भरी" यात देवासमोर क्षणभर उभे राहण्यापेक्षा उभा क्षण (उभे आयुष्य याअर्थी उभा क्षण = प्रत्येक क्षण) जो भरतो त्याला चारही मुक्ती (सारूप्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सालोक्य मुक्ती आणि सायुज्य मुक्ती) काय दूर आहेत ? असा अर्थ अभिप्रेत आहे.

 II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

  II जयजय रघुवीर समर्थ II

                                          - प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढी एकादशी, शके १९४४ , दिनांक १०/०७/२०२२)