Saturday, June 28, 2025

पहाटपक्षी बसेस

पुल म्हणतात की रात्रभर झोपून पहाटे उठून अनुभवलेल्या रेडिमेड पहाटेपेक्षा रात्रभर गाण्यांच्या, गप्पांच्या मैफिली जागवून नंतर आलेली पहाट ती जास्त सुंदर असते.


पण आमच्यासारखे "लवकर निजे, लवकर उठे" वर बालपणापासून विश्वास असलेल्या लोकांना रात्री सेकंड शो चे १२ वाजेपर्यंत जागरणच खूप वाटायचे. जागरण करायचे ते फक्त कोजागरीच्या रात्री आणि ते सुध्दा रात्री १२, १२.३० पर्यंतच. नंतर गाढ झोपेत निसूर. त्यामुळे पुलंनी वर्णन केलेली, रात्रभर जागून आलेली पहाट पहाण्याचे भाग्य जवळपास नाहीच.


पण पहाटे उठून जवळपास रोजच पुल म्हणतात तशी "रेडिमेड पहाट" बघण्याचे भाग्य अनंत वेळा मिळालेले आहे.  अगदी तशीच स्थिती महाराष्ट्र एस.टी. च्या बसेसबद्दल बघायला मिळते.


आमचा जन्म आणि बालपण महाराष्ट्रातल्या पूर्व भागातल्या शहरांमध्ये झाले. ही गावे महाराष्ट्राच्या एका टोकाला असल्याने तिथल्या बसस्टॅण्डवर रात्री येणा-या गाड्या रात्री उशीरात उशीरा १२, १२.३० पर्यंत येणार आणि सकाळी निघणा-या गाड्या पहाटे ३ , ३.३० ला सुरू होणार. रात्री ते बसस्टॅण्ड आमच्यासारखेच निवांत झोपी जाणार. भल्या पहाटे चुळबुळत जागे होणार. पहाटे पहिली बस निघत असली तरीही खरी वर्दळ सकाळी ५.३० , ६ वाजताच सुरू होणार. घरात आई, बाबा लवकर उठले तरीही घरातली इतर सगळी चिल्लीपिली सकाळी ६ वाजताच उठून आपापल्या दिवसभराच्या कामांना सुरूवात करणार तसेच हे. नागपूर म्हणा चंद्रपूर म्हणा हे असेच.


हे पहाटे पहाटे आळोखेपिळोखे देत जागे होणारे बसस्टॅण्डस फ़ार विलोभनीय असतात बरं का. आम्हा बसफ़ॅन्ससाठी अशी बसस्थानके म्हणजे नुकतीच सुस्नात होऊन घराबाहेर अंगणात सुरेख रांगोळी काढत असलेली सुवासिनीच. असे विलोभनीय आणि पुण्यदायक दृश्य खूप भाविकांना आवडते तसेच आम्हा बसफ़ॅन्सना असे पहाटे पहाटेचे नुकतेच उठलेले बसस्थानक बघायला आवडते. ब-याच दिवसांनी अशा बसस्थानकाला मी भेट दिली नव्हती म्हणून लॉकडाऊन काळानंतर मी चंद्रपूरच्या बसस्थानकाला मुद्दाम अशी पहाटे भेट देऊन मी त्याचे दर्शन केले होते. लिंक इथे.





मला वाटतं महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या सगळ्याच बसस्थानकांना हे रात्री निवांत झोपी जाऊन पहाट अनुभवायचं सुख मिळत असेल. अगदी मुंबई - ठाण्याला सुद्धा. कराडला, सातारला, छत्रपती संभाजीनगरला, धुळ्याला, नाशिकला, जालना बसस्थानकाला मात्र हे सुख नाही. बिचारे रात्रभर जागे असतात. कराड बसस्थानकावर रात्री उशीरापर्यंत कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून मुंबईला जायला निघणा-या गाड्यांची वर्दळ असते तर पहाटे अगदी लवकर मुंबई - ठाणे - नाशिकवरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लहान लहान गावांपर्यंत जाणा-या गाड्यांची सुरू होते. विश्रांती अशी नाहीच.


सातारा बस स्थानक तर रात्री ९ वाजण्याच्या सुमारासच ख-या अर्थाने जागे होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी कराडवरून पुणे / शिर्डी / नगर/ नाशिक / मुंबईला दरवेळी जाताना आणि येताना सातारा बसस्थानक दिवसाच्या प्रत्येक तासाला आणि रातीच्या बहुतांश तासाला बघितलेले आहे. दिवसा या बसस्थानकावर गाड्यांची गर्दी असते खरी पण रात्री हे बसस्थानक खरे जागृत होते असे म्हणायला हरकत नाही. दिवसा केवळ प्रवाशांची सोय म्हणून जागे असणारे हे बसस्थानक रात्री अक्षरशः जिवंत होते. एकेकाळी सातारा बसस्थानकाचे एस. टी. कॅण्टीन उत्कृष्ट चवीचे जेवण व इतर खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे मुंबई - पुणे - नाशिककडे जाणा-या बहुतांशी बसगाड्या सातारा स्थानकावर जेवणाची वेळ असेल अशा पद्धतीने त्यांचे वेळापत्रक आखायच्यात. सातारा स्थानकावर पोचल्यावर गाडी फ़लाटावर न लावता फ़लाटासमोरच्या अंधारात उभी करून, सगळ्या प्रवाशांना जेवणासाठी उतरवून, गाडी लॉक करून चालक आणि वाहक सातारा बसस्थानकाच्या कॅण्टीनमध्ये जेवण करताहेत हे दृश्य अनेकदा दिसायचे.


छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्राचा मध्यबिंदूच. त्यामुळे इथे रात्रभर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणा-या गाड्यांची वर्दळ अपरिहार्यच. रात्रभर न झोपता हे बसस्थानक पुलंच्या रसिक माणसासारखी पहाट अनुभवत असणार हे नक्की. तसेच आमचे धुळे बसस्थानक, तसेच जालना बसस्थानक. नागपूरवरून पुण्याला एस. टी. बसने जाताना पहिला क्रू (चालक - वाहक) बदलतो तो अकोला स्थानकात आणि दुसरा क्रू बदलतो तो जालना बसस्थानकात. त्या कारणामुळे या दोन्हीही बसस्थानकात ही बस जरा जास्त वेळ थांबा घेते. त्यामुळे या दोन्हीही बसस्थानकात नागपूर - पुणे बस थोडीशी डुलकी घेते आणि लगेच सावध होऊन आपल्या सेवेला लागते असे मला कायम वाटत आलेले आहे.


नागपूरला पहाटे पहाटे निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे पहाटे ३.४५ ला निघणा-या नागपूर टपाल गाडी चंद्रपूर आणि त्याच्याच शेजारच्या फ़लाटावरून निघणारी नागपूर टपाल गाडी उमरखेड. त्याकाळी आजच्यासारखी छपाईच्या तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती. नागपूरात छापली जाणारी तरूण भारत, लोकमत, नागपूर पत्रिका, हितवाद ही दैनिके बाहेरगावच्या टपाल आवृत्त्या रात्री लवकर छापून ते गठ्ठे या बसेसने अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा, यवतमाळ, आर्णी, माहूर, उमरखेड इथे पाठविले जायचे. इथल्या लोकांना नागपूरची दैनिके सकाळी थोडी उशीरा वाचायला मिळायची.


त्यानंतर नागपूर बसस्थानक पुन्हा सामसूम झोपी जायचे. मध्ये एकदा पंढरपूर - नागपूर, बुलढाणा - नागपूर बसेस आल्या की तेव्हढ्यापुरते जागे व्हायचे पण मुख्यतः झोपलेलेच असायचे. नागपूर बसस्थानकाला खरी जाग यायची ती पहाटे ५.३० ला निघण-या नागपूर सुपर अहेरी, नागपूर जलद पुसद, नागपूर जलद इंदूर या गाड्यांच्या वर्दळीमुळे. अहेरी आगाराची बस आदल्या दिवशी रात्रीच येऊन त्या काळच्या फ़लाट १९ समोरच्या जागेत झोपलेली असायची. पहाटे ५ वाजता त्या बसची हालचाल सुरू होऊन ती फ़लाटावर लागत असे. तसेच पुसद डेपोच्या गाडीचे. नागपूर - इंदूर ही गाडी मात्र नागपूर - २ (आताचे गणेशपेठ) आगाराची असे. ती छान धुवून पुसून नागपूर - २ आगारातून बाहेर यायची आणि फ़लाट १ वर उभी असायची. सुंदर तयार झालेली ती बस पाहून खूप छान वाटायचे.



त्याकाळी चंद्रपूरवरून निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे सकाळी  ५.३० ला निघणारी चंद्रपूर जलद नागपूर, सकाळी ६.०० ला निघणा-या चंद्रपूर सुपर नागपूर आणि चंद्रपूर जलद शेगाव तर त्यापाठोपाठ सकाळी ६.३० ला निघणारी चंद्रपूर जलद आर्वी. यातली आर्वी बस फ़क्त बाहेरच्या आगाराची (अर्थात आर्वी) असायची. इतर बसेस चंद्रपूर आगाराच्याच असायच्यात.  


चंद्रपूर बसस्थानकावरून पहाटे साडेपाचची बस गाठायची म्हणजे पहाटे चारला उठून सगळी आन्हिके उरकावी लागायचीत. अगदी अंघोळ वगैरे सुद्धा. कारण नागपूरला सकाळी ९.०० ला पोहोचल्यानंतर वाड्यात नळ गेलेला असायचा. मग कसली अंघोळ आणि कसली आन्हिके ? स्वयंपाकापुरते आणि दिवसभर पिण्यापुरते घडाभर पाणीसुद्धा शेजारून मागून आणावे लागायचे. 


पहाटे साधारण सव्वापाचच्या सुमारास चंद्रपूरला स्टॅण्डवर पोहोचलो की साडेपाचची नागपूर, सहाची नागपूर आणि सहाची चंद्रपूर - शेगाव या तिन्ही गाड्या चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वाराशी थांबलेल्या असायच्यात. त्यात "नेमकी नवी गाडी आज साडेपाचची देऊ देत" म्हणून आम्ही प्रार्थना करायचो पण ९९.९९ % वेळा ही प्रार्थना फ़लद्रूप व्हायची नाही. बाहेर अजूनही अंधार असल्याने आत सगळे दिवे लावलेली साडेपाचची जलद डेपोबाहेर यायची आणि फ़लाटावर लागायची.


ही साडेपाचची बस जरा लेकुरवाळ्या स्वभावाची असे. ही बस चंद्रपूरवरून निघाली की भद्रावती गावाआधी असलेल्या भद्रावतीच्या आयुध निर्माण वसाहतीत जायची. ही एकमेव बस या मार्गे जायची. मग तिथले प्रवासी घेऊन, भद्रावती शहरात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा महामार्गावर परतणे, वरो-याला रेल्वे फ़ाटक ओलांडून गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा फ़ाटक ओलांडून महामार्गावर येणे, या गदारोळात एकदा किंवा दोन्हीवेळा रेल्वेचे फ़ाटक बंद असले की खोळंबा सहन करणे या सगळ्या निवांतपणात सहाची सुपर भद्रावती आणि वरोरा थांबे न घेता पुढे निघून गेलेली असायची. जांब बसस्थानकात साडेपाचची बस शिरताना, सहाची बस वाकुल्या दाखवत निघायच्या तयारीत असायची. त्यामुळे आपण साडेपाचच्या बसमध्ये असलो की सहाच्या बसचा राग यायचा आणि सहाच्या बसमध्ये असलो की साडेपाचच्या बसची कीव यायची. 


मुंबईला नोकरी करीत असताना आम्ही नागपूर ते मुंबई हा प्रवास बहुतांशी वेळा विदर्भ एक्सप्रेसने करायचोत. तेव्हा विदर्भ ठाण्याला थांबायची नाही. आम्हाला एक तर कल्याणला किंवा दादरला उतरावे लागे. पहाटे पहाटेचीच वेळ असायची. त्या स्थानकांमध्ये अगदी सकाळी सकाळी छान तयार होऊन आपापल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी लोकल गाडीने ऑफ़िसला / कामधंद्याला निघालेले चाकरमानी दिसायचे. सकाळी कामावर निघालेली माणसे कशीही असोत ती मला कायम प्रसन्न वाटत आलेली आहेत. ही मुंबई मला फ़ार आवडायची. सगळ्यांना काही ना काही काम देणारी आणि दिलेल्या कामावर निष्ठा ठेवणारी.


आजही मी सकाळी माझ्या महाविद्यालयात जायला निघालो की मला आपापल्या ठिकाणांवरून नागपूरला येणा-या अशा पहाटपक्षी बसेस भेटतात. यवतमाळ - नागपूर, चंद्रपूर - नागपूर, वणी - नागपूर, पांढरकवडा - नागपूर, चंद्रपूर - तिरोडा. सगळ्या. पहाटे पहाटे आपापल्या गावांवरून निघून ऑफ़िसच्या, इतर घाईच्या कामांसाठी प्रवाशांची सेवा करीत धावत असलेल्या या पहाटपक्षी बसेस पाहिल्यात की घरी लवकर उठून, आवरून घेऊन, सुस्नात होऊन आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी घराबाहेर पडून मेहेनत करणा-या मुंबईच्या चाकरमान्यांची, घरधन्याची आणि घरधनीणीची आठवण येते. त्यांच्याविषयी उगाच ममत्व दाटून येतं. माणसांच्या जिद्दीला, आकांक्षांना पहाटे उठून आपल्या अगदी वेळेवर धावण्याने बळ पुरविणा-या या पहाटपक्षी बसेस. यांच्याविषयी आदर, ममता दाटून येते. या कितीही जुन्या असल्यात तरी यांच्या  कर्तव्यपालनाने या नवीनच वाटतात. (हल्ली अगदी नवीन को-या बसेस या सगळ्या मार्गांवर यायला लागल्या आहेत म्हणा. आजकाल सगळ्या बसेस MH - 14 / MH XXXX या नव्या सिरीजच्या दिसताहेत.) 



तसेही मेंदी लावलेले हात कितीही सुंदर दिसलेत, त्यावर आपले प्रियजन कितीही फ़िदा असलेत; तरी आपल्या कुटुंबासाठी पहाटे उठून जात्यावर धान्य दळून हाताला घट्टे पडलेला हात हा खुद्द त्या विधात्यालाच जास्त विलोभनीय वाटत असतो, नाही का ?



- बसेसना मानवी रूपात अनुभवणारा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शनिवार, २८ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


2 comments:

  1. तुमचे लाल परी आणि आगगाडी यांचे लेख वाचून विदर्भ आणि इतर भागातील जीवनाची दृश्य डोळ्ासमोर येतात ( या भागात कधी गेलो नाही हे लक्षात घ्या😀)
    एस टी पूर्वी सर्व महाराष्ट्राचे आणि आता ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग राहिला आहे.
    रामभाऊ आता जमले तर कोकण भागात प्रवास करून तेथील खासियत सादर करा🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Yes. I travelled a lot in Konkan. I will definitely write my experiences over there.

      Delete