Friday, September 30, 2022

म्हैसूर शहर बस सेवेची व्हाॅल्वोः एक मस्त अनुभव

 

म्हैसूर शहरात पहिल्यांदा २००९ मध्ये जाणे झाले. Indo - US Collaboration for Engineering Education व Infosys च्या संयुक्त पुढाकाराने Effective Engineering Teaching या विषयावर भारतभरच्या अभियांत्रिकी शिक्षकांची कार्यशाळा Infosys campus, Mysore येथे आयोजित करण्यात आलेली होती.


तशी सर्व सहभागी शिक्षकांची रहाण्याजेवणाची आलीशान व्यवस्था Infosys च्या म्हैसूर कॅम्पसमध्येच करण्यात आलेली होती पण मी माझा कुटुंबकबिला सोबत नेलेला असल्याने मी म्हैसूर शहरात मुक्काम केलेला होता.


रोज सकाळी रहाण्याच्या ठिकाणाहून इन्फोसिस कॅम्पसपर्यंत आणि संध्याकाळी कार्यशाळा आटोपली की परत असा प्रवास व्हायचा. म्हैसूर शहरातल्या अत्यंत कार्यक्षम अशा शहर बस सेवेचा या दरम्यान चांगला परिचय झाला.

शहरापासून २० - २५ किमी अंतरावर सगळ्याच आय टी कंपन्यांचे एकापेक्षा एक सुंदर कॅम्पस, तिथे रोज जाणारी आय टी क्षेत्रातली मंडळी, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन अत्यंत सोयीच्या वेळांवर धावणार्‍या या Volvo शहर बसेस. तिकीटदरसुध्दा अत्यंत माफक (१५ रूपये) होता. 


आय टी तल्या मुलांची, कर्मचार्‍यांची गरज लक्षात घेऊन कमीत कमी थांबे घेत जाणार्‍या या वातानुकूल व्हाॅल्वो बसेसमध्ये सगळे चार्जिंग पाॅइंटस सुरू अवस्थेत असायचेत. आय टी तली मंडळी प्रवासाचा अर्धा तास आपापले लॅपटाॅप्स उघडून आपापल्या कामात मग्न व्हायचीत. माझ्यासारखे प्रवासी पक्षी मात्र बसच्या मोठ्या खिडक्यांमधून शहर दर्शनात आणि इतर बसेस बघण्यामध्ये दंग व्हायचे.


त्यामानाने आपल्या महाराष्ट्रात बेस्ट, पीएमटी, नागपूर शहर बस, टीएमटी, एनएमएमटी यांचे कल्पनाशून्य नियोजन आणि शहर बस सेवेला "चराऊ कुरण" समजून जाणूनबुजून शहर बस सेवेचा उडवलेला बोर्‍या हा मनावर आघात करून गेला. कोल्हापूर मनपा बस सेवा आणि सोलापूर मनपा बस सेवा यांचा अनुभव त्यातल्या त्यात चांगला आहे पण मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई इथल्या बससेवांच्या गलथान कारभाराबाबत प्रत्येकी एक लेख पुरणार नाही इतकी वाईट परिस्थिती आहे.


आज इन्स्टाग्रामसाठी शोधताना हा फोटो सापडला आणि नव्या विचारांना, नव्या लेखांना चालना मिळाली.


- बुध्दिमान नियोजन असलेली सक्षम शहर बस सेवा शहरीकरणाच्या बर्‍याच काही दुष्परिणामांवर तोडगा ठरू शकेल असे मनापासून मानणारा सामान्य नागरिक, राम प्रकाश किन्हीकर. 




देवाचिये द्वारी - ८३

 



प्राणी संकल्पे बांधला I जीवपणे बद्ध झाला I

तो विवेके मुक्त केला I साधुजनी II

 

पापपुण्य समता घडे I तरीच नरदेह जोडे I

येरवी हा जन्म न घडे I हे व्यासवचन भागवती II

 

बहुत जन्मांचे अंती I होय नरदेहाची प्राप्ती I

येथे न होता ज्ञाने सदगती I गर्भवास चुकेना II

 

अनेक जन्म आणि आणि अनेक मरण सोसल्यानंतर जेव्हा पाप आणि पुण्याचा हिशेब समसमान होतो तेव्हा हा दुर्लभ असा मनुष्यदेह मिळतो. या जन्मात आपल्याला लाभलेल्या विचार, विवेक या विशेषाधिकाराचा वापर करून जर आपण सदगती प्राप्त करून घेतली नाही, जन्ममरणाचा फ़ेरा चुकविणारे कर्म केले नाही तर आपण पुन्हा या फ़े-यात वारंवार अडकत राहू अशी आपण सर्व साधकांविषयीची काळजी श्रीसमर्थांना येथे वाटते आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी शके १९४४ , दिनांक ३०/०९/२०२२)


Thursday, September 29, 2022

देवाचिये द्वारी - ८२

 


जेणे केले चराचर I केले सृष्ट्यादि व्यापार I

सर्वकर्ता निरंतर I नाम ज्याचे II

 

तेणे केल्या मेघमाळा I चंद्रबिंबी अमृतकळा I

तेज दिधले रविमंडळा I जया देवे II

 

सर्वकर्ता तोचि देव I पाहो जाता निरावेव I

ज्याची कळा लीळा लाघव I नेणती ब्रम्हादिक II

 

ऐसे जग निर्मिले जेणे I तो वेगळा पूर्णपणे I

येक म्हणती मूर्खपणे I जग तोचि जगदीश II

 

एवं जगदीश तो वेगळा I जग निर्माण त्याची कळा I

तो सर्वांमध्ये परी निराळा I असोन सर्वी II

 

म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा I सर्वापर जो परमात्मा I

अंतर्बाह्य अंतरात्मा I व्यापूनि असे II

 

हे जग ज्याने निर्माण केले तो परमात्मा आणि त्याची निर्मिती असलेले हे जग ह्या दोन्हीही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत. परमात्मा अविनाशी आणि स्थिर आहे. जग निर्मितीच्या पूर्वी तो होताच, या जगातल्या सर्व चर आणि अचर गोष्टींमध्ये तो आहेच आणि जगाच्या विनाशानंतर तो एकटाच शिल्लक असणार आहे. म्हणून आपल्या दृष्टीला दिसणारे हे जग तात्पुरते आणि खोटे आहे तर परमात्मा हा कायम आणि एकमेव खरी वस्तू आहे असे प्रतिपादन श्रीसमर्थ करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध चतुर्थी शके १९४४ , दिनांक २९/०९/२०२२)


Wednesday, September 28, 2022

देवाचिये द्वारी - ८१

 


म्हणौनि हे दृश्यजात I आवघेचि आहे अशाश्वत I

परमात्मा अच्युत अनंत I तो या दृश्यावेगळा II

 

दृश्यावेगळा दृश्याअंतरी I सर्वात्मा तो सचराचरी I

विचार पाहता अंतरी I निश्चये बाणे II

 

संसारत्याग न करिता I प्रपंच उपाधी न सांडता I

जनामध्ये सार्थकता I विचारेचि होये II

 

हे प्रचितीचे बोलणे I विवेके प्रचित पाहणे I

प्रचित पाहे ते शाहाणे I अन्यथा नव्हे II

 

 

या जगात दृश्य असलेल्या गोष्टींपासून वेगळा असलेला तरीही सगळ्या जगात व्यापून असलेला परमात्मा जाणून घ्यायला मनुष्यमात्राला विचारांचा्च आधार घ्यावा लागेल असे श्रीसमर्थ सांगताहेत. सर्वसामान्य मनुष्याने आपली विहित कामे न सोडता विचाराने विवेकाने वागून या जगात आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे श्रीसमर्थांना वाटत आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध तृतीया शके १९४४ , दिनांक २८/०९/२०२२)


Tuesday, September 27, 2022

देवाचिये द्वारी - ८०

 


सृष्टी बहुरंगी असत्य I बहुरूपाचे हे कृत्य I

तुज वाटे दृश्य सत्य I परी हे जाण अविद्या II

 

अस्तिचा देही मांषाचा डोळा Iपाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा I

तो ज्ञाता नव्हे आंधळा I केवळ मूर्ख  II

 

दृष्टीसी दिसे मनासि भासे I तितुके काळांतरी नासे I

म्हणोनि दृश्यातीत असे I परब्रह्म ते II

 

या सृष्टीत जे जे दिसते, मनाला भासते ते सगळे नाशिवंत आहे म्हणून ते सगळे परब्रह्म नाही. या सृष्टीतले एकमेव अविनाशी तत्व, परब्रह्म हे जाणून घ्यायला देहाचा आणि देहातल्या पंचज्ञानेंद्रियांचा आधार अपुरा पडेल.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध द्वितीया शके १९४४ , दिनांक २७/०९/२०२२)


Monday, September 26, 2022

देवाचिये द्वारी - ७९

 


रघुनाथभजने ज्ञान जाले I रघुनाथभजने महत्व वाढले I

म्हणौनिंया तुवा केले I पाहिजे आधीं II


रघुनाथ स्मरोनि कार्य करावे I ते तत्काळचि सिद्धी पावे I

कर्ता राम हे असावे I अभ्यांतरी II


मनी धरावे ते होते I विघ्न अवघेचि नासोन जाते I

कृपा केलिया रघुनाथे I प्रचित येते II


मी कर्ता ऐसे म्हणसी I तेणे तू कष्टी होसी I

राम कर्ता म्हणता पावसी I येश कीर्ती प्रताप II


निर्गुण साधना जरी अंतिम साध्य असले तरी ते साध्य करायला सगुण साकार रूपाचेच आराधन करावे लागेल याबाबत श्रीसमर्थांची धारणा अगदी पक्की आहे. श्रीसमर्थांचे दैवत श्रीराम म्हणून ते श्रीरामांच्या सगुण रूपाचीच आराधना आपल्याला करायला सांगताहेत. पण ही सगुण उपासना करताना अंतिमतः स्वतःच्या कर्तेपणाच्या भावनेचा नाश होऊन परमेश्वराच्या कर्तेपणाचे गुणगान व्हावे यावर श्रीसमर्थांचा विशेष भर आहे. 

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४४ , दिनांक २६/०९/२०२२)

Sunday, September 25, 2022

देवाचिये द्वारी - ७८

 


सृष्टीपूर्वी ब्रह्म असे I तेथे सृष्टी मुळीच नसे I

आता सृष्टी दिसत असे I ते सत्य किं मिथ्या II

 

म्हणोनि सृष्टी नासिवंत I जाणती संत महंत I

सगुणी भजावे निश्चित I निश्चयालागी II

 

सगुणाचेनि आधारे I निर्गुण पाविजे निर्धारे I

सारासारविचारे I संतसंगे II

 

सृष्टीपूर्वी सृष्टी चालता I सृष्टी अवघी संव्हारता I

शाश्वत देव तत्वता I आदिअंती II

 

ही दृश्य सृष्टी ही त्या अदृश्य, अव्यक्त ब्रह्मस्वरूपाचेच एक रूप आहे. सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वीही ब्रह्म होते आणि खूप कालावधीनंतर या सृष्टीच्या नाशानंतरही ब्रह्म तसेच असणार आहे. निर्गुण, निराकार ब्रह्मस्वरूपाच्या भक्तीसाठी या सगुण साकार सृष्टीमधल्याच गोष्टींचा आधार घ्यावा लागेल असे श्रीसमर्थ आपल्याला सांगताहेत. सगुण हे साधन पण निर्गुण निराकार ब्रह्म हे साध्य हे साधकांनी विसरून चालणार नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद अमावास्या, सर्वपित्री अमावास्या शके १९४४ , दिनांक २५/०९/२०२२)


Saturday, September 24, 2022

देवाचिये द्वारी - ७७

 


ब्रम्ह निर्गुण निराकार I माया सगुण साकार I

ब्रम्हासी नाही पारावार I मायेसि आहे II


ब्रह्म निर्मळ निश्चळ I माया चंचळ चपळ I

ब्रह्म निरोपाधी केवळ I माया उपाधिरूपी II


सकळ माया विस्तारली I ब्रम्हस्थिती अच्छयादली I

परी ते निवडूनि घेतली I साधुजनी II


सकळ उपाधीवेगळा I तो परमात्मा निराळा I

जळी असोनि नातळे जळा I आकाश जैसे II


या सकळ विश्वात परमेश्वराचे ब्रम्हरूप जितके व्यापून राहिलेले आहे तितकीच परमेश्वराची मायारूपेही व्यापून आहेत हे श्रीसमर्थ जाणून आहेत. म्हणून त्या दोन रूपांमध्ये भेद कसा करावा आणि मायेला टाळून ब्रम्हरूपालाच कसे ओळखावे हे आपल्याला कळकळीने उपदेश करून सांगताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शके १९४४ , दिनांक २४/०९/२०२२)

Friday, September 23, 2022

आणि आमचा पंगा झाला - ३

 यापूर्वीचे पंगे इथे आणि इथे वाचा.


रविवार सकाळ. सकाळची आन्हिके, पूजा अर्चा वगैरे आटोपून आपण प्रसन्न चित्ताने फ़ेसबुक वगैरे बघत बसलेले असतो. एव्हढ्यात फ़ेसबुक मेसेंजर वाजते. एरव्ही फ़ेसबुक मेसेंजरकडे दिवसेंदिवस ढुंकूनही न बघणारे आपण आता हातातच मोबाईल असल्याने पटकन मेसेंजर उघडतो आणि मेसेज वाचतो. (बाकी मला माझ्याच मेसेंजरमध्ये जायला वेळ नाही. इथल्या काहीकाही बावाजींना बायकांच्या मेसेंजरमध्ये शिरून "जे१ झाले का ?" वगैरे आंबटशौक कसे जमतात ? हे मला कळत नाही.)


"सर, जालन्यावरून मुंबईला जायचे होते. सगळ्या गाड्या फ़ुल्ल आहेत. अगदी नंदीग्राम, तपोवन सुद्धा. एखादी एसी बस वगैरे आहे का ? सिनीयर सिटीझन आहेत हो सोबत." - काही वर्षांपूर्वी जुजबी ओळख झालेला एक बस कम रेल्वेफ़ॅन मित्र.


"जालना ते मुंबई थेट बसेस तर मला माहिती नाहीत पण औरंगाबादवरून मुंबईपर्यंत चिकार बसेस आहेत. खूप सा-या एसी बसेस आहेत." - १९८९ पासूनचा आपला अनुभव आपण टाईप करतो.


"सर, पण जालना ते औरंगाबाद कसे जायचे ?" बसेसची फ़्रिक्वेन्सी कशी आहे ?" -  मुंबई - पुणे - नाशिक या त्रिकोणापुढे कधीही प्रवास न केलेले हे बसफ़ॅन कोकरू.


"जालना ते औरंगाबाद दर पंधरा मिनीटांना एखादी बस मिळेल. ५० - ५५ किमी तर अंतर आहे. पण मला सांगा तुम्ही नंदीग्राम , तपोवन एक्सप्रेससाठी end to end quota ट्राय केलाय का ? " - सिनीयर सिटीझन्सच्या बसप्रवासातल्या कष्टांची काळजी असलेला आणि इतर कुणाची आई ती आपली आईच असे सहानुभूतीने मानणारा मी.


"म्हणजे काय करू सर ?" - तोच बस कम रेल्वेफ़ॅन मित्र


"म्हणजे नंदीग्राम एक्सप्रेससाठी जालना ते मुंबई असे तिकीट बघण्यापेक्षा आदिलाबाद ते मुंबई असे तिकीट try करून बघा. कदाचित २०० - ३०० रूपये तिकीट जास्त बसेल पण बसप्रवासापेक्षा, एजंट गाठा त्याच्याकडून तिकीट येईपर्यंतच्या अनिश्चिततेत हिंदकळत रहाण्यापेक्षा ते बरे पडेल." - जगमित्र असलेला फ़ुकट सल्लागार मी.


"सर, खरंच की ! नंदीग्रामला आदिलाबाद ते मुंबई RAC 5 आहे." - तोच बस कम रेल्वेफ़ॅन मित्र


"मग ताबडतोब घ्या. १०० % कन्फ़र्म होणार. बोर्डिंग पॉईंट मात्र जालना टाका." - एका गाडीला कुठल्या प्रकारचे किती कोचेस लागतात ? कुठल्या प्रकारचा किती कोटा आहे ? याचा पक्का अभ्यास असलेला रेल्वेफ़ॅन, मी.


ह्यानंतर भयाण शांतता. साधं "धन्यवाद" पण आपल्या नशीबी नसते. आत्मीयतेने एखाद्याला केलेली अशी मदत इतक्या कृतघ्नपणे संपते. मला ही फ़ेसबुक मेसेंजरवर फ़ारसे रमायला आवडत नाहीच म्हणून मी ही तिथे फ़ारसा थांबत नाही.


काही काळांनंतर त्या मित्राच्या जालना - मुंबई ट्रीपबद्दल आपण फ़ेसबुकवर वाचतो. एक लाईक करून आपण पुढे जातो.


पुन्हा काही दिवसांनी पुन्हा तोच कृतघ्न माणूस मेसेंजरवर येतो. 


"सर, मला साधारण डिसेंबरमधे नागपूर - भंडारा - चंद्रपूर - गडचिरोली असा दौरा करायचाय. मला थोड मार्गदर्शन, तिकीटे बुकिंग वगैरे करायला मदत कराल ?" - तोच कृतघ्न माणूस मेसेंजरवर.


"या सगळ्या कन्सलटन्सीचे पैसे लागतील." - मागच्या कृतघ्न अनुभवावरून शहाणा झालेला अतिव्यापारी दृष्टीकोनातला मी.


यानंतर मी सरळ ब्लॉक होतो आणि असल्या कृतघ्नांच्या तावडीतून सुटलेला मी त्या "पाताळविजयम" नावाच्या मद्रासी सिनेमातल्या राक्षसासारखा हॉ..हॉ..हॉ.. असे विकट हसत सुटतो.


- प्रभू रामचंद्रांचा "धर्मज्ञ आणि कृतज्ञ" असण्याचा गुण कायम अंगी बाळगणारा पण कृतघ्नांशी पंगे घ्यायला कधीही न घाबरणारा, राम प्रकाश किन्हीकर.  



देवाचिये द्वारी - ७६

 


परब्रह्मासी कैची स्थिती I परी हे बोलावयाची रीती I

वेदश्रुती नेति नेति I परब्रह्मी II


ब्रह्म प्रळयावेगळे I ब्रह्म नावरूपानिराळे I

ब्रह्म कोणी येका काळे I जैसे तैसे II


करिती ब्रह्मनिरूपण I जाणती ब्रह्म संपूर्ण I

तेचि जाणावे ब्राह्मण I ब्रह्मविद II


सगळ्या वेदांनाही आणि अनेक शास्त्रांनाही "न इति" (हे नाही) असे वाटून ज्याच्या आकाराविषयीचा, रूपाविषयीचा निर्णय कधीही करता आलेला नाही असे सगळ्यांपासून वेगळे, अलिप्त, निराकार तरीही सर्वव्यावक असलेले ब्रह्म जो जाणतो तोच ब्राह्मण समजावा असे श्री समर्थ प्रतिपादन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण त्रयोदशी शके १९४४ , दिनांक २३/०९/२०२२)

Thursday, September 22, 2022

आणि आमचा पंगा झाला - २

 यापूर्वीचा पंगा इथे वाचा.


काय होतं की दोन वर्षांपूर्वी कन्यारत्नाच्या इंजिनीअरींग ऍडमिशनच्या वेळेला आपण त्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास वगैरे केलेला असतो. तंत्रशिक्षण संचलनालयाच्या सूचना वाचून त्यांच्या ऍड्मिशन प्रक्रियेचा, विशिष्ट महाविद्यालयात जागा वाटपाचा नक्की अल्गोरिदम काय असेल याचा आपणाला एक अंदाज आलेला असतो. कॉलेजेसचे चॉइसेस भरण्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यासाठी गेल्या दोन तीन वर्षांचे, आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजेसचे, हव्या असलेल्या ब्रॅंचेसमधले प्रत्येक राऊंडचे कट ऑफ़ बघून, आणि जागा वाटपाचे अल्गोरिदम लक्षात आणून आपण अगदी परफ़ेक्ट चॉइसेस दिलेले असतात. आपल्या मुलीसोबत तिच्या दोन तीन मैत्रिणींनाही त्या अचूक विश्लेषणाचा फ़ायदा झालेला असतो. फ़ारसा मनस्ताप न होता सगळ्यांच्या ऍडमिशन्स (त्यांच्या त्यांच्या मार्कांनुसार) सर्वोत्तम ठिकाणी पार पडलेल्या असतात. 


मग पुढल्या वर्षी एक कॉलेजमधला मित्र त्याच्या मुलीच्या ऍडमिशनबाबत आपला सल्ला घ्यायला येतो. त्याच्या मुलीला साधारण बरे मार्कस असतात. गेल्यावर्षी आपल्या मुलीला होते त्याच्या जवळपासच. आपला गेल्यावर्षीचा अनुभव ताजा असल्याने आपण त्याला नेमस्तपणे सहज मिळू शकणारी कॉलेजेस चॉइसेस म्हणून टाक हे सुचवतो. पहिल्या फ़ेरीत आपल्या मार्कांनुसार किंवा अपेक्षेपेक्षा थोडे वरचे महाविद्यालय / त्या महाविद्यालयातली ब्रॅंच मिळून गेली की डोके किती शांत होते हा माझा अनुभव. आणि तोच अनुभव, तोच आनंद सगळ्यांना मिळावा ही प्रामाणिक नेमस्त इच्छा. 


पण त्या मुलीच्या मनात काहीतरी मोठी स्वप्ने असतात. तिला पुण्याची अगदी टॉप कॉलेजेस खुणावत असतात. पुण्याची टॉप कॉलेजेस खरोखरच टॉपच आहेत, अतिशय दर्जेदार आहेत, जागतिक दर्जाप्राप्त आहेत. पण तिथे जायला लागणारे मार्कांचे पाठबळ नको का ? तिथे ऍडमिशनला लागणारे मार्कस आणि आपल्याला मिळालेले मार्कस यात एक दोन टक्क्याचा फ़रक असला तर ही महत्वाकांक्षा नैसर्गिक आहे हे मी समजू शकतो पण तिथे लागणारे मार्कस आणि आपल्याला मिळालेले मार्कस यात १० - १२ टक्के फ़रक असताना ही महत्वाकांक्षा ठरत नाही, हे दिवास्वप्न ठरते हे मी ओळखून होतो. तसे त्या मित्राला मी नेमस्त भाषेत सांगण्याचा प्रयत्नही केला.


पण काय मुलांच्या जिद्दीपुढे ब-याच आईबापांचेही काही चालत नसते. माझे ऍनालिसीसचे एक दोन तास, फ़ोनवर चॉइसेस कुठले भरावे याबद्दल जवळपास अर्धा तास दिलेला सल्ला आणि मला वेळी, अवेळी फ़ोन आल्यानंतर सुद्धा (एखादेवेळी लेक्चरमध्ये असताना कॉल घेऊ शकलो नाही तर नंतर रिटर्न केलेला कॉल, व्हॉटसऍपवर सविस्तर सांगितलेले चॉइसेस) न वैतागता दिलेले सल्ले यांचा काहीही फ़ायदा झालेला नसतो. कारण आपल्या ऍनालिसिस पेक्षा पुत्रीप्रेम वरचढ ठरते. पहिल्या राऊंडला पुण्यातल्या जागतिक दर्जाच्या इंजिनीअरींग कॉलेजेसचा चॉइस त्या मित्राने टाकून दिलेला असतो. 


पहिल्या राऊंडचे जागावाटप जाहीर होते. अपेक्षेप्रमाणे कुठल्याच कॉलेजमध्ये तिची ऍडमिशन होऊ शकलेली नसते. मग तो चिंताक्रांत मित्र पुन्हा आपल्या खनपटीला बसतो. "चॉइस भरताना तू अभ्यासपूर्ण सांगितलेले चॉइसेस न भरता मी माझ्या मुलीच्या अपेक्षेचेच चॉइसेस भरलेले आहेत" हे त्याने त्यावेळी आपल्याला घाबरून सांगितलेले नसते. आता आपल्याला सांगण्यावाचून त्याला पर्यायच नसतो. त्याच्या मुलीपेक्षा कमी मार्कस असणा-या तिच्या मैत्रिणींना आपण सांगितलेल्या नागपुरातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला असतो. ती मात्र आता दुस-या राऊंडची वाट बघत असते. पहिल्या राऊंडपेक्षा दुस-या राऊंडमध्ये जागा खूपच कमी उपलब्ध असतात हे आत्तापर्यंत तिला आणि माझ्या मित्राला कळले असते. तरीही आपण त्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी पुन्हा ऍनालिसिस करतो, सल्ले देतो.


मग आता तिसरे वर्ष येते. पुन्हा काही मित्र आणि त्यांचे सुपुत्र, सुकन्या परिक्षेला बसलेले असतात. आपण आजवर फ़ुकट केलेली मेहेनत, कळकळीने दिलेले सल्ले यांचे काहीच मोल नसल्याचे आपल्या लक्षात आलेले असते. मित्रांचे, एरव्ही लांबचे असलेल्या पण आता निकालानंतर अचानक मी जवळचा वाटू लागलेल्या काही नातेवाईकांचे (व-हाडी भाषेत अशांना "विटेस गोटे मावसभाऊ" असे संज्ञान आहे.) फ़ोन्स येऊ लागतात. गत काही अनुभवांवरून शहाणे झालेले आपण अशा प्रकारच्या सल्ल्यांची व्यावसायिक किंमत त्यांना कळवतो. नाही म्हटले तरी अशा प्रकारच्या कन्सल्टन्सीमध्ये आपली बुद्धीमत्ता, वेळ आणि काही पैसा (जिओ काय घरी फ़ुकट इंटरनेट देत नाही.) आपण खर्ची घातलेला असतो आणि फ़ुकट सल्ल्याची काहीच पत्रास लोक ठेवत नाहीत याचा अनुभव आपल्याला आलेला असतो.


दोनच दिवसांनी एखाद्या नातेवाईकाकडून "अरे, तो अमकाढमका (तोच तो, विटेस गोटा मावसभाऊ) आजकाल तू फ़ारच पैशाच्या मागे लागला आहेस असे सांगत होता" असे वर्तमान आपल्याला कळते. पीडा सुटल्याच्या आनंदातून आपण पुन्हा एकदा त्या "पाताळविजयम" नावाच्या मद्रासी सिनेमाच्या राक्षसासारखे "हॉ..हॉ..हॉ.." करत विकत हसत सुटतो. 


- "भले तरी देऊ..." या श्रीतुकोबांच्या उक्तीवर विश्वास असलेला, पण नाठाळांसाठी अगदी पाताळविजयम या मद्रासी सिनेमातला राक्षस असणारा साधा मराठी माणूस, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.


देवाचिये द्वारी - ७५

 


अविनाश ते ब्रम्ह निर्गुण I नासे ते माया सगुण I

सगुण आणि निर्गुण I कालवले II


या कर्दमाचा विचार I करू जाणती योगेश्वर I

जैसे क्षीर आणि नीर I राजहंस निवडिती II


घटापूर्वी आकाश असे I घटामध्ये आकाश भासे I

घट फ़ुटता न नासे I आकाश जैसे II


तैसे परब्रम्ह केवळ I अचळ आणि अढळ I

मधे होत जात सकळ I सचराचर II


कायम असणारे ते काय आणि अनित्य, नाशिवंत असणारे ते काय याविषयीचा विवेक श्रीसमर्थ आपल्याला सहाव्या दशकाच्या मायोदभव निरूपण नावाच्या तिस-या समासात शिकवताहेत. ब्रम्ह हे अविनाशी आणि माया ही विनाशी. ही दोन्ही तत्वे या जगात एकमेकांमध्ये अभिन्नपणे मिसळून गेलेली आहेत. साधकांनी राजहंसासारख्या नीरक्षीर वृत्तीने परब्रम्हाला ओळखावे आणि मायेचा त्याग करावा असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण द्वादशी शके १९४४ , दिनांक २२/०९/२०२२)

Wednesday, September 21, 2022

देवाचिये द्वारी - ७४


 

पृथ्वी नव्हे आप नव्हे I तेज नव्हे वायु नव्हे I

वर्णवेक्त ऐसे नव्हे I अव्यक्त ते II

 

माझे शरीर ऐसे म्हणतो I तरी तो जाण देहवेगळाचि तो I

मन माझे ऐसे जाणतो I तरी तो मनही नव्हे II

 

जाले जन्माचे सार्थक I निर्गुण आत्मा आपण येक I

परंतु हा विवेक I पाहिलाच पाहावा II

 

त्या ब्रम्हबोधे ब्रम्हचि जाला I संसारखेद तो उडाला I

देहों प्रारब्धी टाकिला I सावकास II

 

मी म्हणजे पंचभूतात्मक देह नाही. मी म्हणजे माझे मनही नाही. मी या सगळ्यांपासून वेगळा असणारा निर्गुण निराकार आत्मा आहे हा विवेक, हा ब्रम्हबोध ज्या मनुष्याच्या मनात जागृत झाला त्या मनुष्याच्या मनात संसारचिंता, त्यातले खंत, खेद उरत नाहीत. देहाला त्याच्या प्रारब्धावर सोपवून तो मनुष्य ही ब्रम्हस्थिती अनुभवू शकतो असे श्रीसमर्थांचे प्रतिपादन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण एकादशी शके १९४४ , दिनांक २१/०९/२०२२)


Tuesday, September 20, 2022

देवाचिये द्वारी - ७३


 

जो जनामधे वागे I परि जनावेगळी गोष्टी सांगे I

ज्याचे अंतरी ज्ञान जागे I तोचि साधु II

 

ऐसे जयापासी ज्ञान I तोचि जाणावा सज्जन I

तयापासी समाधान I पुसिले पाहिजे II

 

याकारणे ज्ञाता पहावा I त्याचा अनुग्रह घ्यावा I

सारासार विचारे जीवा I मोक्ष प्राप्त II

 

या जगात वावरत असताना त्यातले सार काय असार काय याचा विचार करून कायम शाश्वत गोष्टींचा ध्यास घेऊन जगाप्रमाणे अशाश्वत गोष्टींमागे न जाणारा मनुष्य म्हणजे साधू. सर्वसामान्यांनी अशा माणसाला ओळखून त्याचा मार्ग अनुसरावा म्हणजे त्यांचेही जीवन उन्नत होऊन ते मोक्षाप्रत जातील असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण दशमी शके १९४४ , दिनांक २०/०९/२०२२)

Monday, September 19, 2022

देवाचिये द्वारी - ७२

 



असो ऐसिया समस्तां I येक ब्रम्हा निर्माणकर्ता I

या ब्रम्हयासहि निर्माणकर्ता I कोण आहे II

 

ब्रम्हा विष्णू आणि हर I त्यांसि निर्मिता तोच थोर I

तो वोळखावा परमेश्वर I नाना यत्ने II

 

म्हणोनि देव वोळखावा I जन्म सार्थकचि करावा I

न कळे तरी सत्संग धरावा I म्हणिजे कळे II

 

ग्रंथराज श्रीमददासबोधाच्या देवशोधन नावाच्या सहाव्या दशकाच्या देवशोधन या पहिल्या समासात श्रीसमर्थ आपल्याला देव कोण आणि त्याला सोप्या रितीने कसे प्राप्त करून घ्यावे याचा उपदेश करत आहेत. चांगल्या माणसाच्या सहवासात राहिल्याने आपल्याला देव ओळखता येईल हा श्रीसमर्थांचा दृढ विश्वास आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण नवमी, अविधवा नवमी शके १९४४ , दिनांक १९/०९/२०२२)


Sunday, September 18, 2022

देवाचिये द्वारी - ७१

 


साधु वस्तु होऊन ठेला I संशय ब्रम्हांडाबाहेरि गेला I

निश्चय चळेना ऐसा झाला I या नाव सिद्ध II


म्हणोनि संदेहरहित ज्ञान I निश्चयाचे समाधान I

तेचि सिद्धाचे लक्षण I निश्चयेसी II


सिद्धस्वरूपी नाही देहो I तेथे कैचा हो संदेहो I

याकारणे सिद्ध पाहो I निःसंदेही II


जे लक्षवेना चक्षूसी I त्याची लक्षणे सांगावी कैसी I

निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी I लक्षणे कैसी II


लक्षणे म्हणजे केवळ गुण I वस्तु ठाईची निर्गुण I

तेचि सिद्धांचे लक्षण I वस्तुरूप II



बद्ध, मुमूक्षू आणि साधक या अवस्थांनंतर मनुष्यप्राणी सिद्ध अवस्थेला पोहोचतो. त्या अवस्थेत त्याच्या ज्ञानाला कुठलाही संदेह उरत नाही. या देहाच्या अशाश्वततेचे ज्ञान त्याला झाल्यामुळे तो सिद्ध अवस्थेला पोहोचतो. या निर्गुण अवस्थेचे वर्णन कुणीही करू शकत नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण अष्टमी, शके १९४४ , दिनांक १८/०९/२०२२)

Saturday, September 17, 2022

देवाचिये द्वारी - ७०

 


अवगुणाचा करूनि त्याग I जेणे धरिला संतसंग I

तयासी बोलिजे मग I साधक ऐसा II


अवगुण त्यागी दिवसेंदिवस I करी उत्तम गुणाचा अभ्यास I

स्वरूपी लावी निजध्यास I या नाव साधक II


प्रत्यक्ष माया अलक्ष करी I अलक्ष वस्तु धरी अंतरी I

आत्मस्थितीची धारणा धरी I या नाव साधक II


प्रवृत्तीचा केला त्याग I सुहृदांचा सोडिला संग I

निवृत्तीपथे ज्ञानयोग I साधिता जाला II


सावध दक्ष तो साधक I पाही नित्यानित्य विवेक I

संग त्यागुनि येक I सत्संग धरी II



आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर मनुष्यमात्रांनी बद्ध आणि मुमुक्षू या दोन पाय-या ओलांडल्यानंतर साधक स्थितीला पोहोचलेल्या मानवाची काय अवस्था असते याचे सुरेख विवेचन श्रीसमर्थ करताहेत. ज्या मनुष्याला नित्य काय अनित्य काय याचा विवेक आहे आणि ज्याच्या मनाची धाव आता अशाश्वतापासून शाश्वताकडे सुरू झालेली आहे असा मनुष्य साधक. श्रीसमर्थांचा सावधपणावर फ़ार भर आहे. साधकाने आपल्या मनातील उलाढालींबद्दल कायम सावध राहून निर्णय केला पाहिजे असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण सप्तमी, शके १९४४ , दिनांक १७/०९/२०२२)

Friday, September 16, 2022

देवाचिये द्वारी - ६९

 


संसार दुःखे दुखवला I त्रिविध तापे पोळला I

निरूपणे प्रस्तावला I अंतर्यामी II


जाला प्रपंची उदास I मने घेतला विषयत्रास I

म्हणे आता पुरे सोस I संसारीचा II


प्रपंच जाईल सकळ I येथील श्रम तो निर्फ़ळ I

आता काही आपुला काळ I सार्थक करू II


आपले अवगुण देखे I विरक्तिबळे वोळखे I

आपणासि निंदी दुःखे I या नाव मुमुक्ष II


स्वार्थ सांडून प्रपंचाचा I हव्यास धरिला परमार्थाचा I

अंकित होईन सज्जनांचा I म्हणे तो मुमुक्ष II


बद्ध या पहिल्या पायरीनंतर श्रीसमर्थ त्यापेक्षा उन्नत अशा अवस्थेला असलेल्या मुमुक्षूंचे वर्णन करत आहेत. ज्याला प्रपंचाचे फ़ोलपण कळून येते, आपल्या देहाच्या मर्यादा ओळखता येतात, आजवर जो प्रपंच केला तो सुखाप्रत नेणारा नाही. अंतिम सुखासाठी परमार्थाचाच ध्यास धरला पाहिजे याची जाणीव प्रकर्षाने होते तो मुमुक्षू असे प्रतिपादन श्रीसमर्थ करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण षष्ठी, शके १९४४ , दिनांक १६/०९/२०२२)

Thursday, September 15, 2022

बॉलीवुड्च्या डॉयलॉग्जचा प्रभाव.

शाळेतले, कॉलेजातले मित्र गेट टुगेदरच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी भेटतात. शाळेत तर सगळीच कोकरे पापभिरू असतात पण कॉलेजच्या चार वर्षात, हॉस्टेलला रहात असताना, घरचे कुणीही रोज बघत नसतानाही जी काही १० - २० टक्के जनता अगदी पापभिरू राहिलेली असते दारू सिगारेट आदि प्रलोभनांपासून स्वतःला जपत आलेली असते त्यांच्यातलेही काही बाप्ये (आणि काही बायाही) आता मात्र सरावलेले पेताड आणि फ़ुकाड झालेले असतात. 


गेट टुगेदरच्या पार्टीत खूप वर्षांनी भेटलेल्या एखाद्या मित्र मैत्रिणीकडून आपल्यालाही एखादा पेग ऑफ़र होतो. आपण स्पष्ट आणि परखड नकार देतो. त्यांच्या चेहे-यावर आश्चर्य दाटून येते. "राम, तू मात्र अगदी कॉलेजमध्ये होतास तसाच अजूनही आहेस हं, अगदी." असही कुणीसं किंचित असूयेने ("याला जसे याबाबतीत अजूनही  कोरडे रहायला जमले तसे आपल्याला का नाही ? आपण प्रवाहपतित होऊन का आणि कसे वहात गेलोत" या भावनेनेच असूया जास्त.) म्हणतेही. अशावेळी आपल्या अंगात "तेजाब" चा इंन्सस्पेक्टर सुरेश ओबेरॉय संचरतो. "तुमने भलेही अपना रास्ता और पेशा बदल दिया हो. लेकिन मै अब भी वही रास्ते पर चल रहा हू, और मेरा पेशा भी वही है." असे शब्द आपल्या तोंडातून जरी निघाले नाहीत तरी आपल्या चेहे-याद्वारे प्रगट होत असतात.


आजच मराठीतल्या एका संकेतस्थळावर "ते ब्रम्हास्त्र न बघता त्याच्यावर बहिष्कार टाकू नका" या छापाची प्रचारकी पोस्ट वाचली. आणि एकदम शोलेतला ठाकूर आठवला. "जाओ, जाके बॉलीवूडवालों से कह दो की तमाम फ़िल्लम देखनेवालोने उनके फ़ाल्तू नखरोंको बर्दाश्त करना बंद कर दिया है." 


शेवटी एका लेखकाला सिनेमातले डॉयलॉग्जच आठवणार ना ?


- रंगभूमी आणि रंगभूमीवरच अपार प्रेम असलेला, एकेकाळचा अभिनेता, नट रामकुमार किन्हीकर.

देवाचिये द्वारी - ६८

 


आता बद्ध तो जाणिजे ऐसा I अंधारीचा अंध जैसा I

चक्षुवीण दाही दिशा I सुन्याकार II

 

न कळे भक्ति न कळे ज्ञान I न कळे वैराग्य न कळे ध्यान I

न कळे मोक्ष न कळे साधन I या नाव बद्ध II

 

दया नाही करूणा नाही I आर्जव नाही मित्री नाही I

शांति नाही क्षमा नाही I या नाव बद्ध II

 

परमार्थविषई अज्ञान I प्रपंचाचे उदंड ज्ञान I

नेणे स्वये समाधान I या नाव बद्ध II

 

घटिका पळ निमिष्यभरी I दुश्चित्त न होता अंतरी I

सर्वकाळ ध्यान करी I द्र्व्यदारा प्रपंचाचे II

 

जागृती स्वप्न रात्री दिवस I ऐसा लागला विषयेध्यास I

नाही क्षणाचा अवकाश I या नाव बद्ध II

 

 

श्रीसमर्थांनी परमार्थाच्या मार्गावर चालणा-या मंडळींची बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध अशी चढत्या क्रमाने वर्गवारी केलेली आहे. पाचव्या दशकाच्या बद्धलक्षण नावाच्या सातव्या समासात ते बद्धमाणसांचा उहापोह करताना दिसत आहेत. ज्या व्यक्तीला भक्ती वैराग्य, ध्यान मोक्ष इत्यादिंचे कसलेच ज्ञान नसते आणि जगातल्य भौतिक गोष्टींद्वारे प्राप्त होणा-या सुखांनाच जी व्यक्ती अंतिम सुख मानून त्यात रममाण होत जाते ती व्यक्ती बद्ध समजावी असे श्रीसमर्थ सांगताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण पंचमी, शके १९४४ , दिनांक १५/०९/२०२२)


Wednesday, September 14, 2022

देवाचिये द्वारी - ६७

 



ऐक ज्ञानाचे लक्षण I ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान I

पाहावे आपणांसि आपण I या नाव ज्ञान II

 

मुख्य देवास जाणावे I सत्य स्वरूप वोळखावे I

नित्यानित्य विचारावे I या नाव ज्ञान II

 

जेणे दृश्य प्रकृति सरे I पंचभूतिक वोसरे I

समूळ द्वैत निवारे I या नाव ज्ञान II

 

श्रीसमर्थांचा सर्व साधकांनी ख-या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी असा विशेष आग्रह आहे. ज्या ज्ञानामुळे परमात्मा आणि मी वेगळे आहोत अशी जाणीव देणारी द्वैतबुद्धी नाहीशी होईल ते ज्ञान जर साधकांना प्राप्त झाले तर साधकाच्या जीवनाचे सार्थक झाले असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण चतुर्थी, शके १९४४ , दिनांक १४/०९/२०२२)