बरोबर ३० वर्षांपूर्वींचा प्रवास.
First year engineering चा शेवटचा पेपर संपवून घरी नागपूरला येण्यासाठी कराडवरून महाराष्ट्र एक्सप्रेस पकडलेली.
फक्त १२ बर्थसचा कोटा. एकूण विद्यार्थी ७० च्या आसपास.
मित्रमंडळी आग्रह करीत होती की अरे, आपण एका बर्थवर दोघेदोघे जाऊयात. सगळेच आपले सिंगल हड्डी. जमून गेले असते
पण कराड स्टेशनला एंजिनच्या मागील जनरल + गार्डचा डबा रिकामा पाहिलेले अस्मादिक एका नवीन साहसाच्या तयारीत.
कराड ते पुणे या ६ तासांच्या प्रवासात या ४० माणसांच्या डब्ब्यात फक्त १५ - २० माणसे. मी घेतलेल्या निर्णयावर मी खुश.
रात्री १०.१५. पुणे स्टेशन. आमच्या ४० माणसांच्या डब्ब्यात २०० च्या आसपास गणसंख्येची माणसे ठेचून भरल्यासारखी कोंबल्या गेलीत. "खालून आग वर आग, आग बाजूनी" या कुसुमाग्रजांच्या ओळी आठवताहेत. फक्त "आग" शब्दाऐवजी "माणसे" शब्द टाकायला हवा.
दिलासादायक बाब एव्हढीच की मी खिडकीजवळ असल्याने गार वार्याचा आनंद घेऊ शकतोय.
रात्री ११ वाजता पुण्याहून गाडी दौंडकडे हलतेय आणि लघुशंकेची जाणीव होतेय. "गर्दी दौंडला कमी होईलच. मग जाऊन येऊ टाॅयलेटपर्यंत." ही स्वतःच्याच मनाची घातलेली समजूत.
अर्धा प्रवासी आणि अर्धा गार्ड असा डब्बा असल्याने डब्ब्यात एकाबाजूलाच आणि २ च टाॅयलेटस. सर्वसाधारण डब्ब्यांमधे ४ असतात.
रात्री साडेबाराच्या सुमारास दौंड येतय. गर्दी कमी होण्याऐवजी वाढलीय. मी बसलेल्या, पसरलेल्या लोकांच्या अंगाखांद्यांवरून टाॅयलेटपर्यंतचा प्रवास करून येतोय.
टाॅयलेटच्या आतच बसून ७ - ८ मंडळी प्रवास करतायत. त्यांना "बाहेर पडा" म्हणणेही प्रॅक्टीकल नाही कारण बाहेरच्या अवकाशात या ७ - ८ माणसांना सामावून घेईल इतकी जागाच नाही.
डब्ब्याचे दार आतून बंद. दाराबाहेर पुन्हा ५० -६० माणसे आत येण्यासाठी गर्दी करताहेत. दाराला लागून १० माणसे. दार उघडणे अशक्य.
रात्री १ च्या सुमारास गाडी दौंड सोडतेय. आता ही गर्दी मनमाडपर्यंत, पुढले २६० किमी तरी अशीच.
पुन्हा खिडकीपाशी येऊन बसलोय. अस्वस्थ. मघाचे गार वारे आता नकोसे झालेय. प्रत्येक थंडाव्यागणिक अस्वस्थता वाढतेय.
Relativity of Time चा प्रत्यय येतोय. दर १० मिनिटांनी घड्याळ पाहणे सुरू आहे. आणि दर तासातासाने मागील वेळेसारखेच लोकांच्या अक्षरशः अंगा खांद्यांवरून टाॅयलेटचा प्रवास. टाॅयलेटच्या आत बसलेल्यांना माझी अडचण कळतेय पण प्रामाणिक इच्छा असूनही त्यांच्यातला कुणीही काहीही करू शकत नाहीये.
वाढत्या अस्वस्थतेतच पहाट होतेय. "बाॅर्डर" सिनेमातल्या त्या सैनिकांनी जितकी सूर्यकिरणांची वाट पाहिली त्याहून अधिक सूर्यकिरणांची वाट पाहणे सुरू आहे. कारण मनमाड सकाळी ६ वाजता येणार.
मनमाडला आऊटर सिग्नलला ही गाडी नेहमीच थांबते. पण आज थांबल्यावर आलेला रेल्वेचा राग अपूर्व आहे. एव्हाना पोटातली अजिजी, व्याकुळता चेहेर्यावर, डोळ्यांमध्ये येत चाललीय.
शेवटी मनमाड येतेय. प्लॅटफाॅर्मवर शिरताक्षणी अर्धवट धावणार्या गाडीतून निकराची उडी आणि प्लॅटफाॅर्मवर पुढे दिसेल ते स्वच्छतागृह गाठणे.
पुढच्या प्रवासासाठी शयनयान वर्गात मित्रांसोबत बसतोय. त्यांना ही हकिकत सांगितल्यानंतर हशा आणि त्यांची बोलणी वगैरे.
दौंड ते मनमाड हा प्रवास जन्म ते मृत्यू या प्रवासापेक्षा मोठा वाटणारी ती रात्र. आजही त्या आठवणीने शहारा आणणारी.
आज सांगताना मोठी मजा येतेय पण "जावे त्या वंशा तेव्हा कळे".
अर्थात प्रत्येकावर "अशी" एखादी वेळ आयुष्यात कधी न कधी नक्की येतेच.
- जीवनाच्या विविध अंगांना भिडलेला अनुभवी प्रवासी पक्षी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.